नाशिक / पुणे : प्रख्यात अभिनेते विक्रम गोखले यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना जी अनेक खळबळजनक वक्तव्ये आणि दावे केले आहेत त्यातले “बिटवीन द लाईन” वाचले असता एक वेगळाच मुद्दा समोर येताना दिसतो आहे. तो म्हणजे शिवसैनिकांची सध्या शिवसेनेत चाललेली घुसमट आणि अस्वस्थताच जणू विक्रम गोखले यांच्या मुखातून बाहेर आली आहे…!!Shiv Sena is very uneasy on two issues
शिवसेनेत दोन मुद्द्यांवरून प्रचंड अस्वस्थता आहे. यातला पहिला मुद्दा शिवसेनेचे ठाण्यातले आमदार प्रताप सरनाईक यांनी उघडपणे मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून व्यक्त केला आहे. केंद्रीय तपास संस्थांचा शिवसेना आमदारांच्या मागे लागलेला ससेमिरा चुकवायचा असेल तर भाजपशी जुळवून घ्या, असा सल्लाच त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात दिला होता. पण त्याहीपेक्षा वेगळा मुद्दा आणि वेगळी अस्वस्थता गेल्या काही दिवसांमध्ये स्पष्ट दिसते आहे, ती म्हणजे उपमुख्यमंत्री – अर्थमंत्री अजित पवार हे शिवसेनेच्या आमदारांना वाटप करताना दुजाभाव करतात असा आरोपही ठळक होत चालला आहे. महाराष्ट्रात 2022 च्या सुरुवातीला होणाऱ्या १८ महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने आमदार निधी या विषयाला फार महत्त्व आहे. त्यात शिवसेना आमदारांना डावलले जात असेल तर ही अस्वस्थता अधिक ठळक होत जाणारी आहे, हे विसरून चालणार नाही शिवसेना नेतृत्वाला यात लक्ष घालावेच लागेल.
त्याही पलिकडे जाऊन गेल्या तीन-चार दिवसांमध्ये महाराष्ट्रात ज्या घटना घडल्या आहेत, अमरावती, नांदेड, मालेगाव, भिवंडी आदी शहरांमध्ये रझा अकादमीने मोर्चे काढले. अमरावती मालेगावमध्ये दगडफेक केली. या स्वरूपाची दंगल करणाऱ्या रझा अकादमीची बाजू शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्वाने घेताना दिसते आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही अस्वस्थता शिवसेनेची हिंदुत्ववादी आणि हिंदूंचा कैवारी म्हणून असलेल्या पक्षाची ओळख पुसते की काय?, या भीतीतून निर्माण झाली आहे… आणि इथेच कदाचित विक्रम गोखले यांच्या आजच्या राजकीय वक्तव्याची “खरी मेख” असू शकते…!!
विक्रम गोखले यांनी कंगना राणावतचे समर्थन केले आहे. ही बातमी प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणावर चालविली आहे. त्याखालोखाल शिवसेनेला अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद दिले नाही ही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यापुढे कबुली दिली अशी बातमीही चालविण्यात येत आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बातमी मराठी माध्यमांनी “डाऊन प्ले” केली आहे, ती म्हणजे विक्रम गोखले हे शिवसेना आणि भाजप यांच्या पुन्हा एकत्र येण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या दोन्ही हिंदुत्ववादी पक्षांना एकत्र येण्यापासून पर्यायच नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
शिवसेनेत हिंदू – मुसलमान प्रश्नावरून असलेली अस्वस्थताच ही विक्रम गोखले यांच्या मुखातून बाहेर आली आहे काय? शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्व एका विशिष्ट कोंडीत सापडले आहे. ही कोंडी फोडण्याचे काम विक्रम गोखले यांचे वक्तव्य करेल काय?, अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
शिवसेना आणि भाजप यांची कोंडी फुटली तर शिवसेनेची हिंदुत्ववादी पक्ष म्हणून असलेली ओळख पुसली जाणार नाही. हिंदू-मुसलमानांच्या मुद्द्यांवर शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागणार नाही. आणि शिवसैनिकांची मतदारांना सामोरे जाताना अडचणी होणार नाहीत, हे मुद्दे इथे महत्त्वाचे आहेत. त्यामुळेच विक्रम गोखले यांनी यापुढचे वक्तव्य करताना, “मी वरिष्ठांचे आदेश प्रदेश काही मानत नसतो, परखडपणे बोलतो”, असेही वक्तव्य केल्याने ही शिवसैनिकांची अस्वस्थताच आहे हे अधिक अधोरेखित होत आहे.
विक्रम गोखले यांनी विविध वक्तव्ये करून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ निर्माण केलीच आहे, पण आता हे राजकारण विशेषत: शिवसेनेतले कोणते वळण घेते?, हे पाहणेही महत्त्वाचे आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App