विशेष प्रतिनिधी
सांगली : शक्तिपीठ महामार्गाच्या प्रस्तावाविरोधात सांगली जिल्ह्यातील आंदोलनाला शुक्रवारी आक्रमक वळण मिळाले. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या विराट मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. शक्तिपीठ महामार्गासाठी होणाऱ्या भूसंपादनाला आणि मोजणीला विरोध करत सरकारने या प्रकल्पाबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.
“विरोध मोडून काढण्यासाठी सरकारने अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवले आहेत. मात्र, आम्हीही तेवढ्याच ताकदीने उभे आहोत. हा जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा जिल्हा आहे. सरकारचा अतिरेक परतवून लावू,” असा इशारा जयंत पाटील यांनी दिला.
शक्तिपीठ महामार्गाच्या विरोधातील लढ्याला क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने सुरुवात केल्याचेही त्यांनी सांगितले. “सरकारी यंत्रणा मोजणीसाठी आली, तर काय करायचे हे तुम्हाला माहिती आहे,” असे म्हणत त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचे संकेत दिले.
या मोर्चात महिलांसह मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रासपचे नेते महादेव जानकर यांच्यासह विविध नेते आणि कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.
‘सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत’
जयंत पाटील यांनी राज्य सरकारच्या आर्थिक धोरणावरही टीका केली. कंत्राटदारांची मोठी देणी प्रलंबित असल्याचा दावा करत त्यांनी सरकारकडे विकासकामांसाठी निधी नसल्याचे म्हटले.
“कंत्राटदारांचे सुमारे ९० हजार कोटी रुपये सरकारने दिलेले नाहीत. मागील वर्षी करण्यात आलेल्या आमदार निधीतील कामांचे पैसेही अद्याप मिळालेले नाहीत. नवीन आमदार निधीही आलेला नाही. सरकारच्या तिजोरीत पैसे नाहीत, मग बाहेरून कर्ज काढून रस्त्यांची टेंडर काढण्याचा उद्योग सरकारने तातडीने थांबवला पाहिजे,” असा टोला त्यांनी लगावला.
‘सत्ताधारी आमदारांनी भूमिका स्पष्ट करावी’
शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील अनेक जिल्ह्यांतून विरोध होत असल्याचा दावा करत जयंत पाटील यांनी सत्ताधारी आमदार आणि खासदारांनाही लक्ष्य केले.
“हा विरोध केवळ सांगली, कोल्हापूर किंवा सोलापूरपुरता मर्यादित नाही. परभणी, हिंगोलीसह अनेक जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत आहे. लातूरमध्येही लवकरच मोर्चा काढला जाणार आहे,” असे त्यांनी सांगितले.
लोकांचा विरोध असताना सत्ताधारी आमदार आणि खासदारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. “एकतर त्यांनी शक्तिपीठ महामार्गाला पाठिंबा द्यावा किंवा स्पष्टपणे विरोध करावा. दोन्ही बाजूंना राहण्याचा उद्योग आता बंद झाला पाहिजे,” असा घणाघात जयंत पाटील यांनी केला.
शक्तिपीठ महामार्गाबाबत सरकारने जनभावनेचा विचार करून निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी करत आंदोलन पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App