उत्तर प्रदेशात काँग्रेस पक्षाची राजकीय अवस्था सर्वात बिकट असताना पक्षाने एक धाडसी निर्णय घेऊन जास्तीत जास्त महिलांना निवडणुकीत तिकीट दिले आहे. वास्तविक ही घोषणा दोन महिन्यांपूर्वीच पक्षाच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश प्रभारी प्रियांका गांधी यांनी केली होती. परंतु घोषणा करणे आणि ते अमलात आणणे यामध्ये बरेच अंतर असते. उत्तर प्रदेशात महिलांना तिकीट देण्याची घोषणा मात्र पहिल्या यादीत तरी काँग्रेसने तंतोतंत पाळलेली दिसत आहे…!!Uttar Pradesh elections: Congress gave tickets to 50 women and Sushilkumar Shinde was easily remembered
प्रियांका गांधी यांनी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली यामध्ये 50 महिलांचा समावेश आहे. अर्थातच त्यांनी इतर प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांवर ही एक प्रकारे यादीतच मात केलेली दिसते आहे. प्रियांका गांधी यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना काँग्रेसची अवस्था बिकट असल्याचे मान्य करण्याऐवजी ही काँग्रेसची सर्वोत्तम राजकीय अवस्था आहे, असे म्हटले होते.
कारण काँग्रेसला पारंपारिक राजकारण वगळून नवे राजकीय प्रयोग करता येतील आणि त्यातून यश मिळवता येईल, असा त्यांचा दावा आहे. हा दावा त्यांनी तिकीट वाटपातून सिद्ध करण्याचाही प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रामाणिकपणाला दाद दिलीच पाहिजे.
पण त्याचबरोबर उत्तर प्रदेशातले राजकीय वास्तव नाकारून देखील चालणार नाही. उत्तर प्रदेशातच काय पण अनेक राज्यांमध्ये आजही जातीवर आधारित मतदान होते आणि त्यावर यशाची टक्केवारी ठरते. त्याच बरोबर प्रत्येक पक्ष महिलांना प्राधान्य देण्याची घोषणा जरूर करतो. परंतु तिकिटे देताना बड्या राजकीय घराण्यांनी मधील महिलांनाच निवडतो, ही कितीही नाकारले तरी राजकीय वस्तुस्थिती आहे. खुद्द गांधी घराणे देखील त्याला अपवाद नाही. तरी देखील उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांनी उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला तिकीट देणे त्याचबरोबर आशा वर्करसाठी आंदोलन करणाऱ्या पूनम पांडे यांना तिकीट देणे ही राजकीय पावले महत्त्वाची आहेत. यात कोणतीही शंका नाही.
पण यातल्या राजकीय वस्तुस्थितीचे आणखीन एक वेगळे “राजकीय इंगितही” आहे…!! ते असे, की आज जर काँग्रेस पक्ष खऱ्या अर्थाने उत्तर प्रदेशची लढाई जिंकण्याच्या स्थितीत असता तर काँग्रेसने एवढ्या प्रमाणावर महिलांना किंबहुना राजकीय दृष्ट्या तुलनेने अनोळखी असलेल्या महिलांना तिकिटे दिली असती का…?? किंवा तिकिटे देऊ शकला असता का…?? हा फार मोलाचा आणि कळीचा प्रश्न आहे…!! त्याचे उत्तर थेट नकारात्मक जरी नसले तरी शंका उत्पन्न करणारे नक्की आहे…!!
या संदर्भात भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार यांचा शिंदे यांची एक राजकीय आठवण बरेच काही “बोलून” जाते. सुशीलकुमार शिंदे यांना काँग्रेसने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत उतरवले होते. त्यावेळी केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार होते आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएचे बहुमत होते. एनडीएने राजस्थानचे वजनदार नेते माजी मुख्यमंत्री भैरोसिंग शेखावत यांची उमेदवारी जाहीर केली होती. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील आकडेवारी पाहता शेखावत निवडून येणार हे निश्चित होते.
तरी देखील सुशीलकुमार शिंदे यांनी काँग्रेस हायकमांडचा आदेश स्वीकारत उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी काँग्रेसने मराठी नेत्याला केंद्रात फार मोठ्या पदाची संधी दिली, अशा स्वरूपाच्या बातम्या आल्या होत्या. महाराष्ट्रात त्याची विशिष्ट राजकीय हवा तयार झाली होती. पण त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांनी एक राजकीय टिपण्णी केली होती…!! काँग्रेस जर जिंकण्याच्या स्थितीत असती तर मला उपराष्ट्रपती पदाचे तिकीट पक्षाने दिले असते का?, असा एक चिमटा काढणारा सवाल त्यांनी त्यावेळी करून टाकला होता…!!
सुशीलकुमार शिंदे यांची ही टिपण्णी खऱ्या अर्थाने मार्मिक होती. खरंच सुशीलकुमारांना काँग्रेसने जिंकण्याच्या पदाची उमेदवारी दिली असती का?, हा खरा कळीचा प्रश्न आहे. मराठी प्रभावी नेत्यांना डावलण्याचा काँग्रेस हायकमांडवर नेहमी आरोप होत आला आहे. यशवंतराव चव्हाण, शरद पवार ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. त्यातच त्यावेळी सुशीलकुमार शिंदे यांचीही भर पडली होती.
या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे यांनी केलेली मार्मिक टिप्पणी उत्तर प्रदेशातील राजकीय स्थितीबाबत बरेच “बोलून” जाते. उत्तर प्रदेशात काँग्रेस जर जिंकण्याच्या स्थितीत असती, आज जाहीर केलेल्या 125 उमेदवारांपैकी पैकी पक्षाने 50 महिलांना उमेदवारी दिली असती का…?? काँग्रेस मधले विविध प्रभावी घटक त्यावेळी “ऍक्टिव्ह” झाले नसते का…??
जात – धर्म – पंथ यांचा विचार उमेदवारी देताना “महिला उमेदवार” या निकषापेक्षा प्रभावी ठरला नसता का…?? हा खरंच चिंतन करण्याचा विषय आहे आणि त्या दृष्टीने सुशीलकुमार शिंदे यांची राजकीय टिपण्णी आपल्याला काही दिशा दर्शवते इतकेच…!! बाकी प्रियांका गांधी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App