Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 वरून टप्प्याटप्प्याने 3000 करणार; मुख्यमंत्र्यांची साताऱ्यातून ग्वाही!!

Ladki Bahin Yojana

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायमस्वरुपी सुरु राहणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही Ladki Bahin Yojana

विशेष प्रतिनिधी 

सातारा : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि क्रांतिकारी योजना आहे. ही योजना लाडक्या बहिणींसाठी कायमस्वरुपी सुरु राहणार आहे. या आर्थिक वर्षात योजनेसाठी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची आर्थिक स्थिती जसजशी मजबूत होत जाईल तसे सद्यस्थितीत असणारी दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम वाढवत जावून टप्या-टप्याने ही रक्कम तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडक्या बहीणींना दिली.

सातारा येथील सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण लाभार्थी सन्मान सोहळा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा पालकमंत्री शंभूराज देसाई, महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे, आमदार सर्वश्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील, जयकुमार गोरे, दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, महिला जोपर्यंत सशक्त होत नाही तोपर्यत अर्थव्यवस्था बळकट होत नाही. महिलांना पैसे कुठे कसे खर्च करावे चांगले कळते. या योजनेमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. यातून मिळणाऱ्या पैशाचा उपयोग करुन महिला लहान मोठे उद्योग सुरु करतील. राज्याच्या एकूण विकासाच्या दृष्टीने ही योजना महत्वपूर्ण ठरेल. त्यामुळे ही योजना कायमस्वरुपी सुरु ठेवण्यात येणार असून ती कधीही बंद पडणार नाही. दरमहा दीड हजार रुपयांची रक्कम वाढत जावून टप्या-टप्यापर्यंत तीन हजार रुपयांपर्यंत करण्यात येईल. शासन बहिणींसाठी हक्काचे माहेर आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारी ही ओवाळणी राज्यातील बहिणींना दरमहा मिळत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री भावनिक होत म्हणाले, माझी ताई कष्ट करते, शेतात राबते याची आम्हांला जाणीव आहे, अशा कष्टकरी बहीणींसाठी ही योजना सुरु करण्यात आली असून आत्तापर्यंत राज्यात १ कोटी बहिणींच्या खात्यात ३ हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. शासन समाजातल्या सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. महिला बचत गट, कौशल्य विकास योजना व अन्य योजनांच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विविध उद्योगांच्या माध्यमातून त्यांना ताकत द्यायची आहे. आमची बहीण लखपती झालेली पाहायची आहे. महिलांना आत्मनिर्भर करतानाच त्यांचा आत्मसन्मानही वाढवायचा आहे. ही योजना महिलाना आत्मनिर्भर बनविणारी योजना आहे. लाडक्या बहिणींबरोबरच शासन युवक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी अशा सर्वांनाच बळ देत आहे. त्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तिर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना या योजनांना गती देण्यात येत आहे. विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शासन प्रयत्न करित आहे.
यावेळी त्यांनी १७ ऑगस्ट हा दिवस ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण दिवस म्हणून आपण सर्वांनी साजरा करुया आणि या योजनेचे स्मरण सदैव ठेवूया, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, विकसित भारताची निर्मिती करायची असेल तर महिलांना सक्षम, विकसीत करुन मुख्य प्रवाहात व अर्थकारणात आणावे लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने सांगत असतात. त्यातूनच प्रेरणा घेऊन महाराष्ट्रात शासन महिला केंद्रीत योजना राबवित आहे. एसटीच्या प्रवास भाडे शुल्कात महिलांना ५० टक्के सुट यासारख्या योजनेमुळे तोट्यात असलेली एसटी महामंडळ नफ्यात आले आहे. मुलींसाठी मोफत शिक्षण योजना याबरोबरच आता ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ ही क्रांतिकारी योजना शासन राबवित आहे. आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. लवकरच आणखी एक कोटी महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील.
शेतकऱ्यांचे पुढील पाच वर्षाचे वीज बिल शासन भरणार आहे. १२ हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती करत असून येत्या काळात १२ महिने दिवसा वीज देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राज्यासाठी आदर्शवत ठरणारे उपक्रम राबविण्यात सातारा जिल्हा अग्रेसर आहे. पहिले पुस्तकाचे गाव सातारा जिल्ह्यातले, पहिले मधाचे गाव सातारा जिल्ह्यातले, आता पहिले सौर उर्जेचे गाव मान्याची वाडी होत आहे. या गावाला त्यामुळे मोफत वीज मिळणार आहे. मान्याची वाडीप्रमाणे राज्यातील अन्य गावांनीही त्यांचा आदर्श घेऊन गावे सौर उर्जेवर चालणारी करावीत असे आवाहनही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.

यावेळी त्यांनी सातारा पोलीस दलाकडून महिलांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात उपायोजनांबाबत कौतुक केले. भरोसा केंद्राचे भूमिपूजन, ॲटोरिक्षामध्ये क्युआर कोड प्रणाली, बसेसमध्ये कॅमेरे, महिलांसाठी हेल्पलाईन या सर्व उपक्रमांबद्दल पोलीस दलाचे अभिनंदन केले.

महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या, सातारा जिल्ह्यात ५ लाख २१ हजारापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्वांत जास्त ऑनलाईन नोंदणी गतीमान पद्धतीने झाली आहे. ९० टक्क्यापेक्षा अधिक बहिणींना लाभ वितरित झाला आहे. ज्यांचे आधार लिंकींग झाले नाहीत त्यांचे आधार लिकींग करण्याचे काम सुरु आहे. त्यांच्या खात्यावरही पैसे जमा होतील. या योजनेत अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक, डेटा ऑपरेटर यांचे योगदान महत्वपूर्ण आहे.

प्रास्ताविकात पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे काम सातारा जिल्ह्यात १ जुलै पासून सुरु झाले. पहिल्या पाच दिवसात बहुतांश सर्व अर्ज भरले गेले. घरोघरी, शेतावर, बांधावर, कामाच्या ठिकाणी जावून महिलांकडून अर्ज भरुन घेण्याची संकल्पना प्रथम सातारा जिल्ह्याने सुरु केली. जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी स्वत: लक्ष घालून या योजनेच्या कामाला अतिशय गती दिली. अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर या सर्वांनीच यामध्ये खूप मेहनत घेतली आहे. बहुतांश महिलांच्या खात्यावर योजनेचे दोन हप्ते जमा झाले आहेत. या योजनेच्या लाभार्थी असणाऱ्या लाडक्या बहिणी समाधानी झाल्या आहेत. खऱ्या अर्थाने रक्षाबंधन सण गोड करण्याचे काम शासनाने केले आहे.

या कार्यक्रमास वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्ह्याच्या विविध भागातून पन्नास हजारहून अधिक महिला भगिनी उपस्थित होत्या.

Ladki Bahin Yojana

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात