द. मा. मिरासदार गेले… द. मा. म्हणजे अस्सल मराठी मातीतल्या कथा… साधीसोपी, निर्मळ भाषा… खिळवून ठेवणारं, खदखदून हसवणारं कथाकथन… द. मा. म्हणजे भोकरवाडीतल्या इरसाल ग्रामस्थांचा जनक… दमांच्या जाण्याने उदास उदास झालेल्या भोकरवाडीतील हा ऑंखो देखा हाल.. Tribute to famous Marathi writer DaMa Mirasdar
भोकरवाडीच्या चावडीवर नाना चेंगट आज उदास बसला होता. कुठल्या भुतानं त्याला कसं घोळसलं, याच्या कथा सांगत नव्हता. पायाला झालेलं कुरूप खाजवायची त्याला आज बुद्धी होत नव्हती, की मांडीला बेचक्यात आलेलं बेंड त्रास देत नव्हतं.
बाबू पैलवान त्याच्या शेजारी येऊन बसला, तरी त्यानं त्याच्या मांडीवर थाप मारून मांडी मोडली नाही, की त्याच्या पाठीत बुक्की हाणली नव्हती. गणामास्तरही गप्प गप्प होता. सरकारच्या नव्या धोरणानं गावाचं कसं भलं होणार आहे वगैरे काही त्याला सुचत नव्हतं.
शिवा जमदाडे उगा खांबाला टेकून बिडी फुकायच्या आवेशात होता, पण बिडी आणि काडी यांची गाठ काही पडली नव्हती.
सकाळचं दोन शेर दूध पिऊन आणि भाकरीचा कुस्करा कालवणासकट खाऊन नागू गवळी चावडीवर आला होता, तरी त्याला आज झोप काही येत नव्हती.
गुंडगुळ्याच्या माळावर साळ्याच्या यशोदेला भुतानं घोळसलं, ते काढायला तुकाराम टेंगळ्याकडे कधी जायचं, याची चर्चा कुणी करत नव्हतं. जगन्याची बायकू कुणाबरोबर पळून गेली, या चर्चेतही आज रस नव्हता. वाघासारखा पसरलेला तुका बनकर, हाडकुळा, निव्वळ कैकाड्याप्रमाणे दिसणारा नामा चौगुले, पोट सुटलेला आणि बेंबीखाली धोतर गेलेला सदा वाणी, उंचेला काळ्याठार वर्णाचा गणपत वाघमोडे, सोबतीला असावा म्हणून हातात कंदील घेऊन आलेला रामा खरात, सगळे सगळे शांत होते.
मध्यवस्तीत असलेल्या पांडू गुराड्याच्या हॉटेलातून चहाभजी मागवावीत, असा विषयही कुणी काढला नव्हता, की पांडूनं मागवलेल्या खव्याच्या गोळ्याबद्दल कुणाला काही बोलायचं नव्हतं.
चिपाडाला सदरा-धोतर घातल्यावर जसं बेंगरूळ दिसेल, तसा बोंबलभिक्या नाना घोडके त्याची एकमेकांना भेटायला जाणारी, खोल गेलेली गालफडं वाजवत हल्ली चावडीवर फिरकला नाही, याबदद्ल कुणाच्या मनात काही शंका आलेली नव्हती. गावातला रिकामटेकडा शंकर येलपलेच काय, एखादं कुलुंगी कुत्रंही त्याच्या घरी आढळायला गेलं नाही याबद्दल लोकांना चिंता नव्हती, की त्याच्या अंथरुणात गेल्या अमावस्येला ढाण्या वाघ रात्रभर झोपला होता आन् डव्हातल्या आसरेच्या आशीर्वादानं तो वाचला, याबद्दल त्यानं सांगितलेली कहाणी खरी का खोटी, याची शहानिशा करावीशी कुणाला वाटत नव्हती.
यदू वडाराच्या व्यंकूनं आजकाल कुणाकडं शिकवणी लावली हाय आन् कुठली बाई ठेवली हाय, याचीही कुणाला पर्वा नव्हती.
सगळे घराबाहेर वाळत टाकलेल्या चिरगुटागत गपकार झाले होते.
“आपले दमा गेले रं!“ शेवटी नानानंच न राहवून टाहो फोडला. “गप लेका! त्ये गेले न्हाईत. परमोशन झालं त्यांचं!“ गणामास्तरांनी मध्यस्थी केली. “परमोशन?“ एव्हाना पटका काखेत धरून हातातल्या चिलमीशी खेळ करत बसलेला महादा म्हणाला.
“व्हय, परमोशन! आजपर्यंत त्यांनी आपल्या कहाण्या, किश्शे सांगून हितल्या लोकांना हसवलं. आता ते इंद्रदेवाच्या दरबारात ३३ कोटी देवांना आन् आसरांना हसवायला गेले हायंत! त्यो बघा, वरनं गडगडाटाचा आवाज येतोय न्हवं का, त्यो दमांचे किश्शे आन् कहाण्यांवरच्या हसण्याचाच!“ गणामास्तरांनी एका दमात सांगून टाकलं आन् सगळे आपापलं दुःख विसरून गाढवासारखं तोंड करून आभाळाकडे बघायला लागले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App