गंगोत्री ते गंगासागर भाजपने बाजी मारली; पण अण्णामलाईला अडवल्यामुळे कावेरीची मोहीम राहिली!!

नाशिक : गंगोत्री ते गंगासागर भाजपने बाजी मारली; पण अण्णामलाईला अडवल्यामुळे कावेरीची मोहीम राहिली!!, असेच आजच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांचे वर्णन करावे लागेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी पाच राज्यांपैकी पश्चिम बंगाल वर सर्वाधिक कॉन्सन्ट्रेट केल्यामुळे भाजपला तिथे प्रचंड विजय मिळवता आला. ममता बॅनर्जींचे सरकार घालवता आले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आपल्या विजयाचे वर्णन गंगोत्री ते गंगासागर अशा विजय यात्रेच्या स्वरूपात केले. उत्तराखंडात गंगा उगम पावते, तिथे भाजपचे राज्य आहे आणि आता ज्या बंगालच्या उपसागराला गंगा येऊन मिळते तिथेही भाजपचे राज्य आले आहेत. त्यामुळे गंगोत्री ते गंगासागर अशी भाजपच्या विजयाची घोडदौड झाली, असे वर्णन अनेकांनी केले.

शुभेंदू अधिकारी यांना संधी

बंगालमध्ये विजय मिळवण्यासाठी भाजपच्या नेत्यांनी जीवाचे रान केले. तिथे शुभेंदू अधिकारी यांच्यापासून नेतृत्वाची मोठी फळी उभी केली. तृणमूल काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांना भाजपने आपल्यात सामावून घेतले. शुभेंदू अधिकारी यांच्यापासून ते कुणाल घोष यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी पाच वर्षांमध्ये पश्चिम बंगाल राज्य अक्षरशः पिंजून काढले होते. शुभेंदू अधिकारी आणि अन्य नेत्यांना भाजपच्या सगळ्या केंद्रीय नेत्यांनी प्रोत्साहन आणि साथ दिली होती. त्याचाच परिणाम पश्चिम बंगालच्या निवडणुकीत दिसला.

 अण्णामलाईंची संधी काढून घेतली

पण जे पश्चिम बंगाल मध्ये भाजपच्या नेत्यांनी घडवून आणले, ते त्यांना तामिळनाडू घडवून आणता आले नाही. भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी सुरुवातीला पश्चिम बंगालच्या शुभेंदू अधिकारी यांच्याप्रमाणेच तमिळनाडू अण्णामलाई यांच्या नेतृत्वाचा प्रयोग केला होता. ज्या पद्धतीने शुभेंदू अधिकारी यांनी पश्चिम बंगाल पिंजून काढला, त्याच पद्धतीने अण्णामलाई यांनी तामिळनाडू पिंजून काढला होता. अण्णामलाईंची तामिळनाडूतली भाजपची यात्रा गाजली होती. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा त्यांना सुरुवातीला प्रोत्साहनच दिले होते.

पण नंतर भाजपने तामिळनाडूतली आपली स्ट्रॅटेजी बदलली. भाजपने राज्यात स्वतःची ताकद वाढविण्याच्या ऐवजी अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाबरोबर युती करणे पसंत केले. अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमचे नेते पलानीस्वामी यांच्याबरोबर अण्णामलाई यांचे राजकीय सूत जुळत नाही, हे पाहिल्याबरोबर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी अण्णामलाई यांना तामिळनाडूच्या राजकीय पटलावरून दूर केले. पलानीस्वामी यांच्या नेतृत्वावर जास्त विश्वास ठेवला. हा भाजपसाठी एक प्रकारे राजकीय आत्मघात होता, पण तो भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्वतःहून केला.

 द्रविडी राजकारणाला पर्याय

त्याचाच परिणाम किंबहुना दुष्परिणाम तामिळनाडूच्या राजकारणात भाजपला भोगावा लागला. तामिळनाडूची जनता द्रविडी राजकारणाला मोठा राजकीय पर्याय शोधत होती, हे आजच्या निकालांमध्ये सिद्ध केले. म्हणूनच अभिनेता थलपती विजय याला आजच्या निवडणुकीत विजय मिळवता आला. तोच पर्याय देण्याची क्षमता अण्णामलाई यांच्यामध्ये होती‌. किंबहुना अण्णामलाई यांनी त्याच पद्धतीने तामिळनाडूतल्या भाजपच्या राजकारणाची सुरुवात देखील करून दिली होती. तामिळनाडूमध्ये द्रविड मुन्नेत्र कळकम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम हे दोन भ्रष्ट पक्ष आहेत. त्यांना पर्याय म्हणूनच आपण भाजपला पुढे आणतो आहोत, असे अण्णामलाई सुरुवात पासून सांगत होते. त्यांना तामिळी जनतेचा प्रतिसाद सुद्धा मिळत होता. पण भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी अण्णामलाई यांच्याकडून नेतृत्व काढून घेतले.

 … तर विजयला यश मिळालेच नसते

त्यामुळेच थलपती विजय याच्यासारख्या राजकीय नेतृत्वाला राजकीय उदय घडवून आणायची संधी मिळाली. द्रविडी राजकारणाला आपणच पर्याय आहोत हे दाखवून द्यायची संधी मिळाली. ती संधी जर भाजपने अण्णामलाई यांना घेऊ दिली असती, तर विजयला आजच्या एवढे यश मिळवताही आले नसते. विजयच्या पारड्यात पडलेले आजचे यश अण्णामलाईच्या पारड्यात पडलेले दिसले असते. पण भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्ट्रॅटजी बदलल्यामुळे हे घडून आले नाही. भाजपने गंगोत्री ते गंगासागर अशी बाजी मारली, पण त्याच पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या स्ट्रॅटेजी मुळे कावेरीची मोहीम राहिली, हेच निरीक्षण नोंदवावे लागेल.

BJP Central leadership didn’t give chance to Annamalai in Tamilnadu

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात