नाशिक : Manoj jarange मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी माघार घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये जरी अस्वस्थता पसरली असली, तरी काही मराठी माध्यमांनी मनोज जरांगेंना योग्य वेळी माघार घेण्याचे कसे समजले, योग्य वेळी माघार घेणारा नेताच खरा कसा असतो, वगैरे मखलाशी चालवली. यात प्रामुख्याने “पवार बुद्धीची” माध्यमे आघाडीवर राहिली, पण त्या पलीकडे जाऊन नव्या “पुलोद” प्रयोगासाठी जरांगे खूपच अपुरे पडले आणि त्यामुळेच मास्टर माईंडने त्यांना बाजूला केले, याविषयी कोणी बोलायला तयार नाही!!Manoj jarange
मनोज जरांगेंच्या मराठा आरक्षण आंदोलनाची भलामण मराठी माध्यमांनी खूप चालवली होती. जरांगे 150 पेक्षा जास्त उमेदवार उभे करणार. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडी यांचे सगळे गणित विस्कटणार. जरांगे सांगतील तोच मुख्यमंत्री होणार. किंबहुना मराठा + मुस्लिम आणि दलित यांची मोट बांधून स्वतः मनोज जरांगे हेच मुख्यमंत्री होणार, अशा बातम्यांच्या पेरण्या माध्यमांनी खूप करून पाहिल्या. परंतु प्रत्यक्षात पीक उगवताना, ते पीक निवडणुकीत माघारी घेण्याचेच उगवले. झाकली मूठ सव्वा लाखाची, उघडून झाकल्यावर उरली माती!! अशी अवस्था म्हणून जरांगे यांची झाली.
परंतु जरांगे यांच्या माघारीनंतर त्यांच्या मुलाखतींचा सिलसिला मराठी माध्यमांनी चालविला. त्यामध्ये पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी “डाव टाकला.” “गनिमी कावा” केला. आता मनोज जरांगे प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात घेण्यापेक्षा ते बाहेर राहूनच भाजपला धोबीपछाड देतील. भाजपच्या जागा कमी करण्याचा प्रयत्न करतील. भाजपला सिंगल लार्जेस्ट पार्टी होऊ देणार नाहीत, वगैरे मखलाशी “पवार बुद्धीच्या” पत्रकारांनी आणि मराठी माध्यमांनी चालवली आहे. पण मूळात मनोज जरांगे यांच्या उमेदवारांच्या रूपाने निवडणुकीच्या रण मैदानात उमेदवार निवडून आणून नवा “पुलोद प्रयोग” करायचा जो डाव मास्टर माईंडने टाकला होता, तो केवळ संख्यात्मक आधाराने पूर्ण उखडला गेला. कारण 20 – 25 जागांवर निवडणूक लढवून कुठला नवा “पुलोद प्रयोग” करता येणे शक्य नाही, हे मास्टर माईंडच्या लक्षात आले. त्यामुळे जो काही फायदा व्हायचा तो जरांगे यांच्या अप्रत्यक्ष मदतीनेच होऊ द्यात, न पेक्षा मनोज जरांगे यांच्या उमेदवारांनी निवडणूक लढवून तोटाच होईल, याची भीती मास्टर माईंडला वाटल्यानंतर मास्टर माईंडने मनोज जरांगे यांनाच बाजूला सारून टाकले. कारण दुसरा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता.
मनोज जरांगे यांनी टप्प्याटप्प्याने मराठा आरक्षणाचा टेम्पो वाढवत नेला. देवेंद्र फडणवीस यांना ते सातत्याने टार्गेट करत राहिले. परंतु त्या वाढवलेल्या टेम्पोचा राजकीय फायदा उचलण्यापेक्षा त्याचा तोटाच होईल ही भीती मनात बसल्याने किंवा निर्माण केली गेल्याने त्यांना माघार घ्यावी लागली. यातून खरं म्हणजे सर्व समाजामध्ये मनोज जरांगे यांच्या विश्वासार्हतेला धक्का बसला. जसा सगळ्या महाराष्ट्रात मास्टर माईंडच्या “विश्वासार्हतेचा डेफिसिट” आहे, तसाच तो जरांगेंच्या बाबतीत तयार व्हायला लागला आहे. याविषयी मात्र “पवार बुद्धीची” माध्यमे बोलायला तयार नाहीत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App