वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगर येथील राऊ आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी साचल्याने तीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी रविवारी कोचिंग मालक आणि समन्वयकाला अटक केली होती. पोलिसांनी आज सोमवारी सांगितले की, याप्रकरणी आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे.7 people including owner arrested in Delhi IAS coaching incident; Two engineers were also suspended
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार पोलिसांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्यांमध्ये कोचिंग क्लाससमोर वेगाने कार चालवणाऱ्या व्यक्तीचा समावेश आहे. गाडी वेगाने चालवल्यामुळे पाण्याचा दाब वाढून तळघराचे गेट तुटल्याचे दिसते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यानंतर तळघरात बांधलेल्या लायब्ररीत पाणी भरले आणि विद्यार्थी बुडू लागले.
दुसरीकडे जुन्या राजेंद्र नगरातील नाल्याच्या आजूबाजूचे अतिक्रमण बुलडोझरच्या साहाय्याने हटविण्यात आले. त्याच वेळी एमसीडीने एका कनिष्ठ अभियंत्याला आणि सहायक अभियंत्याला निलंबित केले आहे. याशिवाय कोचिंगचे विद्यार्थी सलग दुसऱ्या दिवशी एमसीडी आणि प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करत आहेत.
विद्यार्थी कसे बुडाले…
27 जुलैच्या रात्री इमारतीतील वीज खंडित झाल्याने तळघरातील वाचनालयाचे बायोमेट्रिक गेट जाम झाले. विद्यार्थी लायब्ररीत अंधारात अडकले. सुरुवातीला गेट बंद असल्याने तळघरात पाणी शिरले नाही, मात्र काही मिनिटांनी पाण्याचा दाब वाढून गेट तुटले. गेट तुटल्यानंतर तळघरात वेगाने पाणी भरू लागले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. प्रवाह इतका जोराचा होता की पायऱ्या चढणे कठीण झाले होते. काही सेकंदातच गुडघाभर पाणी होते. अशा स्थितीत विद्यार्थी बाकावर उभे राहिले. अवघ्या 2-3 मिनिटांत संपूर्ण तळघर 10-12 फूट पाण्याने भरले. विद्यार्थ्यांना वाचवण्यासाठी दोरी फेकण्यात आली, मात्र पाणी घाण असल्याने दोरी दिसत नव्हती. बाकही पाण्यात तरंगत होते. त्यामुळे बचावकार्यात अडचणी येत होत्या. रात्री उशिरा 3 विद्यार्थ्यांचे मृतदेह सापडले. दोरीच्या साहाय्याने 14 मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. बचावकार्य अंतिम टप्प्यात असताना आतमध्ये 7 फूट पाणी होते.
काय-काय कारवाई झाली…
मालक आणि संयोजकासह 7 अटकेत
कोचिंगचे मालक अभिषेक गुप्ता आणि समन्वयक देशपाल सिंग यांना अटक करण्यात आली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, या घटनेबाबत बीएनएसच्या कलम 105, 106 (1), 152, 290 आणि 35 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. याशिवाय अन्य 5 जणांनाही अटक करण्यात आली आहे.
दंडाधिकारीय चौकशीचे आदेश
दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी मुख्य सचिव नरेश कुमार यांना दंडाधिकारी चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले. या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
13 कोचिंग सेंटर्स सील
एमसीडीने बेसमेंटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेली 13 कोचिंग सेंटर्स सील केली. तसेच संस्थांवर नोटिसा चिकटवून त्यांचे उत्तर मागविण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी दिल्ली नगरपालिकेने जुन्या राजेंद्र नगरमध्ये अशा तीन तळघरांना कुलूप लावले, जिथे राऊ आयएएस सारखी घटना घडण्याची शक्यता होती.
1 कनिष्ठ अभियंता, 1 सहायक अभियंता निलंबित
एमसीडीचे आयुक्त अश्विनी कुमार यांनी सांगितले की, एमसीडीने एक कनिष्ठ अभियंता आणि एका सहाय्यक अभियंत्याला निलंबित केले आहे. महापौर शेली ओबेरॉय यांनी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगितल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App