शरदनिष्ठ विरुद्ध अजितनिष्ठ अशी राष्ट्रवादीतली नुरा कुस्ती किंवा खरी कुस्ती सुरू असताना दोन्ही राष्ट्रवादींचे एका मुद्द्यावर मात्र एक मत आहे, ते म्हणजे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री करायचा आहे. त्यातही अजित पवारांचे समर्थक त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी उतावीळ झाले आहेत, तर शरद पवारांचे समर्थक सुप्रिया सुळे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे करत आहेत. त्यासाठी पुरोगामी महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री अशी “वैचारिक ढाल” त्यासाठी पुढे केली जात आहे. Is it pawar centric strategy to fight from two camps and reach triple digit mlas numbers??
पण राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री पदाचे स्वप्न तसे फारच जुने आहे किंबहुना ते पक्षाच्या वयाएवढेच म्हणजे 24 वर्षे जुने आहे. पण आकडा काही जमेना आणि पद काही हाती लागेना!!, अशी राष्ट्रवादीची स्थिती आहे.
राष्ट्रवादीने आपल्या राजकीय आयुष्यात कधीही आमदारांच्या 75 चा आकडा गाठला नाही, मग स्वबळावर सत्ता मिळवणे सोडाच!! आता तर राष्ट्रवादी दुभंगली आहे. तिची लढाई निवडणूक आयोग आणि सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचली आहे. याचा अर्थ कायदेशीरदृष्ट्या राष्ट्रवादीवर ताबा मिळवण्यासाठी अजित पवार आणि शरद पवार वेगवेगळ्या गोटातून लढत आहेत, असे चित्र निदान जनतेसमोर तरी उभे केले जात आहे.
पण राजकीय दृष्ट्या हे पाण्यात काठी मारण्यासारखेच आहे. पाण्यात काठी मारली तर काही काळ पाणी दुभंगल्यासारखे वाटते, पण पाणी खरे कधीच दुभंगत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसची देखील राजकीय पातळीवरची लढाई तशीच असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते दोन्ही गटांमध्ये निष्ठा ठेवून आहेत आणि त्यांचे ध्येय अजित पवार किंवा सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचे आहे.
अशा स्थितीत दोन्ही गटांचा एक प्रयत्न निश्चित दिसतो तो म्हणजे आमदारांचा आकडा जमवायचा. आता तो आकडा कालच शरद पवारांनी पिंपरी चिंचवडच्या पत्रकार परिषदेत सांगूनच टाकला, तसाही तो आकडा अजित पवार नेहमीच पत्रकारांना सांगत असतात, आणि तो आकडा म्हणजे 145 आमदारांचा. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या विधानसभेतले पूर्ण बहुमत मिळवायचा!!
पण मूळात राष्ट्रवादी काँग्रेस अखंड होती, तेव्हा देखील त्या पक्षाने आपण 100 आमदार निवडून आणू, अशी महत्त्वाकांक्षा जाहीर केली होती. जयंत पाटील, शरद पवार, सुप्रिया सुळे अजित पवार हे त्यावेळी एकाच गोटात होते आणि तेव्हाची राष्ट्रवादीची महत्वाकांक्षा 100 आमदार निवडून आणण्याची होती. याचा अर्थ राष्ट्रवादीला आमदारांच्या ट्रिपल डिजिटला स्पर्श करायचा होता. कारण आत्तापर्यंत काँग्रेस आणि भाजप या दोनच पक्षांनी महाराष्ट्रात ट्रिपल डिजिट म्हणजे 100 पेक्षा जास्त आमदार निवडून आणण्याची राजकीय किमया साधली आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही प्रादेशिक पक्षांना ती किमया कधीही साधता आलेली नाही.
*मग आता राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा अजितनिष्ठ आणि शरदनिष्ठ अशा पद्धतीने दोन वेगवेगळ्या गोटातून लढणार आहेत, तेव्हा तरी निदान राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे आमदारकीचा ट्रिपल डिजिट गाठेल का??, याविषयी उत्सुकता आहे. किंबहुना पवार फॅमिलीचा तो गुप्त राजकीय प्लॅन आहे का??, याविषयी राजकीय वर्तुळात दाट संशय आहे!!*
अजित पवारांनी एकीकडून शिवसेना आणि भाजपची कुमक घ्यायची आणि शरद पवारांनी दुसरीकडून उद्धव ठाकरे आणि काँग्रेसची कुमक घ्यायची. या दोन गोटांमधल्या वेगवेगळ्या शक्तींकडून कुमक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ वाढवायचे, असे करून तरी “पवार केंद्रित राष्ट्रवादी काँग्रेस” वेगवेगळ्या गोटातून लढून तरी आमदारकीची शंभरी गाठेल का??, हा सवाल आहे.
मग एकदा का आमदारांच्या आकड्यांची शंभरी गाठली की राष्ट्रवादी काँग्रेस साठी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीकडे जाणारी शिडी जवळ येते. अर्थात लगेच त्या शिडीच्या पायऱ्यांवरून मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीपर्यंत पोहोचता येईलच, याची खात्री नाही. पण निदान ती तरी जवळ येते, हा काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांचा अनुभव गाठीशी आहे, हे निश्चित!!
याचा अर्थ मग महाराष्ट्रात वेगवेगळ्या गोटांमधून लढून “पवार केंद्रित राष्ट्रवादी”चे ट्रिपल डिजिट आमदार मिळवण्याचे ध्येय पवार फॅमिलीने ठेवले आहे का??, हा कळीचा सवाल आहे… पण पवार हे “ध्येय” साध्य करेपर्यंत “पवार केंद्रित” नसलेले भाजप, काँग्रेस आणि शिवसेनेचे दोन गट हे हातावर हात धरून बसून राहणार आहेत का??, हा त्या पलीकडचा कळीचा सवाल आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App