गैरसमजाचा एक विचित्र परिणाम; ब्लॅक फंगस रोगासाठी झाडांना जबाबदार धरून त्यांच्यावर नाशिकमध्ये कुऱ्हाड…!!

वृत्तसंस्था

नाशिक – कोरोना प्रादूर्भावातून बरे झालेल्या व्यक्तींमध्ये ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीचा प्रादूर्भाव होतोय हे लक्षात आल्यानंतर त्यावर उपाययोजना शोधण्याची शास्त्रज्ञांची आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ञांची धडपड सुरू असताना नाशिकमधला एक विचित्र प्रकार समोर आला आहे. Some people are felling trees due to fears of black fungus, Pankaj Garg, Deputy Forest Conservator, Nashik

माणसामध्ये आढळणाऱ्या ब्लॅक फंगस अर्थात काळ्या बुरशीला झांडांवर उगवलेली बुरशी जबाबदार आहे, असे गृहीत धरून त्यांच्यावर कुऱ्हाड चालविण्याचे विचित्र प्रकार नाशकात सुरू झाल्याचे आढळून आले आहे. नाशिकचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग यांनी ही माहिती एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.

माणसांमध्ये कोरोनानंतर आढळलेल्या ब्लॅक फंगसचा वृक्षांवर आढळणाऱ्या कोणत्याही बुरशीशी काहीही संबंध नाही. माणसांमध्ये आढळणाऱ्या ब्लॅक फंगसची वैद्यकीय कारणे वेगळी आहेत. त्यामध्ये फेस मास्कचा अतिरेकी वापर, कोरोना काळात वापरली गेलेली जादा स्टेरॉइड्स यांच्यामुळे ब्लॅक फंगस होतो, असे वैद्यकीय तज्ञ सांगतात. पण त्याकडे लक्ष न देता नाशिकमधील काही नागरिक बुरशी आढळलेल्या वृक्षांवर कुऱ्हाड चालवत आहेत. ते वाढलेले वृक्ष तोडत आहेत. वास्तविक वृक्षांवरील बुरशी ही पर्यावरणाचा एक भाग आहे. तिचा माणसांमध्ये आढळलेल्या ब्लॅक फंगसशी काहीही संबंध नाही, असे पंकज गर्ग यांनी स्पष्ट केले.

त्यामुळे अकारण गैरसमजातून कोणीही वृक्षतोड करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Some people are felling trees due to fears of black fungus, Pankaj Garg, Deputy Forest Conservator, Nashik