माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे राष्ट्रवादीकरण सुरू आहे. सुषमा अंधारे, लक्ष्मण हाके यांच्या शिवसेना प्रवेशातून तसेच आदित्य ठाकरे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातून ही बाब राजकीय दृष्ट्या अधोरेखित होत आहे. शिवाय त्यात उदय सामंत यांच्या गाडीवरच्या हल्ल्याची भर देखील पडली आहे. उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्याच्या प्रकरणात पुण्यात पोलिसांनी ठाकरे गटाच्या चार-पाच शिवसैनिकांची धरपकड केली आहे. परंतु, हल्ला करणारे शिवसैनिक नव्हते. ते दुसरेच कोणी तरी होते, असा दावा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केला आहे. शिवसेनेचे अनेक नेते त्यांना दुजोरा देत आहेत. याचा नेमका अर्थ काय?? उदय सामंत यांच्या गाडीवर नेमका हल्ला कोणी केला?? त्यांचा राजकीय कल कुठे आहे?? याची उत्तरे नजीकच्या भविष्यात मिळणार आहेत. किंबहुना त्यामागचे राजकीय इंगित देखील राष्ट्रवादीकडेच अंगुली निर्देश करणारे आहे.Shivsena Uddhav Thackeray group; NCP provides political logistics and leadership
सुषमा अंधारे यांचे इन्कमिंग
आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुषमा अंधारे यांना आधीच राष्ट्रवादीतून शिवसेनेत पाठवण्यात आले आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेनेचे उपनेते पद देखील बहाल केले आहे. त्यामुळे संजय राऊत आत मध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्ते पदाचा विशिष्ट प्रश्न सुटला आहे. पण शिवसेनेतले हे इन्कमिंग फक्त सुषमा अंधारे यांच्या पुरतेच मर्यादित नाही. राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील आता शिवसेनेत प्रवेश करते झाले आहेत. मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची ते भेट घेणार असून हातामध्ये ठाकरेंचे शिवबंधन बांधणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच लक्ष्मण हाके यांची राज्य मागासवर्गीय आयोगावर नेमणूक झाली होती. यावरूनच त्यांचा राजकीय कल नेमका कुठे आहे?, हे दिसून येते. आता ते स्वतःहून मातोश्रीवर जाऊन ठाकरेंचे शिवबंधन बांधून घेणार आहेत. याचा राजकीय अर्थ उघड आहे शिवसेनेचे हे राष्ट्रवादीकरण सुरू आहे.
लक्ष्मण हाकेंच्या रूपाने ओबीसी चेहरा
पण मराठी माध्यमांनी मात्र शिवसेनेला लक्ष्मण हाके यांच्या रूपाने ओबीसी चेहरा मिळणार असे वर्णन केले आहे. सुषमा अंधारे यांच्या रूपाने शिवसेनेला आंबेडकरी चळवळीतला चेहरा मिळाला. आता लक्ष्मण हाके यांच्या रूपाने ओबीसी चेहरा मिळतो आहे, अशी मराठी माध्यमांची मखलाशी आहे. प्रत्यक्षात अंधारे यांच्या पाठोपाठ हाके यांचा शिवसेना प्रवेश याचा राजकीय अर्थ शिवसेनेच्या मूळ ठाकरे निष्ठ गटालाही धक्का असाच आहे. कारण सुषमा अंधारे असो किंवा लक्ष्मण हाके असो या दोघांनीही उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वाला अनुसरून शिवसेनेत प्रवेश केलेला नाही, तर आपापल्या मूळ राजकीय विचारसरणीसह ते ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेशले आहेत. याचा राजकीय अर्थ नीट समजून घेतला पाहिजे.
आदित्यच्या दौऱ्याला रसद पुरवठा
शिवसेनेत 40 आमदारांच्या फुटी नंतर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला आहे या दौऱ्यात त्यांना जो प्रतिसाद मिळतो आहे त्याची चर्चा मराठी माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. आदित्य ठाकरे यांच्या भोवती शिवसैनिक प्रचंड गर्दी करत असल्याचे चित्र मराठी माध्यमांनी रंगवले आहे. मात्र, आता त्यामागचे राजकीय इंगित हळूहळू स्पष्ट होत आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना प्रतिसाद देणारा वर्ग हा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पूरवत असतात, असे आरोप आता शिवसेनेच्या शिंदे गटातून होताना दिसत आहेत. किंबहुना आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यातले काही विशिष्ट चेहरे देखील त्याची पुष्टी करत आहेत. शिवसेनेतला ठाकरे गट आमदारांच्या संख्येच्या दृष्टीने कमकुवत असला तरी तो रस्त्यावरच्या आंदोलनामध्ये अथवा शक्तीप्रदर्शनात कमी पडता कामा नये याची “राजकीय काळजी” राष्ट्रवादीचे नेतृत्व घेत असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात आहे. त्याला कारणही तसेच आहे. शिवसेनेतली अभूतपूर्व फूट तळागाळापर्यंत पोहोचल्यानंतर त्याचा विशिष्ट फायदा राष्ट्रवादीला करवून घेण्याचा हा मनसूबा आहे आणि तो ठाकरे गट विशिष्ट शक्ती प्रदर्शनात यशस्वी झाला तरच शक्य होणार आहे!!
शंभूराज देसाईंनी दाखविले बोट
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांच्या शक्तिप्रदर्शनाकडे पाहिले पाहिजे. माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नेमके याच मुद्द्यावर बोट ठेवले आहे. आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यांना “रसद पुरवठा” राष्ट्रवादी आणि काँग्रेस कार्यकर्तेच करत आहेत, असे असा आरोप त्यांनी केला आहे. यासाठी त्यांनी स्वतःच्या पाटण मतदारसंघातले उदाहरण पेश केले आहे. विक्रमसिंह पाटणकर आणि शंभूराज देसाई अशा दोन राजकीय ताकदींमध्ये विभागला गेलेल्या पाटण मतदारसंघात तिसऱ्या पक्षाला स्थान नाही. तरी देखील जेव्हा आदित्य ठाकरे यांच्या भोवती पाटण मतदारसंघात गर्दी जमते याचा अर्थ उघड आहे. पाटणकरांनी त्यांना ताकद दिली आहे, असे शंभूराज देसाई यांचे म्हणणे आहे आणि त्यात राजकीय तथ्य जरूर आहे.
या अर्थाने शिवसेनेचे राष्ट्रवादीकरण सुरू आहे आणि ते थांबणारे नाही. सुषमा अंधारे, लक्ष्मण हाके यांच्या शिवसेना प्रवेशातून आणि आदित्य ठाकरे यांच्या शक्तिप्रदर्शन दौऱ्यातून ते दिसून आले आहे आणि यापुढेही दिसत राहणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App