“राष्ट्रवादी काँग्रेस मधली धुसफूस बऱ्याच वर्षांपासूनची आहे. पक्ष चालवताना शरद पवारांच्या काही चुका झाल्या असतील, पण तो कौटुंबिक वाद आहे. त्यावर मी बोलणे योग्य होणार नाही. पण राष्ट्रवादीतल्या फुटीचा विरोधी पक्षांवर परिणाम झालाय. महाविकास आघाडीवर परिणाम झालाय हे खरे आहे. मुलीला पुढे आणण्यासाठी कदाचित शरद पवारांनी स्वतःहून राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या इतर नेत्यांना बाजूला केले असावे. पण तो त्यांचा पक्षांतर्गत मानला आहे. त्यावर मी बोलणे उचित नाही,” असे वक्तव्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. पृथ्वीराज चव्हाण यांचे हे वक्तव्य शरद पवारांच्या जखमेवर मलम लावणारे आहे की मीठ चोळणारे आहे??, या विषयावर महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात खुसखुशीत चर्चा सुरू झाली असल्यास नवल नाही!!Sharad pawar left all NCP leadership for his daughter; prithviraj chavan applied salt on pawar’s wound
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी कराडमध्ये प्रीती संगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी शरद पवारांचे आणि आपले जुने राजकीय वैर विसरून पृथ्वीराज चव्हाण त्यांच्या स्वागतासाठी कराडच्या रस्त्यावर उभे राहिले. ते त्यांच्या समवेत यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवर देखील दर्शनाला गेले. तिथे झालेल्या शरद पवार समर्थकांच्या मेळाव्यात शरद पवारांच्या शेजारी खुर्चीवर बसले. शरद पवारांनी देखील त्यांचा माजी मुख्यमंत्री म्हणून आदरपूर्वक उल्लेख केला.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीतल्या फुटीविषयी माध्यमांशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगळे वक्तव्य केले आणि या वक्तव्यामुळेच त्यांनी शरद पवारांच्या जखमेवर मलम लावले आहे की मीठ चोळले??, असा सवाल तयार झाला आहे.
शिवसेनेतून राज ठाकरे ते एकनाथ शिंदे सर्व नेते उद्धव ठाकरेंवर ठपका ठेवत बाहेर पडले. तसेच राष्ट्रवादीतले नेतेही अजितदादांसमवेत सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला काम करणे जमणार नाही, हे लक्षात घेऊनच सूचकपणे बाहेर पडले. शरद पवारांवर त्यांनी अनेक हेत्वारोप केले. अजितदादांनी तर शरद पवारांच्या राजकीय चुकांची, विश्वासघातकी राजकारणाची जंत्री वाचून त्यांचे राजकीय पोस्टमार्टेम केले.
या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांनी शरद पवारांच्या राजकारणावर टिपण्णी केली. जो आरोप अजितदादा समर्थकांनी राष्ट्रवादी फोडताना शरद पवारांवर लावला होता, त्याच स्वरूपाचा पुनरुच्चार पृथ्वीराज चव्हाण यांनी आवर्जून केला. त्यांचे राजकीय टाइमिंग आणि त्यांनी वापरलेले शब्द यातून त्यांनी शरद पवारांच्या जखमेवर मलम लावले आहे की मीठ चोळले आहे??, अशी शंका कोणाला येत असेल तर ती गैर म्हणता येणार नाही. विशेषतः शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यातील राजकीय द्वैत लक्षात घेता ते जखमेवर मलम लावण्यापेक्षा मीठच चोळले आहे हेच द्रुगोचर होते!!
फायलींवर सह्या करायला मुख्यमंत्र्यांच्या म्हणजेच पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारला आहे, अशी शेरेबाजी शरद पवार यांनी काही वर्षांपूर्वी केली होती. पृथ्वीराज चव्हाण यांनीच सिंचन घोटाळ्याच्या चौकशीला सुरुवात होईल याची “व्यवस्था” केली होती. राज्य शिखर बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यावर प्रशासक नेमला होता. पवारांच्या विरुद्ध खऱ्या अर्थाने ही राजकीय कारवाई देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे या मुख्यमंत्र्यांनी केली नव्हती, तर ती पृथ्वीराज चव्हाण यांनी केली होती!! त्यामुळे शरद पवारांचा पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर खऱ्या अर्थाने राग आहे.
पण पृथ्वीराज चव्हाण यांनी पवारांबरोबरचे आपले राजकीय वैर विसरून त्यांचे कराडमध्ये स्वागत केले होते, ही देखील वस्तुस्थिती आहे. पण आता मात्र आपल्या मुलीला पुढे आणण्यासाठी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना बाजूला सारले, असे वक्तव्य करून पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवारांच्या जखमेवर मलमरुपी मीठ चोळल्याचे उघड दिसते!!
पवार मुलीचे करिअर घडवू शकतील??
पण त्या पलीकडे जाऊन पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यातले सत्य शोधले किंवा ते सत्य मानले, तर शरद पवार आपल्या मुलीसाठी इतर नेत्यांना बाजूला सारून तिचे राजकीय करिअर स्वतंत्रपणे घडवू शकतील का??, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. शरद पवारांचे वय 83 आहे आणि सुप्रिया सुळे 54 वर्षांच्या आहेत. शरद पवार राजकीय कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहेत आणि सुप्रिया सुळे त्यांच्या कारकिर्दीच्या मध्यावर आहेत.
मूळात इतर नेते बाजूला सारून सुप्रिया सुळे यांचे राजकीय करिअर यापुढे उंचावेल याची शक्यता किती आहे?? शरद पवार महाराष्ट्रभर दौरा काढतील. सुप्रिया सुळे त्यांच्याबरोबर सावली सारख्या असतील किंवा त्या स्वतंत्र दौरा काढतील. त्यांच्याभोवती त्यांचे समर्थक जरूर जमतील, पण राष्ट्रवादीची संपूर्ण यंत्रणा तिच्या मूलभूत क्षमतेसह परत उभी राहू शकेल का?? हा सगळ्यात कळीचा सवाल आहे.
राष्ट्रवादी म्हणजे शिवसेना नव्हे
राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शिवसेना नव्हे, जी वारंवार फुटून पुन्हा उभी राहू शकेल!! शिवसेना शिवसैनिकांचा पक्ष आहे. शिवसैनिक कोणाच्याही बाजूने असले तरी रस्त्यावर येऊन संघर्ष करणे हा त्यांचा स्थायीभाव आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा सुभेदार – सरंजामदारांचा पक्ष आहे. शरद पवारांनी या सुभेदारांना खतपाणी घातल्यामुळे ते डवरले आहेत. अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे राष्ट्रवादीचे सगळे सुभेदार आणि सरंजामदार आपल्याबरोबर घेऊन गेले आहेत. राष्ट्रवादी हा राजकीय भांडवली पक्ष आहे आणि हे राजकीय भांडवल अजित पवार आणि त्यांच्याबरोबरच्या साथीदारांसह घेऊन गेले आहेत.
अशावेळी शरद पवारांच्या भोवती समर्थकांची गर्दी जमेल. “83 वर्षाचा योद्धा” हे भावनिक भांडवल त्यांच्याभोवती गर्दी जमवण्यासाठी जरूर चालेल, पण त्यापलीकडे राष्ट्रवादी उभारण्यासाठी जे राजकीय भांडवल लागेल ते कुठून आणणार??, हा प्रश्न आहे.
शरद पवार कदाचित ते भांडवल उभी करू शकतीलही. पण आता वय त्यांच्या विरोधात आहे. अजून किती दिवस ते पर्यायी राजकीय भांडवल उभे करून आपल्या मुलीचे राजकीय करिअर सावरून धरतील?? अखेरीस सुप्रिया सुळे यांना स्वतःलाच स्वतःचे राजकीय करिअर पुढे न्यावे लागेल आणि त्यावेळी त्या राष्ट्रवादीच्या मूलभूत स्वरूपाचे राजकीय भांडवल कितपत उभ्या करू शकतील??, हा खरा प्रश्न आहे.
शरद पवारांच्या नेतृत्वाकडे सरंजामदार – सुभेदारांना खेचून घेण्याचे आकर्षण आहे. प्रसंगी त्यांची हेकडी काढण्याची क्षमता आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे हे दोन्ही “गुण” आहेत का?? हे “गुण” तर अजितदादांनी शरद पवारांकडून आत्मसात केले आहेत. त्यामुळेच तर राष्ट्रवादीतले सरंजामदार – सुभेदार त्यांच्याबरोबर निघून गेले आहेत.
सुप्रिया सुळे त्यांच्या भोवती जमा होणाऱ्या सरंजामदार – सुभेदारांना वेसण घालून पक्षाचा लगाम हातात ठेवू शकतील का??, हा मूलभूत प्रश्न आहे. किंबहुना तो लगाम हातात महिनाभर सुद्धा ठेवता आला नाही, ही तर वस्तुस्थिती आहे.
मुलीला पुढे आणण्यासाठी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या इतर नेत्यांना बाजूला सारले, हे म्हणणे सोपे आहे. पण त्यानंतर मुलीचे करिअर उभे करणे फार अवघड आहे. पृथ्वीराज चव्हाण यांनी वर उल्लेख केलेले वक्तव्य करून शरद पवारांच्या जखमेवर मलमरुपी मीठ चोळले आहे.
पृथ्वीराज चव्हाणांचा काँग्रेसी इतिहास
शेवटी पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेस सारख्या जुन्या लोणच्याच्या बरणीत मुरलेले नेते आहेत. यशवंतराव चव्हाण यांच्या विरोधात आपले राजकारण दिल्लीतून करणाऱ्या नेहरूनिष्ठ आनंदराव चव्हाण यांचे ते पुत्र आहेत आणि कधीही काँग्रेस न सोडलेल्या प्रेमालाकाकी चव्हाण या त्यांच्या आई आहेत, हे विसरून चालणार नाही.
आपल्या राजकीय करिअरमध्ये ते पंतप्रधान कार्यालयाचे सहा वर्षे राज्य मंत्री होते, हेही विसरून चालणार नाही. किंबहुना पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजकारणाचा तो “सर्वात मोठा अर्क’ आहे ही बाब अधोरेखित आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App