विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दीपावली उत्सवावर आक्षेप त्याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. मनसेचा हा कार्यक्रम म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा दावा त्यांनी केला आहे. ठाकरे गटाच्या या दाव्यावर आता मनसेने प्रतिक्रिया दिली आहे. हे दीपावलीच्या दिव्यांऐवजी ईदची लायटिंग असती तर ठाकरे गटाने विरोध केला असता का? असा खडा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. Is Uddhav Thackeray group against Hindu festivals?
सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मनसेने दरवर्षीप्रमाणे यंदाही दादरच्या शिवाजी पार्क परिसरात दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. या निमित्ताने तिथे भव्य रोषणाई करण्यात आली आहे. पण त्यावर उद्धव ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांनी मनसेचा हा दीपोत्सव कार्यक्रम आदर्श आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
हिंदूंच्या आनंदावर विरजन घालण्याचे काम
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाच्या या हरकतीचा संबंध थेट हिंदुत्वाशी जोडत हीच जर ईदची लायटिंग असती तर ठाकरे गटाने हरकत घेतली असती का? असा सवाल केला आहे. संदीप देशपांडे म्हणाले, तुमचा (ठाकरे) हिंदू सणांनाच विरोध का आहे? हीच जर ईदची लायटिंग असती आणि हिरवे कंदील लावले असते तर तुम्ही विरोध केला असता का? हा माझा प्रश्न आहे. आमचे सर्व हिंदू बांधव आपल्या सणांचा आनंद घेत असताना तुम्ही त्यांच्या आनंदावर विरजन घालण्याचे काम का करत आहात?
या प्रकरणी आचारसंहितेचा भंग होत असेल तर ते चूक की बरोबर हे निवडणूक आयोग ठरवेल. मुळात तुमचा हिंदू सणांना विरोध का आहे? हे जर ईदची लायटिंग कुणी केली असती तर तुम्ही वांद्र्याला जाऊन विरोध केला असता का? हा माझा उबाठाला प्रश्न आहे आणि त्यांनी त्याचे उत्तर द्यायला हवे, असे देशपांडे यांनी म्हटले आहे.
काय आहे ठाकरे गटाची तक्रार?
सध्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू आहे. त्यातच मनसेने शिवाजी पार्कवर दीपोत्सवाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मनसेचे माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार हजर राहिल्यामुळे या कार्यक्रमाचा संपूर्ण खर्च त्यांच्या निवडणूक खर्चात दाखवला जावा. विशेषतः या कार्यक्रमामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्यामुळेही या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाकडे एका पत्राद्वारे केली आहे.
महेश सावंत यांचाही आक्षेप
ठाकरे गटाचे माहीम मतदारसंघातील उमेदवार महेश सावंत यांनीही या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दीपोत्सवाला आमचा कोणत्याही प्रकारे विरोध नाही. पण यंदा निवडणुकीची आचारसंहिता लागली आहे. त्यातच या दीपोत्सवाच्या माध्यमातून मनसे पक्षाचा व त्याच्या उमेदवाराचा प्रचार होत आहे. हे नियमबाह्य आहे. त्यावर आमचा आक्षेप आहे, असे महेश सावंत यांनी म्हटले आहे.
दीपोत्सवाच्या निमित्ताने शिवाजी पार्कवर जवळपास 300 ते 400 कंदील लावण्यात आलेत. त्यावर मनसेचे निवडणूक चिन्ह आहे. त्याशिवाय काही बॅनर्सही लावण्यात आलेत. माध्यमांनीही या कार्यक्रमाला अमित ठाकरे उपस्थित राहिल्याचे दाखवले. याचा अर्थ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा प्रचार सुरू आहे. त्यामुळे या कार्यक्रमाचा खर्च अमित ठाकरे यांच्या निवडणूक खर्चात दाखवला गेला पाहिजे. विशेषतः निवडणूक लागल्यानंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमांना परवानगी दिली जात नाही. त्यानंतरही या कार्यक्रमाला परवानगी कशी देण्यात आली? असा सवालही सावंत यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App