विशेष प्रतिनिधी
करोना व्हायरसच्या फैलावाचा आर्थिक दुष्परिणाम रोखण्यासाठी कन्फेडरेशन आफ इंडियन इंडस्ट्रीने (सीआयआय) देखील पुढाकार घेतला असून भारतीय उद्योगाच्या या सर्वात प्रभावी संघटनेने केंद्र सरकारला परिणामकारक कृतिकार्यक्रम सूचविला आहे.
मोठ्या शहरांमधील रुग्णालये, जिल्हा, तालुका स्तरांवरील रुग्णालये कोविड रुग्णालये म्हणून जाहीर करून त्यामध्ये कोरोना चाचणी व उपचार सुविधा उपलब्ध कराव्यात. सीआयआय यामध्ये केंद्र सरकार सांगेल ते योगदान करेल.
कोरोना फेज ३ आणि फेज ४ मध्ये गेल्यास इ आयसीयू तातडीने उभ्या कराव्या लागतील, त्यासाठी सीआयआयने आधीच नियंत्रण कक्ष उघडला असून केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाशी समन्वय साधून आहे. देशभर तालुकापातळीपर्यंत त्याचा विस्तार करण्य़ाची क्षमता विकसित करण्यात येत आहे.
कोरोना अधिक फैलावल्यास वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा पडू शकतो. नेब्यूलायझर, ग्लुकोमीटर, थर्मामीटर, कार्डिएक स्टेन्ट, सीटी स्कँनर्स, एमआरआय स्कॅनर्स आदी उपकरणांची उपलब्धता आय़ातीवर अवलंबून आहे. ती कधीही थांबू शकते. त्यावेळी स्थानिक उद्योजकांसाठी सुविधा देऊन वैद्यकीय उपकरणांचे उत्पादन भारतातच करण्यासाठी केंद्र सरकारने तातडीचे धोरण ठरवावे. उपकरणांच्या तुटवड्याचे प्रमाण ७० टक्क्यांपर्यंत पोचण्यापूर्वी भारतातच उपकरणांचे उत्पादन व वितरण व्यवस्था सुरू झाली पाहिजे.
एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून औद्योगिक, वैद्यकीय उत्पादनांचा तुटवडा जाणवू शकतो. त्यावर येत्या १० दिवसांत वेगाने हालचाली करून स्थानिक पातळीवर उत्पादन वाढविले पाहिजे.
या सूचना केंद्र सरकारने लक्षात घेऊन पावले उचलली तर कोरोना व्हायरसच फैलावाच्या आर्थिक दुष्परिणामांचा प्रभावी मुकाबला करता येईल, असे सीआयआयने म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App