विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरेगाव भीमा हिंसाचार चौकशी आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना चार एप्रिल रोजी साक्षीसाठी समन्स पाठविले आहे. कोरेगाव भीमा दंगलप्रकरणी शरद पवार यांनी यापूर्वीच आयोगासमोर शपथपत्र दिले आहे. पवार आयोगासमोर आल्यावर त्यांची उलट तपासणी होणार आहे. याप्रकरणी अर्जदार सागर शिंदे यांनी आपल्या अर्जात उपस्थित केलेले प्रश्न त्यांना विचारले जाणार आहेत.
कोरेगाव भीमा हिंसाचार चौकशी आयोगासमोर सागर शिंदे यांनी यापूर्वी शपथपत्र दाखल करून म्हणणे मांडलेले आहे. त्यात त्यानी विनंती केली होती की, शरद पवार यांना आयोगाने चौकशी साठी बोलवावे. कोरेगाव भीमा येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयोगाची स्थापना केली होती. कोरेगाव भीमा येथे १ जानेवारी २०१८ रोजी घडलेल्या घटनांचा क्रम आणि त्यासाठी कारणीभूत असलेली परिस्थिती याची कारणमीमांसा करणे. त्याचबरोबर घटना घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या व्यक्ती किंवा व्यक्तींचा गट किंवा संघटना कारणीभूत होत्या काय याचा शोध घेणे.
तसेच या घटनेमुळे निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आणि पोलिस यंत्रणेने कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केलेले नियोजन व तयारी पुरेशी होती काय, याचा आढावा घेण्यात येत आहे.ही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांकडून योग्य कारवाई झाली होती काय याचीही चौकशी केली जात आहे.
पवार यांच्यासह तत्कालीन पोलीस अधीक्षक सुवेझ हक, संदीप पखाले, रवींद्र सेनगवकर हे पोलीस अधिकारी आणि पुणे महापालिकेचे तत्कालीन आयुक्त सौरभ राव यांनाही आयोगाने चौकशीसाठी बोलावले आहे.
Array