विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची मंगळवारी (29 सप्टेंबर) रात्री गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ठाण्यातील मानपाडा-गणेशनगर परिसरात घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हत्येच्या तपासात पोलिसांना सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून महत्त्वाचे धागेदोरे मिळाले असून, दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्येमागे पाच जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. Pradeep Purnekar
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी या हत्येमागे राजकीय षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप केला आहे. मुख्य सूत्रधारासह सर्व आरोपींवर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका कुटुंबीयांनी घेतली आहे. Pradeep Purnekar
कार्यालयाबाहेरच घातला घात
ठाण्यातील घोडबंदर रोडवरील मानपाडा-गणेशनगर परिसरात प्रदीप पूर्णेकर यांचे कार्यालय आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ते कार्यालयाजवळ असताना हेल्मेट आणि चेहऱ्यावर मास्क घातलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला. त्यानंतर काही हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार केल्याचेही सांगण्यात येत आहे. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी त्यांना तातडीने जवळच्या इन्फिनिटी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी झाली. या हत्येमुळे नातेवाईक, समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पाच हल्लेखोरांचा संशय; दोघे ताब्यात
पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हत्येत एकूण पाच जणांचा सहभाग असल्याचा प्राथमिक संशय आहे.
निखिल यादव, पप्या शिंदे, आकाश निमसे, संतोष कनोजिया आणि आणखी एक अनोळखी व्यक्ती अशा पाच संशयितांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. यापैकी पप्या शिंदे आणि आकाश निमसे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उर्वरित संशयितांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखेसह पोलिसांची नऊ पथके तैनात करण्यात आली आहेत.
कापूरबावडी पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास करत आहेत.
हल्ल्यापूर्वी रेकी केल्याचा संशय
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येचा एक सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला आहे. या फुटेजमध्ये दोन व्यक्ती चेहऱ्यावर रुमाल बांधून दुचाकीवरून जाताना दिसत असल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी पूर्णेकर यांच्या हालचालींची आधीपासून पाहणी केली होती का, याचा तपास पोलीस करत आहेत. Pradeep Purnekar
गणेशोत्सवाच्या काळापासूनच पूर्णेकर यांच्यावर लक्ष ठेवले जात असल्याचा दावा त्यांच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. त्यामुळे हत्येपूर्वी रेकी करण्यात आली होती का, हा तपासातील महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.
‘त्या’ बैठकीनंतर चार दिवसांत हत्या?
प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पूर्णेकर यांनी हत्येनंतर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, दीड वर्षापूर्वीच त्यांच्या वडिलांनी काही व्यक्तींकडून आपल्याला धोका असल्याचे सांगितले होते. संबंधित व्यक्तींकडून धमकीचे फोन आल्याचा दावाही त्यांनी केला.
तसेच, गणपती विसर्जनाच्या एक दिवस आधी राजेंद्र शिंदे आणि कथित हल्लेखोरांची बैठक झाल्याचा दावा राम पूर्णेकर यांनी केला आहे. या बैठकीत उपस्थित असलेल्या आणखी दोन व्यक्तींनी संबंधितांना पाहिल्याचेही त्यांनी सांगितले. या दाव्यांची पोलिसांकडून पडताळणी केली जात आहे.
राम पूर्णेकर यांनी ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे तसेच त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत. मात्र, या आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. पोलिस तपासातून या आरोपांमागील तथ्य स्पष्ट होणार आहे.
कुटुंबीयांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येनंतर कुटुंबीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी निष्पन्न होऊन मुख्य सूत्रधारावर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे कुटुंबीयांनी जाहीर केले आहे.
पूर्णेकर यांचे भाऊ आणि माजी नगरसेवक जयनाथ पूर्णेकर यांनीही हा प्रकार गणेशोत्सवाच्या काळापासून सुरू असल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या दोन्ही संशयितांची चौकशी सुरू असून, हत्येमागील नेमके कारण, कटाचा सूत्रधार आणि इतर सहभागी व्यक्तींची भूमिका याचा तपास केला जात आहे. सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App