विशेष प्रतिनिधी
बीड : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाला आता नवे आणि खळबळजनक वळण मिळाले आहे. या प्रकरणात आपला मुलगा सौरभ सोनवणे याला नाहक गोवण्यासाठी राजकीय आणि गुन्हेगारी कट रचण्यात आल्याचा गंभीर आरोप बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी एका कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप ऐकवली. या क्लिपमध्ये जेलमध्ये असलेले वाल्मीक कराड यांनी सुग्रीव कराड यांना फोन करून सौरभ सोनवणे यांना हत्या प्रकरणात अडकवण्यासाठी आंदोलन करण्याच्या सूचना दिल्याचा दावा सोनवणे यांनी केला. Bajrang Sonawane
आंदोलन उभारण्याच्या सूचना दिल्याचा दावा
खासदार सोनवणे यांच्या आरोपानुसार, वाल्मीक कराड यांनी बीड जिल्हा कारागृहातून सुग्रीव कराड यांच्याशी फोनवर संपर्क साधला. या संभाषणात खासदारांच्या मुलाला विलास घुले हत्या प्रकरणात गोवण्यासाठी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवणे, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करणे आणि रास्ता रोको करण्यासारख्या सूचना दिल्याचा दावा त्यांनी केला. या कथित संभाषणाची ऑडिओ क्लिपही त्यांनी पत्रकारांसमोर सादर केली.
५०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याचा इशारा
‘माझ्या मुलाचा या हत्येशी कोणताही संबंध नाही. घटनेनंतर दाखल झालेल्या पहिल्या एफआयआरमध्ये त्याचे नाव नव्हते. मात्र, नंतर राजकीय आणि जातीय रंग देऊन पुरवणी जबाबात त्याचे नाव समाविष्ट करण्यात आले,’ असा आरोप सोनवणे यांनी केला. या प्रकरणात आपल्या मुलाची बदनामी करणाऱ्या १२ ते १३ जणांविरोधात ५०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कारागृह प्रशासनावरही प्रश्नचिन्ह
बीड जिल्हा कारागृहातील प्रशासनाच्या भूमिकेवरही खासदार सोनवणे यांनी प्रश्न उपस्थित केले. वाल्मीक कराड यांनी कारागृहातून तब्बल ३२ फोन वापरल्याचा आणि २० फोनवर संभाषण केल्याचे पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला. कारागृहात आयफोन कसे पोहोचले, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली. कारागृह प्रशासनातील संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी भूमिका त्यांनी मांडली.
धनंजय मुंडेंच्या नावाचाही उल्लेख
पत्रकार परिषदेत बोलताना सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या जुन्या संबंधांचाही उल्लेख केला. २०१४ च्या निवडणुकीत आपण त्यांना आर्थिक मदत केली होती. तसेच त्यांना विधानपरिषदेवर संधी मिळावी यासाठी गोपीनाथ मुंडे यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याला खासदार होण्यासाठी धनंजय मुंडे यांनीही मदत केल्याचे सोनवणे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन सखोल चौकशीची मागणी
या कथित ऑडिओ क्लिपसह सर्व व्हिडिओ पुरावे पोलीस अधीक्षकांकडे सादर करणार असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले. ऑडिओ क्लिपची फॉरेन्सिक लॅबमार्फत तपासणी करावी, कारागृहातील कथित गैरप्रकारांची चौकशी करावी आणि या संपूर्ण प्रकरणातील सत्य समोर आणावे, अशी मागणी ते मुख्यमंत्र्यांकडे करणार आहेत.
दरम्यान, खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेले हे आरोप असून, कथित ऑडिओ क्लिपची सत्यता आणि संभाषणातील व्यक्तींची ओळख अधिकृत तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App