विशेष प्रतिनिधी
चेन्नई : दक्षिण भारतीय सिनेमाचे सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकीय प्रवेशासंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. रजनीकांत यांनी राजकारणातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. तब्येतीच्या कारणावरून राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. Superstar Rajni back out from politics over Health Issues
यापूर्वी ३१ डिसेंबरला आपण आपल्या राजकीय पक्षाची घोषणा करणार आहोत. आणि येत्या जानेवारीत पक्ष लाँच करण्यात येईल अशी घोषणा रजनीकांत यांनी केली होती. मात्र आज सोशल मीडियावर पत्रक शेअर करत रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
हैद्राबाद येथील अपोलो हॉस्पिटलमधून त्यांना आज डिसचार्ज देण्यात आला. “निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश न करता लोकांची सेवा करणार आहे. माझ्या या निर्णयामुळे माझे चाहते आणि लोक निराश होतील. पण कृपया मला माफ करा,” असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.
प्रकृती चिंताजनक असूनही राजकारणात सामील होऊन समर्थकांना खूश करायचे नाही किंवा नंतर निराशही करायचे नाही, असे सांगताना रजनीकांत म्हणाले, “मी खेद व्यक्त करतो की मी राजकीय पक्ष सुरू करून राजकारणात येऊ शकत नाही. ही घोषणा करण्यामागील वेदना मला फक्त ठाऊक आहेत.” वास्तविक जानेवारीत त्यांनी २०२१ ची तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली होती. तथापि, आता त्यांनी निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश न करता जे काही शक्य होईल त्या मार्गाने लोकांची सेवा करणार असल्याचे सांगितले.
यापूर्वी जयललिता यांच्या नेतृत्वाखालील अण्णा द्रमुक पक्षाबद्दल १९९६ साली राज्य पातळीवर असमाधान निर्माण झालं होतं, तेव्हा रजनीकांत यांना आघाडीवर ठेवून काँग्रेस पक्षाला निवडणूक लढवायची होती, असं सांगितलं जातं. त्या वेळी रजनीकांत यांनी शेवटच्या क्षणी माघार घेतली, असंही म्हटलं जातं. १९९६ साली त्यांनी राजकारणात प्रवेश करायला नकार दिल्यानंतर त्यांचे चाहते नाराज झाले होते. राजकारणाच्या बाबतीत मात्र संकोचून जाणं हीच त्यांची खास शैली झाली आहे. या पार्श्वभूमीवर, तामीळनाडूत दोन द्रविडी पक्षांचं वर्चस्व असताना रजनीकांत यांना कोणत्या प्रकारचं राजकारण करायचं आहे, हाच त्यांच्या समोरचा सर्वांत मोठा प्रश्न होता. आता या सर्व चर्चांना पूर्णविराम मिळालेला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App