विशेष प्रतिनिधी
ठाणे : मानपाडा परिसरातील ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची काही दिवसांपूर्वी त्यांच्या कार्यालयात घुसून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर ठाणे पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके तैनात केली होती. ठाणे गुन्हे शाखेचे डीसीपी अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली नऊ पथकांकडून विविध ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत होती. Pradeep Purnekar
या प्रकरणात यापूर्वी पप्या शिंदे याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतर मिरा-भाईंदर परिसरातून ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे केलेल्या चौकशीत महत्त्वाची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुंबई-गोवा महामार्गालगत अलिबागजवळील एका डेअरीवर छापा टाकला. या कारवाईत निखिल यादव आणि नितेश पवार उर्फ भावड्या या दोघांना अटक करण्यात आली.
गोळीबार करणारा निखिल, तर भावड्याने केला कोयत्याने वार
तपासादरम्यान हल्ल्यातील आरोपींच्या भूमिकेबाबत महत्त्वाचे तपशील समोर आले आहेत. मंगळवारी रात्री पाच जणांच्या टोळक्याने प्रदीप पूर्णेकर यांच्या कार्यालयात घुसून त्यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी निखिल यादव याने पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. विशेष म्हणजे, निखिल हा पूर्णेकर यांच्या कार्यालयाशेजारी असलेल्या वडापावच्या गाडीवर काम करत होता.
दुसरा आरोपी नितेश पवार उर्फ भावड्या याने पूर्णेकर यांच्यावर कोयत्याने वार केल्याचा आरोप आहे. नितेश हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तीन आरोपी अटकेत, आणखी दोघांचा शोध सुरू
या हत्येच्या कटात एकूण पाच मुख्य आरोपी सहभागी असल्याचे तपासातून समोर आले आहे. पप्या शिंदे, निखिल यादव आणि नितेश पवार या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, संतोष कनोजिया उर्फ टल्ली आणि हेल्मेट घालून हल्ल्यात सहभागी झालेला आणखी एक आरोपी अद्याप फरार आहे.
अटक केलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, त्यांच्या जबाबातून फरार आरोपींची ओळख आणि त्यांच्याबाबत महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे.
पूर्णेकर कुटुंबीयांच्या आरोपांमुळे राजकीय वातावरण तापले
दरम्यान, या हत्या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे. प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी शिंदे गटाच्या नगरसेविका मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर या हत्येमागे हात असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे ठाण्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी नगरसेविका मीनाक्षी शिंदे पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेत त्या काय स्पष्टीकरण देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक असून, हत्या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App