भारताच्या विकासात आपला वाटा मिळविताना व्हिक्टिमहूडची भावना नको!!; सरसंघचालकांचा इशारा

विशेष प्रतिनिधी

नागपूर : भारताच्या विकासात आपला वाटा मिळवताना आपापसात स्पर्धा जरूर होईल. मतभेद होतील. काही ठिकाणी संघर्षही होईल, पण हे सर्व करताना आपल्या एकात्मतेचे सूत्र विसरता कामा नये. भारताच्या विकासात आपला वाटा मिळवताना आपली व्हिक्टिमहूडची भावना असता कामा नये, असा स्पष्ट इशारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी विजयादशमी उत्सवानिमित्त दिला. RSS dasera festival celebration

विजयादशमीनिमित्त सरसंघचालकांचे संबोधन हे संघाच्या पुढील वाटचालीचे मार्गदर्शन असते. या पार्श्वभूमीवर डॉ. मोहन भागवत यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण वक्तव्य देखील केले. भारतीयांची एकात्मतेची भावना तोडण्यासाठी बाह्य शक्ती प्रयत्न करत राहतील, पण त्याला भारतीयांनी आपल्या कृतीतून उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

सरसंघचालकांचे संबोधन असे :

‘आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री शंकर महादेवनजी, मंचावर उपस्थित मा. सरकार्यवाहजी, विदर्भ प्रांताचे मा. संघचालक, नागपूर महानगराचे मा. संघचालक, नागपूर महानगराचे मा. सहसंघचालक अन्य अधिकारी गण, नागरिक सज्जन, माता- भगिनी आणि आत्मीय स्वयंसेवक बंधू.

दानवतेवर मानवतेचा संपूर्ण विजय म्हणून आपण दरवर्षी विजयादशमी हा सण साजरा करतो. यंदा देखील हा सण आपल्यासाठी अभिमान, आनंद आणि उत्साह वाढविणाऱ्या घटना घेऊन आला आहे.

ह्या वर्षी, आपला देश G-20 नावाच्या प्रमुख राष्ट्रांच्या परिषदेचा यजमान होता. वर्षभरात भारतात अनेक ठिकाणी राष्ट्राध्यक्ष, मंत्री, प्रशासक आणि सदस्य राष्ट्रांच्या महानुभावांचे अनेक कार्यक्रम झाले. भारतीयांच्या प्रेमळ आदरातिथ्याचा अनुभव, भारताचा गौरवशाली इतिहास आणि वर्तमानातील रोमांचक प्रवासाने सर्व देशांतील सहभागी अत्यंत प्रभावित झाले. आफ्रिकेतील देशांच्या ‘आफ्रिकन युनियन’ला जी -20 समुहाचा सदस्य म्हणून स्वीकारण्यात आणि परिषदेच्या पहिल्याच दिवशी तसा प्रस्ताव घोषित करून एकमताने मंजूर करण्यात भारताची खरी सद्भावना आणि राजनयिक कुशलता सर्वांनीच अनुभवली. भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण विचारांमुळे आणि दूरदृष्टीमुळे अखिल जगताच्या चिंतनाला ‘वसुधैव कुटुंबकम’ची दिशा मिळाली. G-20 ची अर्थकेंद्रित संकल्पना आता मानवकेंद्रित झाली. या निमित्ताने जागतिक पटलावर भारताला एक प्रमुख राष्ट्र म्हणून खंबीरपणे प्रस्थापित करण्याचे प्रशंसनीय कार्य आपल्या नेतृत्वाने यथार्थपणे केले आहे.

यावेळी, प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशाच्या खेळाडूंनी 28 सुवर्ण, 38 रौप्य आणि 41 कांस्य अशी एकूण 107 पदकांची कमाई करीत प्रथमच 100 हून अधिक पदके जिंकून आपल्या सर्वांनाच प्रोत्साहित, आनंदित केले आहे. त्यासाठी आम्ही सर्व खेळाडूंचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. ‘चांद्रयाना’च्या निमित्ताने उदयोन्मुख भारताच्या शक्ती, बुद्धी आणि कौशल्याची झलकही जगाने पाहिली आहे. आमच्या शास्त्रज्ञांच्या तंत्रज्ञान आणि तंत्रकुशलतेला नेतृत्वाच्या इच्छाशक्तीची जोड मिळाली. अंतराळयुगाच्या इतिहासात प्रथमच भारताचे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरले. सर्व भारतीयांचा अभिमान आणि आत्मविश्वास वाढवणारे हे काम ज्या शास्त्रज्ञांनी यथासांग पूर्ण केले त्यांचे आणि त्यांना बळ देणाऱ्या नेतृत्वाचे, देशभर सर्वत्र कौतुक होत आहे.

राष्ट्राचे जागतिक दायित्व सिद्धीस नेणाऱ्या राष्ट्रीय आदर्शांतूनच संपूर्ण राष्ट्राच्या पुरुषार्थाचा उगम होतो. त्यामुळेच आपल्या राज्यघटनेच्या मूळ प्रतीत एका पानावर ज्यांचे चित्र आहे, असे धर्माचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या श्रीरामांच्या बालस्वरूपातील प्रतिमेचे मंदिर अयोध्येत उभारले जात आहे. येत्या 22 जानेवारीला त्या मंदिराच्या गर्भगृहात श्री रामललाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. व्यवस्थेच्या मर्यादा आणि सुरक्षेची सावधानता लक्षात घेऊन अयोध्येत त्या शुभ प्रसंगी केवळ मर्यादित संख्येतंच उपस्थित राहता येणार आहे. श्रीराम हे आपल्या देशाच्या आचरणातील मर्यादा, कर्तव्यपालन, तसेच स्नेह आणि करुणेचे प्रतीक आहेत. सर्वत्र असाच भाव जागविणारे वातावरण निर्माण व्हावे. अयोध्येतील राममंदिरात श्री रामलल्लाच्या प्रवेशाने, प्रत्येकाच्या हृदयात आपल्या मनातील राम जागा व्हावा, मनाची अयोध्या सजवावी आणि सर्वत्र प्रेम, पुरुषार्थ आणि उल्हासाचे वातावरण निर्माण व्हावे, सर्वत्र सद्भावना निर्माण व्हावी, यासाठी अनेक ठिकाणी छोटे छोटे कार्यक्रम आयोजित केले जावेत.

शतकानुशतके संकटाच्या परंपरेशी झुंज देऊन विजयी झालेले आपले भारतराष्ट्र भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीच्या मार्गावर दृढनिश्चय करून मार्गक्रमण करत असल्याचे दर्शवणाऱ्या या घटनांचे आपण सारे भाग्यवान साक्षीदार आहोत.

आपल्या जीवनातून संपूर्ण जगाला अहिंसा, जीवदया आणि सदाचार शिकविणारा सन्मार्ग देणाऱ्या श्री महावीर स्वामींचे 2550 वे निर्वाण वर्ष, हिंदवी स्वराज्यस्थापना आणि न्याययुक्त लोककल्याणकारी कारभाराद्वारे परकीयांच्या 350 वर्षांच्या लादलेल्या पारतंत्र्यातून मुक्तीचा मार्ग दाखविणाऱ्या छत्रपती श्री.शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे 350 वे वर्ष आणि ब्रिटीश राजवटीने लादलेल्या परवशतेतून मुक्त होण्यासाठी ‘सत्यार्थप्रकाश’ ह्या मौलिक ग्रंथातून ‘स्व’ चा स्पष्ट बोध करून देणाऱ्या महर्षी दयानंद सरस्वती यांची 200 वे जयंतीवर्ष अशा तीन वैशिष्ट्यांनी युक्त असे हे वर्ष आपण उत्साहात साजरे करत आहोत.

येणारे वर्ष हे अशा राष्ट्रीय पुरुषार्थासाठी चिरंतन प्रेरणा असलेल्या दोन व्यक्तिमत्त्वांच्या स्मरणाचे वर्ष आहे. अस्मिता आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारी तसेच उद्यम, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रमाबरोबरच प्रशासकीय कौशल्य आणि प्रजाहितदक्षतेची प्रतीक असलेल्या राणी दुर्गावतीचे 500 वे जयंतीवर्ष आहे. भारतीय महिलांच्या सर्वगामी कर्तृत्व, नेतृत्वक्षमता, उज्ज्वल शील आणि जाज्वल्य देशभक्तीच्या त्या एक दैदिप्यमान आदर्श आहेत.

त्याचप्रमाणे आपल्या प्रजाहितदक्ष प्रशासनकौशल्याने सामाजिक विषमता मुळापासून नष्ट करण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचणाऱ्या कोल्हापूरचे (महाराष्ट्र) राज्यकर्ते छत्रपती शाहूजी महाराज यांचेही हे 150 वे जयंतीवर्ष आहे.

तमिळ संत श्रीमद रामलिंग वल्लालर यांचे हे 200 वे वर्ष आहे, ज्यांनी आपल्या तरुणवयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी जागर सुरू केला. तसेच गोरगरिबांना अन्नदान करण्यासाठी त्यांनी ६पेटविलेली चूल तामिळनाडूमध्ये प्रज्वलित आहे आणि आपले कार्य करत आहे. स्वातंत्र्यासोबतच समाजाच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक जागरणासाठी आणि सामाजिक विषमतेच्या निर्मूलनासाठी ते आयुष्यभर कार्यरत राहिले. या प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांच्या जीवनस्मरणातून आपल्या स्वातंत्र्याच्या ह्या अमृत महोत्सवाच्या पर्वकाळात आपणा सर्वांना सामाजिक समता, एकात्मता आणि आपल्या ‘स्व’च्या रक्षणाचा संदेश मिळतो.

आपल्या ‘स्व’ चे आणि ‘स्व’ अशा ओळखीचे संरक्षण करणे ही माणसाची नैसर्गिक इच्छा असते आणि त्यासाठी सहजच प्रयत्न असतात. आजकाल, वेगाने एकमेकांच्या जवळ येत असलेल्या जगात, सर्व राष्ट्रांमध्ये याबद्दल काळजी करण्याची प्रवृत्ती वाढली आहे. संपूर्ण जगाला एकाच रंगात रंगविण्याचा किंवा एकरूपता साधण्याचा कोणताही प्रयत्न आजवर यशस्वी झाला नाही आणि भविष्यातही यशस्वी होणार नाही. भारताच्या स्व’स्वरूपाची ओळख आणि हिंदू समाजाची अस्मिता टिकवून ठेवण्याचा विचार स्वाभाविकच आहे. आजच्या जगाच्या समकालीन गरजांची पूर्तता करण्यासाठी, काळाशी सुसंगत, स्वतःच्या मूल्यांच्या आधारे भारताने नवे रूप घेऊन उभे राहावे, ही जगाचीही अपेक्षा आहे. पंथ-संप्रदायातून निर्माण झालेल्या कट्टरता, अहंता आणि धर्मांधतेला आज जगाला तोंड द्यावे लागत आहे. स्वार्थ आणि लालसेतून उद्भवलेल्या युक्रेन किंवा गाझा पट्टी येथील युद्ध वा तदृश तंट्यांची सोडवणूक दृष्टीपथात दिसत नाही. निसर्गाशी विसंगत जीवनशैली, स्वैराचार आणि भोगवादातून नवे नवे मनोविकार आणि शरीरव्याधी उत्पन्न होत आहेत. विकृती आणि अपराध वाढताना दिसताहेत. आत्यंतिक व्यक्तिवादामुळे कुटुंबे मोडून पडताना दिसत आहेत. निसर्गाच्या अमर्याद शोषणामुळे प्रदूषण, जागतिक तापमानवृद्धी, असंतुलित ऋतुमान अशा आपत्ती प्रतिवर्षी वाढताना दिसत आहेत. आतंकवाद, शोषण आणि सत्ताकांक्षा यांना मोकळं रान मिळालं आहे. आजचे जग संकुचित विचारांच्या आधारे ह्या साऱ्या समस्यांवर मात करू शकणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे. परिणामत: आपली सनातन जीवनमूल्ये आणि संस्कारव्यवस्था यांच्या आधारे भारतानेच आपल्या उदाहरणातून जगाला शाश्वत सुखशांतीचा नवा मार्ग दाखवावा अशी अपेक्षा जागली आहे.
या परिस्थितींची एक छोटीशी आवृत्ती भारतातही आपल्यासमोर आहे. उदाहरणार्थ, अलीकडे आपण हिमालयीन प्रदेशात हिमाचल आणि उत्तराखंडापासून सिक्कीमपर्यंत सातत्याने नैसर्गिक आपत्तींचा जीवघेणा खेळ आपण पाहत आहोत. या घटनांमुळे भविष्यात काही गंभीर आणि व्यापक संकट येण्याची शक्यता असल्याची शंकाही व्यक्त होत आहे.

भारताच्या उत्तरेकडील सीमारेषेची निश्चिती करणारा हा भाग देशाच्या सीमा सुरक्षा, जल सुरक्षा आणि पर्यावरणीय आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आणि त्याचे कोणत्याही स्थितीत सर्वथा रक्षण करणे आवश्यक आहे. सुरक्षा, पर्यावरण, लोकसंख्या आणि विकासाच्या दृष्टिकोनातून हा संपूर्ण प्रदेश एकच घटक मानून हिमालयीन प्रदेशाचा विचार करावा लागेल. हे नयनरम्य क्षेत्र अजूनही भूवैज्ञानिकदृष्ट्या नवीन असल्याने त्यामुळे अस्थिर आहे. ह्या प्रदेशाची भूपृष्ठ, भूगर्भ, जैवविविधता आणि भूगर्भातील जलस्त्रोतांची वैशिष्ट्ये जाणून न घेता इथे मन मानेल तशा विकास योजना राबवण्यात आल्या. या गोंधळाचा परिणाम म्हणून हा प्रदेश आणि त्यामुळे संपूर्ण देशच संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे.

भारतासह पूर्व आणि दक्षिण पूर्व आशियातील सर्व देशांना पाणीपुरवठा करणारा हा प्रदेश आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे. या भागात अनेक वर्षांपासून भारताच्या उत्तर सीमेवर चीनच्या कुरबुरी ऐकू येत आहे. त्यामुळे या क्षेत्राला विशेष भूवैज्ञानिक, सामरिक आणि राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ते लक्षात घेऊन या क्षेत्राचा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल.

हिमालयीन क्षेत्रात घडणाऱ्या या घटनांतून संपूर्ण देशाला काही स्पष्ट संकेत मिळत आहेत. संकुचित, निखळ भौतिकवाद आणि टोकाच्या उपभोगवादी दृष्टीवर आधारित विकासाच्या मार्गांमुळे मानवता आणि निसर्ग हळूहळू पण निश्चितपणे विनाशाकडे वाटचाल करत आहेत. जगभरात ही चिंता वाढली आहे. त्या अयशस्वी वाटांचा त्याग करून किंवा हळूहळू त्यांना मागे सारून, भारतीय मूल्ये आणि समग्र एकात्म दृष्टीवर आधारित स्वतःचा विकास मार्ग भारताला तयार करावा लागेल, जो काळाशी सुसंगत आणि तंत्रज्ञानाने अद्ययावत असेल. हे भारतासाठी सर्वथा उपयुक्त आणि संपूर्ण जगासाठीही एक अनुकरणीय प्रारूप बनू शकते.

त्यासाठी या जुन्या आणि अयशस्वी मार्गावर चालत राहण्याची अंधानुकरणातून आलेली आडमुठी आणि पोथीनिष्ठ मानसिक गुलामीची प्रवृत्ती सोडून द्यावी लागेल. औपनिवेशिक मानसिकतेपासून मुक्त होऊन आपल्या देशाला जे योग्य तेच जगाकडून घ्यावे लागेल. आपल्या देशात जे आहे ते काळाला साजेसे करून आपला ‘स्व’ आधारित स्वदेशी विकासाचा मार्ग स्वीकारणे ही काळाची नितांत गरज आहे.

या दृष्टिकोनातून, अलीकडच्या काळात काही धोरणात्मक बदल झाले आहेत हे लक्षात घेण्यासारखे आहे. समाजातही कृषी, उद्योग आणि व्यापार, संबंधित सेवा, सहकार आणि स्वयंरोजगार या क्षेत्रांत नवनवीन यशस्वी प्रयोगांची संख्या सातत्याने वाढत आहे. परंतु प्रशासन आणि सर्वच क्षेत्रांतील विचार करणार्या, समाजाला दिशा देणार्या विचारवंतांमध्ये अशा प्रकारच्या प्रबोधनाची अधिक गरज आहे.

सरकारचे ‘स्व’ आधारित युगानुकूल धोरण, प्रशासनाचे तत्पर, सुसंगत, लोकाभिमुख काम आणि कृती, आणि समाजाचा कायावाचामनाने सहभाग आणि पाठबळ यातूनच देश परिवर्तनाच्या दिशेने पुढे पुढे मार्गक्रमण करीत जाईल.

पण हे शक्य होऊ नये, समाजाचे विघटन होऊन विलगता आणि आपापसातील संघर्ष वाढत जावेत यासाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. आपल्या अज्ञानामुळे, अविवेकीपणामुळे, परस्परांवरचा अविश्वास किंवा निष्काळजीपणामुळे समाजात काही ठिकाणी असे अनपेक्षित उपद्रव आणि सामाजिक भेद वाढताना दिसतात.

भारताच्या उन्नयनाचे प्रयोजन विश्वकल्याण हेच आहे. परंतु या उदयाचा स्वाभाविक परिणाम म्हणून स्वार्थी, भेदभाव करणाऱ्या आणि कपटी शक्ती आपल्या हितसंबंधांसाठी भारताला मर्यादित किंवा नियंत्रित करण्याचा कुटील प्रयत्न करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याकडून सतत विरोध होत आहे. या विभेदकारी शक्ती कुठल्या ना कुठल्या विचारसरणीचे मुखवटे घेतात, काही आकर्षक घोषणा करतात किंवा विशिष्ट ध्येयासाठी काम करत असल्याचा केवळ आव आणतात, परंतु त्यांचे खरे उद्दिष्ट काही वेगळेच असते. आणि म्हणूनच प्रामाणिकपणाने आणि निस्वार्थ बुद्धीने काम करणारी माणसे, त्यांची विचारधारा किंवा कार्य कोणतेही असो, त्यांच्यासाठी नेहमीच अडथळा ठरतात.

जरी आजकाल या सर्वभक्षी शक्तींचे लोक स्वतःला सांस्कृतिक मार्क्सवादी किंवा वोक (Woke) म्हणजेच जागे झालेले म्हणवत असले तरीही 1920च्या दशकातच ते मार्क्सला विसरले आहेत. ते जगातील सर्व सुव्यवस्था, मांगल्य, संस्कार आणि संयम यांना विरोध करतात. मूठभर लोकांचे संपूर्ण मानवजातीवर नियंत्रण राहण्यासाठी, ते अराजकता आणि स्वैराचरणाचा पुरस्कार करतात, त्याचाच प्रचार, प्रसार करतात. प्रसारमाध्यमे आणि अकादमींना हाताशी धरून देशाचे शिक्षण, मूल्ये, राजकारण आणि सामाजिक वातावरण भ्रम आणि भ्रष्ट व्यवहाराने कलंकित करण्याची त्यांची कार्यशैली आहे.

अशा वातावरणात खोट्या, विपर्यस्त आणि अतिरंजित वृत्तप्रसारणातून भीती, संभ्रम आणि द्वेष सहज पसरतो. परस्पर संघर्षात गुरफटलेला, गोंधळात अडकलेला, दुर्बल आणि विखुरलेला समाज नकळत सर्वत्र स्वतःचे वर्चस्व मिळवू पाहणाऱ्या या विध्वंसक शक्तींचा शिकार होतो. आपल्या परंपरेत अशा प्रकारे गोंधळ आणि परस्पर द्वेष निर्माण करण्याच्या पद्धतीला मंत्र विप्लव म्हणतात.

देशात आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्याच्या हेतूने अशा अनिष्ट शक्तींशी युती करण्याचा अविवेक केला जात आहे. समाज आधीच आत्मविस्मृत होऊन विविध प्रकारच्या भेदांनी ग्रासलेला आणि स्वार्थ, मत्सर अन् द्वेषाच्या जीवघेण्या स्पर्धेत अडकलेला आहे. त्यामुळेच या राक्षसी शक्तींना समाज किंवा राष्ट्र तोडू पाहणाऱ्या अंतर्गत किंवा बाह्य शक्तींचाही सहज पाठिंबा मिळतो.

मणिपूरची सद्यस्थिती पाहिली तर ही गोष्ट लगेच लक्षात येते. जवळपास दशकभर शांतता प्रस्थापित असलेल्या मणिपूरमध्ये हा परस्पर कलह अचानक कसा उफाळून आला? हिंसाचार करणाऱ्यांमध्ये सीमेपलीकडील अतिरेकीही होते का?

आपल्या अस्तित्वाच्या भवितव्याबाबत धास्तावलेल्या मणिपुरी मैतेई समाज आणि कुकी समाजाच्या या परस्पर संघर्षाला जातीय वा धार्मिक स्वरूप देण्याचा हा प्रयत्न का आणि कोणाकडून करण्यात आला? वर्षानुवर्षे सर्वांची समान दृष्टीने विनाकारण सेवा करत असलेल्या संघासारख्या संघटनेला खेचण्याचा प्रयत्न का केला जात आहे. यामध्ये कोणाचे निहित स्वार्थ आहेत ? या सीमावर्ती भागात नागभूमी आणि मिझोराममध्ये वसलेल्या मणिपूरमधील अशा अशांतता आणि अस्थिरतेचा फायदा घेण्यात कोणत्या परकीय शक्तींना स्वारस्य असू शकते? आग्नेय आशियातील भू-राजकारणाचीही यांत काही भूमिका आहे का? देशात मजबूत सरकार असूनही कोणाच्या जोरावर, ताकदीवर हा हिंसाचार इतके दिवस अव्याहतपणे सुरू आहे?

गेल्या 9 वर्षांपासून सुरू असलेली शांतता कायम ठेवण्याचे काम राज्य सरकार करत असतानाही हा हिंसाचार का सुरू झाला आणि कोणी सुरु केला ? आजच्या परिस्थितीत, संघर्षाच्या दोन्ही बाजूंचे लोक शांतता शोधत असताना, त्या दिशेने कोणतेही सकारात्मक पाऊल उचलताना दिसताच दुर्घटना घडवून पुन्हा द्वेष आणि हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्या कोणत्या शक्ती कार्यरत आहेत?
ही दुर्दैवी परिस्थिती,समस्या सोडवण्यासाठी बहुआयामी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, अनुरूप सक्रियता आणि कार्यक्षमता ही काळाची गरज असतानाच, समाजातील प्रबोधनशील नेतृत्वालाही परस्परांमधील अविश्वासाची दरी भरून काढण्यासाठी विशेष भूमिका बजावावी लागेल.

संघाचे स्वयंसेवक सातत्याने सर्वांची सेवा करत असून समाज स्तरावर मदतकार्य करत आहेत आणि समाजातील सज्जनशक्तीला पुन्हा शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन करत आहेत. प्रत्येकाला आपले मानून, सर्व प्रकारचे मोल चुकवून, समजावणी करीत प्रत्येकाला सुरक्षित, सुव्यवस्थित, सद्भावपूर्ण आणि शांत ठेवण्याचा संघाचा प्रयत्न आहे. विद्यमान भयंकर आणि उद्वेगजनक परिस्थितीतही आमच्या कार्यकर्त्यांनी ज्या शांत मनाने परिस्थिती हाताळत सर्वांचा सांभाळ करण्याचा प्रयत्न केला त्या स्वयंसेवकांचा आम्हाला अभिमान आहे.
या ‘मंत्र विप्लवा’वर योग्य उत्तर समाजाच्या एकजुटीतूनच शोधावे लागेल. प्रत्येक परिस्थितीत ही एकात्मतेची भावना समाजाचा विवेक जागृत ठेवणारी आहे. भावनिक एकता साधणे हे मार्गदर्शक तत्व म्हणून संविधानातही नमूद केले आहे. प्रत्येक देशात ही एकात्मतेची भावना निर्माण करणारे आधार वेगवेगळे असते. काही ठिकाणी, त्या देशाची भाषा, काही ठिकाणी त्या देशातील रहिवाशांची उपासना पद्धती, श्रद्धा, विश्वास, काही ठिकाणी सर्वांचे समान व्यावसायिक हित, तर काही ठिकाणी एक मजबूत केंद्रीय सत्ता देशातील लोकांना एकत्र बांधून ठेवते.

परंतु मानवनिर्मित कृत्रिम पायावर किंवा सामान्य स्वार्थाच्या आधारे निर्माण झालेली एकता टिकणारी नसते. आपल्या देशात इतकी विविधता आहे की लोकांना या देशाचे एक देश म्हणून अस्तित्व समजायलाच मुळात वेळ लागतो. पण आपला हा देश, एक राष्ट्र आणि एक समाज म्हणून जगाच्या इतिहासातील सर्व चढउतारांना तोंड देत आपल्या भूतकाळातील धाग्यांशी असलेले अतूट नाते जपत जीवित आहे.

यूनान मिस्र रोमा सबमिट गए, जहा से, अब तक मगर है बाकी नामोनिशा हमारा,
कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी, सदियों रहा है दुश्मन दौरे जहाँ हमारा”

भारताबाहेरील लोकांचे मन थक्क व्हावे, पण आकर्षितही व्हावे अशा एकात्मतेच्या परंपरेचा आपल्याला वारसा मिळाला आहे. त्याचे रहस्य काय आहे? निःसंशयपणे, ही आपली सर्वसमावेशक संस्कृती आहे. पूजा, परंपरा, भाषा, प्रदेश, जात इ.च्या भेदांच्या वरती उठून आपल्या कुटुंबापासून संपूर्ण जगापर्यंत आपुलकी वाढविणारी आपली आचरणाची, जीवन जगण्याची रीत आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्या अस्तित्वाच्या एकतेच्या सत्याचा साक्षात्कार घेतला.

परिणामी, शरीर, मन आणि बुद्धी या तिन्हींची प्रगती करताना, तिघांनाही सुख देणारे आणि अर्थ ,काम यांना एकसाथ मोक्षाच्या दिशेने घेऊन जाणारे धर्मतत्त्व त्यांना अवगत झाले. त्या प्रतितीच्या आधारावर त्यांनी धर्मतत्वाच्या सत्य,करुणा, शुद्धता आणि तप या चार मूलभूत मूल्यांचे आचरणातून दर्शन घडविणारी संस्कृती विकसित केली. सर्व बाजूंनी सुरक्षित आणि समृद्ध असलेल्या आपल्या मातृभूमीतील अन्न, पाणी आणि हवा यामुळेच हे सगळे शक्य झाले.

म्हणून आपण आपल्या भारतीय भूमीला आपल्या संस्कारांची अधिष्टात्री माता मानतो आणि तिची भक्ती करतो. अलीकडेच आपण आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्यलढ्यातील महापुरुषांचे स्मरण केले. आपल्या धर्माचे, संस्कृतीचे, समाजाचे आणि देशाचे रक्षण करणारे, त्यात वेळोवेळी आवश्यक सुधारणा करून त्याचा मान वाढवणारे हे महापुरुष आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद आणि अनुकरणीय आहेत.

हे तीन घटक (मातृभूमीबद्दलची भक्ती, पूर्वजांचा अभिमान आणि सर्वांची समान संस्कृती) जी आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या भाषा, प्रदेश, पंथ, संप्रदाय, जात, पोटजाती इत्यादी सर्व विविधतेला एकाच सूत्रात बांधून ठेवणारी मातृभूमीची भक्ती, पूर्वजांविषयीचा अभिमान आणि समान संस्कृती ही तीन तत्वेच आमच्या एकतेचे अक्षुण्ण सूत्र आहे.

समाजाची शाश्वत एकता स्वार्थी व्यवहारातून नाही तर आपुलकीतून निर्माण होते.आपला समाज खूप मोठा आहे. खूप विविधतापूर्ण आहे. इतिहासाच्या कालक्रमात काही आक्रमकांच्या परंपराही आपल्या देशात आल्या, तरीही आपला समाज वरील तीन गोष्टींच्या आधारे एक समाज, राष्ट्र बनून स्थिर राहिला. त्यामुळे जेव्हा आपण एकात्मतेबद्दल बोलतो तेव्हा हे ध्यानात ठेवायला हवे की ही एकता कोणत्याही देवाणघेवाणीतून जन्माला आलेली नाही. आणि जर तुम्ही तसे जबरदस्तीने करण्याचा प्रयत्न केलात तर ते बिघडून जाईल.

आजच्या वातावरणात समाजात तेढ पसरवण्याचे सुरू असलेले प्रयत्न पाहून अनेकांना स्वाभाविकच चिंता वाटते. ते भेटतही असतात. स्वत:ला हिंदू म्हणवून घेणारे भेटतात तसेच उपासना पद्धतीमुळे ज्यांना मुस्लिम किंवा ख्रिश्चन म्हटले जाते, अशी माणसेही भेटतात. त्यांचा असा विश्वास आहे की फितना, फसाद (संघर्ष) आणि कितान दूर सारून सुलह, सलामती आणि अमन यांच्या वाटेने जाण्यातच श्रेष्ठता आहे. या चर्चांमधली ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की केवळ योगायोगाने एकाच भूमीवर आलेल्या विभिन्न समुदायांच्या एक होण्याविषयी हे बोलणे नाही.

आपण, समान पूर्वजांचे वंशज, एकाच मातृभूमीचे संतान, एका संस्कृतीचे वारसदार, आपली परस्पर एकता विसरलो आहोत. आपले ते मूळ एकत्व समजून घेऊन त्याच आधारावर पुन्हा एकत्र यायला हवे.

आम्हाला एकमेकांविषयी काही समस्या नाहीत का? आपल्या स्वतःच्या विकासासाठी आपल्या काही गरजा आणि अपेक्षा नाहीत का? आपल्याला हवे ते मिळविण्यासाठी आपली एकमेकांशी स्पर्धा नाही काय? आपण सर्वजण आपल्या विचार, शब्द आणि कृतीतून या एकतेच्या तत्त्वांचे पालन करतो का? प्रत्येकाला हे माहित आहे की प्रत्येकाचे हे असे नाही. पण हे व्हावे अशी इच्छा असणाऱ्यांनी आधी समस्या संपल्या पाहिजेत, आधी प्रश्न सुटले पाहिजेत, मग एकात्मतेच्या बाबींवर लक्ष केंद्रित करू, असे सांगून चालणार नाही. आपण हे समजून घ्यायला हवे की आपण आपुलकीने आपल्या वागणुकीला सुरुवात केली तर त्यातूनच समस्यांची उत्तरे मिळतील. उपाय सापडतील. कुठेतरी घडलेल्या घटनांविषयी वाचून विचलित न होता शांततेने आणि संयमाने काम करावे लागेल. समस्या खऱ्या आहेत पण त्या फक्त एका जाती किंवा वर्गापुरत्या मर्यादित नाहीत.

त्या सोडवण्याच्या प्रयत्नांबरोबरच आत्मीयता आणि एकात्मतेची मानसिकताही निर्माण करावी लागेल. माझाच बळी दिला जातो अशी व्हिक्टिमहूडची मानसिकता, परस्परांविषयी अविश्वास अथवा राजकीय वर्चस्वाच्या डावपेचांपासून दूर जावे लागेल. अशा कामांमध्ये राजकारणच अडथळा ठरते. हा शरणागतीचा किंवा हतबलतेचा प्रकार नाही. वा दोन युद्ध करणाऱ्या पक्षांमधला युद्धविराम देखील नाही.

भारतातील सर्व विविधतांमध्ये परस्पर एकतेची जी सूत्रे आहेत त्याच सूत्रांना ही आपलेपणाची साद आहे. आपल्या स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेचेही हे ७५ वे वर्ष सुरू आहे. ते संविधानही आपल्याला हीच सद्भावनेची दिशा दाखवते. संविधान प्रदान करताना आदरणीय डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेत दिलेल्या दोन भाषणांकडे लक्ष दिले तर यातील मर्म आपल्या लक्षात येईल.

हे अचानक होणारे काम नाही. जुन्या संघर्षांच्या कटू आठवणी अजूनही समाजाच्या मनात रेंगाळत आहेत. फाळणीच्या भीषणतेची जखम खूप खोल आहे. त्याच्या क्रियाप्रतिक्रियांमुळे मनात निर्माण होणारा राग बोलण्यातून आणि वागण्यातून प्रकट होतो.

एकमेकांच्या वस्तीत घर न मिळण्यापासून ते एकमेकांना तुच्छतेने, तिरस्काराने वागवले जाण्यापर्यंतचे कटू अनुभव गाठीशी आहेत. हिंसा, दंगली, छेडछाड आदी घटनांसाठी एकमेकांवर आरोप करण्याच्या घटनाही घडतात. काही लोकांची कृती ही त्या संपूर्ण समाजाची कृती आहे, असे गृहीत धरून वाणी आणि विचार स्वैर सोडले जातात. आव्हाने आणि प्रति-आव्हाने दिली जातात, जी चिथावणीचे काम करतात. ज्या शक्ती आम्हाला एकमेकांत लढवत ठेवून देश तोडू पाहत आहेत ते याचा पुरेपूर फायदा घेतात. त्यामुळेच एखादी छोटीशी घटना देखिल अवास्तव मोठी करून बघता बघता मोठ्या प्रमाणावर प्रसारित केली जाते. देशविदेशातून चिंता व्यक्त करणारी आणि इशारा देणारी विधाने प्रचारित केली जातात. हिंसा भडकवणारे “टूल किट” सक्रिय केले जातात आणि परस्पर अविश्वास आणि द्वेष आणखी वाढविले जातात.
ज्यांना समाजात एकोपा हवा आहे अशा सर्वांनी या अपप्रचाराच्या जीवघेण्या मायाजालातून स्वतःला बाहेर काढायला हवे. या सर्व समस्यांवरचे उपाय हे सावकाशपणे समोर येतील. त्यासाठी देशात विश्वासाचे आणि सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे ही पूर्वअट आहे.

मन स्थिर ठेवून विश्वास ठेवून परस्पर संवाद वाढेल, परस्पर समजूत वाढेल, परस्परांच्या श्रध्दांचा सन्मान होईल आणि परस्परांमध्ये एकत्रित येण्याचा भाव वाढेल अशी मानसिकता, बोलणे आणि आचरण ठेवत पुढे वाटचाल करावी लागेल. प्रचाराने प्रभावित न होता किंवा गृहितकांवर विसंबून न राहता प्रत्यक्ष परिस्थितीचे आकलन करून त्यानुसार काम करावे लागेल. यासाठी धैर्याने, संयम आणि सहनशीलतेने, आपल्या वाणीला, कृतीला अतिरेकी कोप वा भयापासून दूर ठेवून, दृढनिश्चयाने आणि संकल्पबद्ध होऊन दीर्घकाळ सतत प्रयत्न करणे अनिवार्य आहे. तेव्हाच शुद्ध मनाने केलेले सारे शुभसंकल्प पूर्ण होतात.

कोणीही कितीही चिथावणी दिली तरी प्रत्येक परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षण करीत, नागरी शिस्त पाळून, आपल्या घटनेने दिलेल्या संकेतांनुसार आचरण अनिवार्यपणे करायला हवे. स्वतंत्र देशात ही अशी वागणूकच देशभक्तीची अभिव्यक्ती मानली जाते. प्रसारमाध्यमांतून होणारा चिथावणी देणारा भडकाऊ अपप्रचार आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांच्या स्पर्धेत आपण अडकू नये. प्रसारमाध्यमांचा उपयोग समाजात सत्य आणि आत्मीयता पसरवण्यासाठी व्हायला हवा. सुसंघटित सामर्थ्यसंपन्न समाजाने कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी घेतलेला पुढाकार आणि सरकार, प्रशासनाला केलेले योग्य सहकार्य हाच हिंसाचार आणि गुंडगिरीवर मात करण्याचा योग्य उपाय आहे.

येत्या 2024 वर्षाच्या सुरुवातीच्या काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. निवडणुकीच्या रणधुमाळीत भावना भडकावून मते मिळवण्याचे प्रयत्न अपेक्षित नसले तरी ते होतच राहतात. समाजात फूट पाडणाऱ्या या गोष्टींपासून समाजाने स्वतःला दूर ठेवावे. मतदान करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. त्याचे प्रत्येकाने पालन करायला हवे. देशाची एकात्मता, अखंडता, अस्मिता आणि विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन प्रत्येकाने मतदान करावे.

2025 ते 2026 हे वर्ष संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतरचे वर्ष आहे. संघाचे स्वयंसेवक वर नमूद केलेल्या सर्व गोष्टींमध्ये पुढे पाऊल टाकतील याची सिद्धता करीत आहेत. समाजाच्या आचरणात आणि उच्चारणात संपूर्ण समाज आणि आपल्या देशाप्रती आपुलकीची भावना व्यक्त व्हायला हवी. मंदिर,पाणवठे, स्मशानभूमी या ठिकाणी काही भेदभाव शिल्लक राहिला असेल तर तो संपला पाहिजे. आपल्या सर्वांच्या कुटुंबांतील सर्व सदस्यांमध्ये दैनंदिन मंगल संवाद व्हावा, सुसंस्कारित आचरण आणि संवेदनशीलता वाढीस लागावी. आणि त्यांच्याकडून समाजसेवा होत राहो. आपल्या घरातील पाण्याची बचत करून, प्लास्टिकला व्यवहारातून दूर करून आणि आपल्या अंगणात तसेच आजूबाजूला हिरवळ वाढवून निसर्गाशी आपले नाते जपावे. आपल्या व्यवहारात, आचरणात स्वदेशीचा स्वीकार करून स्वावलंबन आणि आत्मनिर्भरता वाढीला हातभार लावावा. अकारण, अवास्तव उधळणूक टाळायला हवी. देशात रोजगार वाढला पाहिजे आणि देशाचा पैसा देशातच वापरला गेला पाहिजे. म्हणूनच स्वदेशीच्या आचरणाची सुरवात आपल्या घरापासूनच व्हायला व्हावी. कायदा व सुव्यवस्था तसेच नागरी कर्तव्यांचे कसोशीने पालन करायला हवे. आणि समाजात परस्पर सद्भाव, सौहार्द व सहकार्याची प्रवृत्ती सर्वत्र रुजली पाहिजे. या पाच गोष्टी सर्वत्र व्हाव्यात अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण त्यासाठी छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करून ती आचरणात आणून ही वागणूक आपल्या स्वभावात रुजविण्यासाठी सतत प्रयत्न करणे आवश्यक आहे. आगामी काळात संघाचे स्वयंसेवक समाजातील अभावग्रस्त, वंचित-पीडितांची सेवा करण्याबरोबरच वरील पाच विषयांसाठी पुढाकार घेत, समाजाला सोबत घेत, विविध उपक्रमांद्वारे समाजाला त्यात सहभागी आणि सहयोगी बनविण्याचा प्रयत्न करतील.

शासन, प्रशासन आणि समाजकल्याणासाठी कार्यरत असलेली समाजातील सज्जनशक्ती समाजाच्या हितासाठी जे काही उपक्रम करत असतील किंवा करू इच्छित असतील, त्यात संघाच्या स्वयंसेवकांचे योगदान नित्यक्रमानुसार सुरूच राहील.

समाजाची एकता, सतर्कता आणि सर्व दिशांना नि:स्वार्थी प्रयास-उपक्रम, तसेच लोककल्याणकारी शासन आणि लोकाभिमुख प्रशासन हे सर्व घटक ‘स्व’ च्या आधारावर दृढ उभे राहून परस्पर सहयोगाने प्रयत्न करीत असतात तेव्हाच राष्ट्र बल, वैभव संपन्न होते. आणि सामर्थ्य आणि वैभवाने समृद्ध असलेल्या राष्ट्राजवळ भारतराष्ट्राच्या सनातन संस्कृतीसारखी, अखिल विश्वाला आपले कुटुंब मानणारी, अंधारातून प्रकाशाकडे नेणारी, असत्याकडून सत्याकडे उन्नयन करीत नेणारी आणि मर्त्य, सामान्य जीवनातून सार्थकतापूर्ण जीवनाच्या अमृताकडे वाटचाल करणारी संस्कृती असते तेव्हा ते राष्ट्र जगाचे ढासळलेलं संतुलन पुन्हा प्रस्थापित करून जगाला सुखशांतीने युक्त नवजीवनाचे वरदान प्रदान करते. वर्तमानकाळात आपल्या अमर भारत राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे हेच प्रयोजन आहे.

चक्रवर्तियों की संतान,
लेकर जगद् गुरु का ज्ञान,
बढ़े चले तो अरुण विहान,
करने को आए अभिषेक,
प्रश्न बहुत से उत्तर एक ll

भारत माता की जय.

RSS dasera festival celebration

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात