विशेष प्रतिनिधी
मुंबई : चीनी व्हायरसच्या रुग्णांची महाराष्ट्रातील संख्या व मृत्यू प्रचंड गतीने वाढतायेत. विरोधी पक्ष म्हणून आम्ही यावर बोलायचे नाही का पण तरीही तुम्हाला तसे वाटत असेल तर आम्ही मूग गिळून गप्प बसतो, पण तुम्ही काहीही करून कोरोना नष्ट करा, अशी टिप्पणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून केली आहे.
या संदर्भात त्यांनी फेसबुकवर एक सविस्तर पोस्ट टाकली आहे. ती पुढीलप्रमाणे आहे…
“आम्ही बोलत नाही, मूग गिळून गप्प बसतो… मात्र काहीही करून कोरोना नष्ट करा हीच हात जोडून नम्र विनंती!
रुग्णांची संख्या व मृत्यू प्रचंड गतीने वाढतायेत… तरी आम्ही बोलायचं नाही?
रुग्णालये सील केल्याने जनरल रुग्ण उपचाराअभावी मरतायेत… तरी आम्ही बोलायचं नाही?
डॉक्टर, नर्स, रुग्णसेवक कर्मचारी, पोलीस या सर्वांना संसर्ग होतोय, ३ पोलीस मृत्यूमुखी पडले… तरी आम्ही बोलायचं नाही?
पोलिसांवर दिवसागणिक हल्ले वाढतायेत… पोलिसांच मनोबल खचतयं… त्याचा परिणाम परिस्थिती नियंत्रणावर होतोय… तरी आम्ही बोलायचं नाही?
शेतकरी आणि शेतीमालावरील बंधनं उठवली म्हणता पण शेतकरी बागा जाळतायेत, तोडतायेत… विक्रीची व्यवस्था नाही. शेतकरी उधवस्त, हताश झालाय…तरी आम्ही बोलायचं नाही?
वांद्रे, कुर्ला, भिवंडीला गर्दी उसळते, सोशल डिस्टंसिंगचा बोजवारा उडून संसर्गाचा धोका वाढतोय…तरी आम्ही बोलायचं नाही?
आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर अश्लील, विकृत व एन्काऊंटर कारण्यापर्यंत समाज माध्यमातून टीका केली जाते. त्यांची प्रतिमा मलीन होत असताना पोलिसांची कारवाई नाही, त्याचवेळी आमच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनवर बोलावून धमकावायचे, गुन्हे दाखल करायचे…तरी आम्ही बोलायचं नाही?
आपल्या राज्याबरोबर १५ मार्चला केरळ आणि महाराष्ट्र राज्याची रुग्णसंख्या २४ होती, त्याच केरळची ३० एप्रिलला रुग्णसंख्या ४९७ आणि महाराष्ट्राची रुग्णसंख्या १०,४९८… १०,००० ने वाढ झाली…तरी आम्ही बोलायचं नाही?
केरळ मध्ये ४ मृत्यू… आमच्याकडे ४३२ मृत्यू… त्यांनी पूर्वनियोजन करून, २० हजार कोटीचे सरकारी पॅकेज देऊन परिस्थिती हाताळली…आपले सरकार कमी पडले तरी आम्ही बोलायचं नाही?
भावनिक सहानुभूतीपूर्वक वक्तव्य केली जातात पण कोरोना नियंत्रण प्रगतीच्या आढाव्यावर वाच्छता होत नाही..तरीही आम्ही बोलायचं नाही?
ठीकयं…आम्ही बोलत नाही, मूग गिळून गप्प बसतो… मात्र काहीही करून कोरोना नष्ट करा हीच हात जोडून नम्र विनंती!”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App