नाशिक : बारामतीत बिनविरोध साठी पवार कुटुंबियांचा आटापिटा; पण राहुरीत लढायची पवार गटाची दुटप्पी भूमिका!!, हेच राजकीय वास्तव आज पोटनिवडणुकीचे अर्ज मागे घेण्याच्या दिवशी समोर आली. Pawar family
बारामतीत सुनेत्रा पवार यांची पोट निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पवार कुटुंबीयांनी अक्षरशः धाय मोकलली. सगळ्या पवार कुटुंबाने एकजुटीने सुनेत्रा पवारांसाठी सगळ्या पक्षांचे उंबरठे झिजवले. स्वतः सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना तीन वेळा फोन केले. शरद पवारांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना फोन केला. सुप्रिया सुळे यांनी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला आणि मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांच्याकडे आग्रह धरला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ हर्षवर्धन सपकाळ यांना भेटले.
– पार्थ पवारच्या वक्तव्याने गोची
याच दरम्यान पार्थ पवारने काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाल्याचे सांगून सगळ्या पवार कुटुंबाची गोची केली त्यामुळे रोहित पवारांनी परस्पर हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन काँग्रेसची माफी मागितली. त्यासाठी त्यांनी पार्थ पवारशी बोलायची सुद्धा तसदी घेतली नाही.
शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा हर्षवर्धन सपकाळ यांना फोन करून सुनेत्रा पवारांसाठी रदबदली केली.
– राहुरी पवारांची दुटप्पी भूमिका
पण बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी धाय मोकलणारे पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचे नेते राहुरीत मात्र दुटप्पी भूमिका घेऊन मोकळे झाले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट मुळे बारामतीचे पोटनिवडणूक होत आहे, तशीच शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली एक्झिट मुळे राहुरीची पोटनिवडणूक होत आहे हे वास्तव सुद्धा पवार कुटुंबीय आणि राष्ट्रवादीचे नेते विसरले.
– शशिकांत शिंदे यांची मखलाशी
राहुरी मध्ये स्थानिक नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहे म्हणून आम्ही निवडणूक लढवतोय. राहुरी आणि बारामतीतील राजकीय परिस्थिती वेगळी आहे, अशी मखलाशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली. पवार कुटुंबियांनी सुद्धा बारामतीसाठी जेवढे कष्ट घेतले, तेवढे कष्ट राहुरी साठी घेतले नाहीत. उलट राहुरीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या विरोधात गोविंद मोकाटे यांना उभे केले. राहुरी मध्ये राजकीय ताकद असलेल्या प्राजक्त तनपुरे यांना देवेंद्र फडणवीस यांनी पटवून माघार घ्यायला लावली म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गोविंद मोकाटे यांना उमेदवारी देऊन उभे केले.
– पवारांचा सल्ला
बारामतीचे कर्तृत्ववान नेते आपल्यातून निघून गेले म्हणून बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करा, असा सल्ला शरद पवारांनी काँग्रेसला दिला, पण राहुरीतले दुसरे कर्तृत्ववान नेते आपल्यातून निघून गेले म्हणून तिथली पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे पवारांना वाटले नाही. उलट याच पवारांनी राहुरीतल्या भाजप उमेदवाराविरुद्ध स्वतःच्या पक्षाचा तुतारीचा उमेदवार दिला. यातून पवार कुटुंबाची आणि गटाची दुटप्पी आणि भेदभाव करण्याची भूमिका सगळ्या महाराष्ट्रासमोर उघड्यावर आली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App