विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाच्या आकडेवारीवर बारकाईने नजर टाकली, तर ज्या अनेक राजकीय बाबी स्पष्ट होत आहेत, त्यामधली एक महत्त्वाची बाब म्हणजे शिवसेनेतली फूट ही बाकी कोणत्याही पक्षांपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक पथ्यावर पडलेली दिसत आहे. किंबहुना निकालाच्या आकडेवारीतूनच ही बाब अधोरेखित होत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 1287 जागांवर विजय मिळाला आहे, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला 842 आणि ठाकरे गटाला 637 जागांवर विजय मिळाला आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर ग्रामीण भागात आकडेवारीनुसार मात केली आहे. पण त्याच वेळी एक बाब स्पष्ट होते आहे, ती म्हणजे दोन्ही शिवसेनेचा आकडा एकत्रित केला, तर तो आकडा राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा जास्त होतो आहे. बाळासाहेबांच्या शिवसेनेची शिवसेनेला मिळालेल्या 842 जागा आणि ठाकरे गटाला मिळालेल्या 637 जागांची बेरीज केली तर ती 1479 एवढी होते.
याचा अर्थ महाराष्ट्रातल्या ज्या ग्रामीण भागावर आपली मजबूत पकड असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मराठी माध्यमे करत असतात, त्या ग्रामीण भागावर प्रत्यक्षात आकडेवारीच्या हिशेबात अखंड शिवसेनेने केव्हाच राष्ट्रवादीवर मात केली होती, हे सिद्ध होते. केवळ शिवसेनेतल्या फुटीमुळे राष्ट्रवादीची आकडेवारी शिवसेनेच्या आकडेवारीपेक्षा मोठी दिसते. पण प्रत्यक्षात बाळासाहेब ठाकरे यांच्या करिष्माच्या आधारे ज्या दोन्ही शिवसेना निवडणूक लढवतात, त्या अखंड शिवसेनेची आकडेवारी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पेक्षा निश्चितच जास्त आहे. हे 2022 च्या डिसेंबर महिन्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीनेही सिद्ध केले आहे.
याचा दुसराही अर्थ असा की काँग्रेस सध्या ग्रामीण भागाच्याही खिसगणतीत उरलेली नाही कारण त्या पक्षाला 809 जागा मिळाल्या आहेत, तर भाजप आणि दोन्ही शिवसेना या हिंदुत्ववादी पक्षांना एकत्रित मिळून 3827 एवढ्या जागा मिळाल्या आहेत. याचा अर्थ महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला संपूर्ण राजकीय कल निर्विवादपणे हिंदुत्ववादी पक्षांकडे झुकलेला दिसतो आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा ग्रामीण भागातला पाया उखडल्याचे यातून स्पष्ट होत आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App