बेळगावी पराभवाचे लळित; आमचे मराठी – तुमचे मराठी; शिवसेनेचा मराठी जनांमध्येच आपपरभाव…!!

बेळगावातल्या भाजपचा विजयाचे आणि महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पराभवाचे शिवसेनेचे विश्लेषण एकतर्फी आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पडली. ती कशी पडली?? एकीकरण समितीच्या नेत्यांनी एकजूट का राखली नाही?? हे त्यांना सुनावण्यात ऐवजी शिवसेनेने भाजपच्या विजयावर थयथयाट केला आहे. Shiv sena analysis of Belgam defeat is one sided


विनायक ढेरे

आमचे मराठी – तुमचे मराठी; हा मराठी जनांमध्ये आपपरभाव शिवसेनेने केला आहे. बेळगाव महापालिकेत महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाल्यानंतर एकीकरण समितीच्या नेत्यांनी जेवढा थयथयाट केलेला नाही, तेवढा थयथयाट स्वतः निवडणूक न लढविलेल्या शिवसेनेने
बेळगावातल्या पराभवासाठी केला आहे. जणूकाही महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला म्हणजे बेळगावातून मराठी माणूस संपला आणि कन्नड माणूस जिंकला अशा थाटाचे अग्रलेख लिहिले आहेत.

ही नुसती वस्तुस्थितीकडे डोळेझाक नाही तर उघडपणे “फेक न्युज” पसरवण्याचा प्रकार आहे. कारण बेळगावात जिंकलेले भाजपचे उमेदवार हे मराठी भाषकच आहेत. इथे शिवसेनेने “आमचे मराठी – तुमचे मराठी” असा मराठी जनांमध्ये आपपरभाव केला आहे.

महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाल्याचे शिवसेनेचे विश्लेषण अत्यंत एकतर्फी आहे. जणूकाही बेळगावातली जनता ही महाराष्ट्र एकीकरण समितीचा राजकीय वेठबिगार होती. येथील मराठी जनतेने कायम महाराष्ट्र एकीकरण समितीलाच मतदान केले पाहिजे, असा शिवसेनेचा दावा आहे. तो दावा मराठी जनतेने मानला नाही म्हणून बेळगावच्या मराठी जनतेने काही अपराधच केला आहे अशा भावनेतून शिवसेनेने थयथयाट केला आहे.

वास्तविक पाहता एकीकरण समितीच्या पराभवाचे आणि भाजपच्या विजयाचे वस्तुनिष्ठ विश्लेषण केले तर असे काहीही आकाश कोसळले नसल्याचे दिसून येते. किंबहुना शिवसेनेचा थयथयाट किती फुकाचा आहे हेही लक्षात येते. महाराष्ट्र एकीकरण समितीत उभी फूट पडली हे शिवसेनेने अग्रलेखातून दडवले असले तरी बेळगावच्या जनतेच्या लक्षात आल्याशिवाय ते राहिले नाही. शिवाय निवडणुकीसाठी जी व्यूहरचना तयार करावी लागते, एकजूट दाखवावी लागते ती दाखवण्यात ती व्यूहरचना तयार करण्यात बेळगावातली जनता अपुरी पडली नाही, तर महाराष्ट्र एकीकरण समिती अपुरी पडली हे खणखणीतपणे त्या समितीला सुनवण्याचे सोडून टभाजपच्या विजयाचा द्वेष करण्यात शिवसेना गुंतली आहे.महाराष्ट्र एकीकरण समितीत एकजूट घडवणे किंवा टिकवणे हे कुठल्या ही राजकीय पक्षाचे काम नाही. हे स्वतः समितीचे काम आहे. समितीतल्या नेत्यांचे काम आहे. बाहेरून येऊन त्यांच्यात कोणी एकजूट घडवणे हे इतरांचे कर्तव्य नाही. हे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या इतरांना तत्वज्ञान शिकवणाऱ्या नेतांना सणकावण्याची गरज आहे. ते न करता शिवसेनेने भाजपच्या विजयाबद्दल नुसती आदळआपट करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अटकेनंतर महाराष्ट्रात कसे लाडू खाल्ले… भिवंडीत कसे फटाके फुटले… वगैरे आक्रस्ताळी भाषा वापरली आहे. पण आक्रस्ताळी भाषा वापरून सत्य लपत नाही.

बेळगावातल सत्य हेच आहे महाराष्ट्र एकीकरण समितीत फूट पडली. भाजपने संघटितपणे निवडणूक लढवली. शिवसेना आणि राष्ट्रवादी यांनी प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी तटस्थ भूमिका घेतली आणि एकीकरण समितीच्या उमेदवारांना बाहेरून पाठिंबा दिला. यात एकीकरण समितीचा पराभव झाला आहे. भाजपचा विजयाविषयी थयथयाट करण्यापेक्षा एकीकरण समिती समितीचा पराभव का झाला याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण करून त्यांच्या नेत्यांना ते सुनावले असते तर अधिक बरे झाले असते. पण नाही… प्रत्यक्ष निवडणुकीत काम करायचे नाही आणि निवडणुकीत दुसऱ्याचा पराभव झाल्यानंतर आपण नक्राश्रू ढाळायचे प्रकार शिवसेनेने केला आहे.

याखेरीज एक धादांत खोटी गोष्ट पसरवण्यात आली आहे. काँग्रेसने म्हणे मराठी जनांमध्ये फूट पाडण्याचा कधी प्रयत्न केला नाही. हे असत्य शिवसेनेने पसरविले आहे.

अख्खे बेळगाव काँग्रेसच्या राजवटीत कर्नाटकात ढकलण्यात आले. निजलिंगप्पा – महाजन आयोग कर्नाटकी पक्षपाती नेते होते. केंद्रात, महाराष्ट्रात आणि कर्नाटकात काँग्रेसच्या राजवटी होत्या. बेळगाव कर्नाटकात ढकलण्यासाठी हा काँग्रेस पक्ष उभा – आडवा कारणीभूत होता आणि तरीही त्याला त्याने मराठी जनांमध्ये फूट पाडली नाही अशी शिवसेनेने क्लीन चिट देऊन टाकली आहे. ही राजकीय बदमाशी त्यांनी केली आहे. भाजपच्या विजयाचा थयथयाट करायला हरकत नाही, पण आपण मराठी राजकारण करायचे आणि प्रत्यक्षात बेळगावात भाजपचे मराठी उमेदवार निवडून आले हे दडवून ठेवायचे याच्या सारखी देखील दुसरी राजकीय बदमाशी नाही हे आवर्जून केले पाहिजे.

Shiv sena analysis of Belgam defeat is one sided

महत्त्वाच्या बातम्या