नाशिक :Sambhji raje संभाजीराजेंना भाजपने दिली राज्यसभेची खासदारकी, पण उद्धव ठाकरे आणि काँग्रेसने केली कोंडी, तरी संभाजीराजेंची ( Sambhji raje ) परिवर्तन महाशक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच करणार कुरघोडी!!, ही परिवर्तन महाशक्तीची कहाणी समोर आली आहे.Sambhji raje
खुद्द संभाजीराजे यांच्या तोंडूनच आजच्या पुण्यातल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसने त्यांची कशी कोंडी केली याची कहाणी महाराष्ट्रासमोर आली. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत स्वराज्य पक्षाला कोल्हापूरची जागा देण्याचा शब्द दिला होता. तो शब्द काँग्रेस हायकमांडने दिला होता, पण शाहू महाराजांची उमेदवारी काँग्रेस मधून समोर आली. त्यांचा विषय समोर आल्याबरोबर माझ्या विषयाला पूर्णविराम मिळाला, अशा शब्दांमध्ये संभाजीराजे यांनी खंत बोलून दाखवली.
स्वराज्य चळवळ शाहू महाराज खासदार व्हायच्या आधीपासूनची होती. काँग्रेस आणि स्वराज्य हे लोकसभेसाठी युती करणार होते. पण ते घडले नाही, तरी शाहू महाराजांना निवडून आणण्यासाठी एक पुत्र म्हणून मी कर्तव्य बजावले, तरी कुठल्याही सत्कार समारंभासाठी काँग्रेसचे नेते सतेज पाटलांनी आपल्याला बोलावलेच नाही. शाहू महाराजांच्या निवडणुकीसाठी मी राबलो ना??, मग सतेज पाटील किंवा काँग्रेसच्या नेत्यांनी मला का बोलावले नाही??, असा खोचक सवाल संभाजीराजे यांनी केला. कुठल्याही हायकमांडच्या हाताखाली काम करायला आवडत नाही, अशी पुस्ती त्यांनी जोडली आणि जे घडले तो इतिहास झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
पण संभाजीराजे यांच्या पुण्यातल्या वक्तव्यातून अर्धी माहिती समोर आली. प्रत्यक्षात संभाजीराजे यांची कोंडी फक्त काँग्रेसनेच केली असे नाही, तर त्याआधी उद्धव ठाकरे यांनी त्यांची कोंडी केलीच होती. भाजपने दिलेल्या राष्ट्रपती नियुक्ती खासदारकीची मुदत संपल्यानंतर संभाजीराजेंना महाराष्ट्रातील सर्वपक्षीय मान्यताप्राप्त उमेदवारी घेऊन राज्यसभेवर जायचे होते. त्यावेळी ते शरद पवारांना भेटले. शरद पवारांनी त्यांना पाठिंबा दिला, पण त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरेंकडे जायला सांगितले. पवारांच्या सांगण्यानुसार संभाजीराजे उद्धव ठाकरे यांच्याकडे गेले, पण उद्धव ठाकरेंनी त्यांना कुठलाच शब्द दिला नाही. उलट त्यांना हातावर शिवबंधन बांधायला सांगितले. पण उद्धव ठाकरेंनी नंतर तर संभाजीराजे यांचा साधा फोनही घेतला नाही. त्यावेळी पवारांनी अप्रत्यक्ष आणि उद्धव ठाकरेंनी प्रत्यक्ष संभाजीराजे यांची राजकीय कोंडीच केली होती. त्यावेळी पत्रकार परिषद घेऊन संभाजीराजे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला होता.
– पवारांविरोधात चकार शब्द नाही
आता तेच संभाजीराजे परिवर्तन महाशक्ती नावाच्या तिसऱ्या आघाडीतून आपले राजकीय नशीब वेगळ्या प्रकारे आजमावत आहेत. आधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर आणि नंतर काँग्रेसवर त्यांनी संताप व्यक्त करून झाला आहे, पण ते शरद पवारांविरोधात चकार शब्द बोलले नाहीत. राष्ट्रपती नियुक्त खासदारकी देणाऱ्या भाजपपासून तर संभाजीराजे यांनी केव्हाच फारकत घेतली आहे. उलट परिवर्तन महाशक्ती आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तगडे उमेदवार देण्याची भाषा बोलत आहे. भाजपने दिलेल्या खासदारकीची मुदत संपल्यानंतर संभाजीराजे यांच्या राजकारणाने लोकप्रतिनिधित्वाच्या प्रतीक्षेत वेगळे वर्तुळ पूर्ण करत आणले आहे. संभाजीराजेंच्या राजकारणाला कुठल्यातरी लोकप्रतिनिधित्वचे कोंदण मिळण्याची अपेक्षा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App