विशेष प्रतिनिधी
पुणे : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ म्हणा. तुम्हीही सरकारी नाव जे आहे तेच घेत जा, असे सुनावत मंत्री शंभुराजे देसाई ( Shambhuraje Desai ) यांनी अजित पवारांवरचा राग पत्रकारांवर काढला.
शंभूराज देसाई आज पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाला आले होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींनी ‘लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख करताच शंभूराज देसाईंनी त्यात सुधारणा सांगितली. ते म्हणाले, कालपासून इतर लोकही हे नाव घ्यायला लागले आहेत. नवीन योजना होती. त्यामुळे बऱ्याचदा अनावधानाने फक्त लाडकी बहीण योजना असं नाव घेतलं जायचं. पण आता महायुतीतले सगळे पक्ष या योजनेचा उल्लेख करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ असा करत आहेत. दोन दिवस मी मतदारसंघातल्या १५-२० गावांमध्ये १००-१२५ महिलांना या योजनेसंदर्भात भेटलो. त्याचे व्हिडीओही आहेत. महिलांना जर विचारलं की ही योजना कुणी आणली? तर त्या स्पष्ट सांगत आहेत की एकनाथ शिंदेंनी आणली. त्यामुळे महिलांमध्ये हे नक्की आहे की ही योजना एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारनं आणली आहे”, असा दावा शंभूराज देसाई यांनी केला आहे.
भारतीय जनता पक्ष, अजित पवार गट व एकनाथ शिंदे गट या तिन्ही घटक पक्षांकडून लाडकी बहीण योजनेबाबत दावे केले जात आहेत. अजित पवार गटाकडून तर व्हिडीओ क्लिप जारी करण्यात आली असून त्यात त्यांनीच ही योजना दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आता शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई यांनी लाडकी बहीण योजनेवरून स्पष्ट भूमिका मांडली आहे.
लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रात ठराविक निकषांची पूर्तता करणाऱ्या महिलांना मासिक १५०० रुपये दिले जाणार आहेत. या योजनेची घोषणा अजित पवारांनी अर्थसंकल्पात केली. योजनेचं नाव ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ असं असताना मध्यंतरीच्या काळात सत्ताधारी पक्षांकडूनच ‘लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख होत असल्याचं दिसत आहे. यासंदर्भात आज माध्यम प्रतिनिधींनी शंभूराज देसाई यांना विचारणा केली असता त्यांनी स्पष्टपणे ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ असं नाव घेण्यास सांगितलं.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App