प्रतिनिधी
मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात वसुली संचनालाय अर्थात ईडीच्या कारवाईचे संकेत गडद होताच फणा काढलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपराष्ट्रपतींना पत्र लिहिलेच, पण त्याचबरोबर पत्रकार परिषद घेऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांवर अनेक गंभीर आरोप करून त्यांना इशारे दिले. तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, असा इशारा त्यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिला.Sanjay Raut’s warning to Devendra Fadnavis
संजय राऊत यांनी मंगळवारी राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून ईडी आपला छळ करत असल्याचा आरोप केला. महाराष्ट्र सरकारला अस्थिर करण्यास नकार दिल्यानंतर, सरकारी यंत्रणा माझ्या आणि कुटुंबाच्या मागे लागली आणि छळ करण्यास सुरुवात केली. ईडी सारखी तपास यंत्रणा आपल्या राजकीय धन्याची बाहुली बनली आहे. त्यांच्या बॉसने मला लपून राहण्यास सांगितले असल्याचे अधिकाऱ्यांनीच कबूल केले आहे, असे संजय राऊत म्हणाले. त्यानंतर संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले. ते म्हणाले, की माझ्या मुलीच्या लग्नासंदर्भात फुलवाल्याकडे, डेकोरेटरवाल्याकडे ईडीने तपास केला. डेकोरेशन करणाऱ्याला किती पैसे मिळाले असे विचारले. हे काय ईडीचे काम आहे? डेकोरेटने त्यांच्यासोबत घरचे संबंध असल्याने पैसे न घेतल्याचे सांगितले. त्याला ईडीने आतमध्ये टाकू असे सांगितले. ही दादागिरी काय करता? ही मुंबई आहे आणि मुंबईचा दादा शिवसेना आहे,असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
तुम्ही पाहत राहा आता काय होणार आहे. ईडीच्या ऑफिसमध्ये जाऊन दोन चार लोक जाऊन बसतात आणि सूचना आणि आदेश देतात. मी देवेंद्र फडणवीसांना आवाहन करत आहे आणि त्यांना माहिती आहे मला काय सांगायचे आहे. सरकार पाडण्यासाठी यानंतरही प्रयत्न होतील पण हे पडणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कुटुंबालाही खोटे पुरावे तयार करुन त्रास दिला जात आहे. रोज सकाळी एक माणूस उठतो आणि बेवड्यासारखा बडबडतो आणि त्यावरुन ईडी कारवाई करते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागपूरलाही जाता येणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
ममाझी पुढची पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेणार आहे आणि त्यानंतर ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकार परिषद घेणार आहे आणि त्या दिवशी काय होते ते पहा, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.
मध्यावधी निवडणुकीसाठी सहकार्य न केल्यास तुरुंगात टाकू, असे सांगण्यात आल्याचा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला. काही लोक माझ्याकडे आले होते आणि महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे सांगत होते. राज्यात मध्यावधी निवडणुका घेण्यासाठी त्यांना मला साधन बनवायचे होते. मला माहिती होते की हे नकार दिल्याबद्दल मला मोठी किंमत मोजावी लागेल, तरीही मी नकार दिला. माजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची जी अवस्था झाली होती, तशीच तुमची अवस्था होईल, असेही मला सांगण्यात आले आणि ते अनेक वर्षे तुरुंगात राहिले. या गोष्टीमागे त्यांचा इशारा लालू प्रसाद यादव यांच्याकडे होता,” असे संजय राऊत म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App