युती की स्वतंत्र लढत? २२ सप्टेंबरच्या बैठकीत सतीश काकडे गटाचा निर्णय
विशेष प्रतिनिधी
बारामती : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच शेतकरी कृती समितीनेही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे संकेत दिले आहेत. कृती समितीचे नेते सतीश काकडे यांनी २२ सप्टेंबर रोजी निंबुत येथे कार्यकर्ते आणि सभासदांचा मेळावा आयोजित केला आहे. या बैठकीत स्वतंत्र पॅनेल उभे करायचे की अन्य राजकीय गटासोबत युती करायची, यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोमेश्वर कारखाना निवडणुकीतील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.
कृती समितीच्या भूमिकेकडे लक्ष
सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांसह भाजप आणि शिवसेनेकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे. युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी पॅनेलची घोषणा झाल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर सतीश काकडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी कृती समिती नेमकी कोणती भूमिका घेणार, याकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.
कृती समितीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कोणताही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे काकडे यांनी सांगितले. दिवंगत अजित पवार यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे अर्ज दाखल करताना शक्तिप्रदर्शन टाळल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, विद्यमान कारखाना अध्यक्षांकडून करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनामुळे सभासदांच्या भावना दुखावल्याचा दावा त्यांनी केला आहे.
सुनेत्रा पवार गटासोबत युती होणार?
२२ सप्टेंबरच्या बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीत युती करायची का, यावरही चर्चा होणार असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे.
त्यामुळे कृती समिती स्वतंत्र पॅनेल उभे करणार की सुनेत्रा पवार यांच्या गटासोबत राजकीय जुळवाजुळव करणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. कृती समितीच्या मागण्यांचा विचार न झाल्यास समविचारी व्यक्ती आणि अपक्षांना एकत्र करून पक्षविरहित पॅनेल उभे करण्याचा पर्यायही विचाराधीन असल्याचे संकेत काकडे यांनी दिले आहेत.
या भूमिकेमुळे कृती समिती स्वतंत्र अस्तित्वाची चाचपणी करत आहे की विद्यमान राजकीय गटांवर दबाव निर्माण करण्याची रणनीती आखत आहे, याबाबत कारखाना कार्यक्षेत्रात चर्चा सुरू झाली आहे.
कारखाना व्यवस्थापनावर गंभीर आरोप
दरम्यान, सतीश काकडे यांनी विद्यमान कारखाना व्यवस्थापनाच्या कारभारावरही आरोप केले आहेत. चेअरमन कारखाना स्वतःच्या मालकीचा असल्याप्रमाणे वागत असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सभासदांना प्रश्न मांडण्यापासून रोखले जाते, माईक बंद केला जातो आणि सभेचे इतिवृत्त योग्य पद्धतीने नोंदविले जात नसल्याचे आरोपही त्यांनी केले आहेत.
या भूमिकेच्या निषेधार्थ २१ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शेतकरी कृती समिती सहभागी होणार नसल्याचे काकडे यांनी जाहीर केले आहे.
२२ सप्टेंबरच्या बैठकीनंतर चित्र स्पष्ट होणार
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत यापूर्वीच विविध राजकीय गट सक्रिय झाले आहेत. आता शेतकरी कृती समितीनेही स्वतंत्र पॅनेल किंवा युतीचा पर्याय खुला ठेवल्याने निवडणुकीतील समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, कृती समितीची अंतिम भूमिका २२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या बैठकीनंतरच स्पष्ट होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App