पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे भक्त आहेत, हे सांगायला फार मोठ्या कोणत्या इतिहास तज्ञाची अथवा राजकीय तज्ञाची गरज नाही. पण नरेंद्र मोदींची सावरकर भक्ती ही फक्त आता त्यांच्या अंदमान भेटी पुरतीच मर्यादित राहिलेली नाही किंवा सावरकरांची जयंती आणि पुण्यतिथी या दिवशी ट्विट करून श्रद्धांजली वाहण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही… तर नरेंद्र मोदींची “राजकीय वाटचाल” खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घालून दिलेल्या “राजकीय वाटेवर” होताना दिसते आहे…!!Savarkar – Modi Saffron Cap: Wearing saffron hat, Modi walks in Savarkar’s “political way
सावरकर – मोदींची भगवी टोपी
मात्र, हा बदल अचानक घडलेला नाही. नरेंद्र मोदींनी हा बदल अतिशय विचारपूर्वक आणि दमदार पावले टाकत सुरू केला आहे. देशात कधी नव्हे एवढे “राजकीय हिंदुत्वाला” अनुकूल वातावरण तयार केले असताना नरेंद्र मोदी यांनी सावरकर जी भगवी टोपी हिंदुमहासभेच्या अधिवेशनात परिधान करीत असत तशीच भगवी टोपी परिधान करायला सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत वाराणसीच्या रोड शो मध्ये पहिल्यांदा नरेंद्र मोदी हे भगव्या टोपीत दिसले.
तेव्हा हा बदल लोकांच्या फार लक्षात आला नाही, पण आज जेव्हा ते गुजरात मध्ये अहमदाबादच्या रोड शो मध्ये देखील भगवी टोपी परिधान करून दिसले तेव्हा त्यांच्या भगव्या टोपीची वेगवेगळ्या अंगांनी प्रसारमाध्यमांमध्ये चर्चा व्हायला सुरुवात झाली…!! पण कोणीही सावरकरांची भगवी टोपी अशा स्वरूपाचा थेट उल्लेख केलेला आढळला नाही. त्यामुळे या गोष्टीचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की नरेंद्र मोदी यांची वाटचाल राजकीय अर्थाने देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांनी घालून दिलेल्या राजकीय वाटेवर होताना दिसत आहे…!!
टोपी सावरकरी, स्टाईल नेताजींची!!
अर्थात टोपीत थोडा फरकही आहे. मोदींच्या टोपीत थोडा उत्तराखंडचा ढंग आहे. ते भगवी टोपी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्टाईलमध्ये परिधान करताना दिसतात. मात्र सावरकरांची भगवी टोपी आणि मोदींची भगवी टोपी यात भगव्या रंगात तसूभरही फरक नाही.
सावरकरांचे लोकशाही राजकारण
स्वातंत्र्यवीर सावरकरांना लोकशाही मार्गाने वाटचाल करताना कोणतीही “व्होट बँक” मान्य नव्हती. त्यामुळे त्यांनी हिंदू महासभेसारख्या संस्थेत मुस्लिमांना प्रवेश देणे हा विषय बाजूला ठेवला होता. याच मुद्द्यावर त्यांचे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याशी मतभेद होते. पण हा झाला इतिहास.
आज उत्तर प्रदेशात नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या भाजपने एकाही मुस्लिम व्यक्तीला केवळ तो मुस्लिम आहे म्हणून उमेदवारी देऊन त्या समाजाचे कोणत्याही स्वरूपाचे लांगुलचालन केले नाही. तरी देखील मोदी आणि योगी यांच्या नेतृत्वाखाली भाजप जिंकला हीच ती नेमकी सावरकरांनी घालून दिलेली “राजकीय वाट” आहे.
व्होट बँक राजकारण नाही
सावरकरांनी हिंदू महासभेमधल्या भाषणात अनेकदा हे स्पष्ट केले होते की आम्ही मुस्लिमांची राजकीय सहअस्तित्व मान्य करायला अजिबात मागेपुढे पाहणार नाही पण त्यांची स्वतंत्र “व्होट बँक” अथवा त्यांचे लांगूलचालन आम्ही अजिबात करणार नाही. सावरकरांच्या या भूमिकेचे लखनऊ मधल्या शिया मुस्लिमांनी स्वागत केले होते. त्यांच्या प्रतिनिधींनी सावरकरांशी चर्चा देखील केली होती. 1941 मध्ये आझाद मुस्लिम कॉन्फरन्स या संस्थेला सावरकरांनी बैठकीसाठी शुभेच्छा दिल्या होत्या.
सावरकरी राजकीय धागा
सावरकरांच्या भूमिकेचा नेमका राजकीय अर्थ लक्षात घेतला तर एक बाब स्पष्ट होते की मुस्लिम हा समाजघटक केवळ राजकीय दृष्ट्या अपरिहार्य माणूस सावरकर फक्त त्यावर आधारित राजकारण करू इच्छित नव्हते. नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सध्या सुरू असलेल्या राजकीय वाटचालीत नेमका हाच “सावरकरी राजकीय धागा” मजबूत होताना दिसतो आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भगवी टोपी परिधान करण्याच्या राजकीय निर्णयाचे रहस्य देखील यात दडले आहे…!!
भाजपने वाटल्या भगव्या टोप्या
आज मोदींच्या अहमदाबाद रोड शो मध्ये 4 लाख लोक सहभागी झाल्याचे सांगण्यात येते. यापैकी 1 लाख कार्यकर्त्यांना भाजपने भगव्या टोप्या वाटल्या होत्या. हिंदू महासभा अधिवेशनात अशाच भगव्या टोप्या परिधान केल्या जायचा त्याची या निमित्ताने एक ऐतिहासिक आठवण होत आहे.
सावरकरांचे संरक्षण धोरण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने यापूर्वीच सावरकरांच्या विचारानुसार देशाचे आत्मनिर्भर संरक्षण धोरण आखले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी त्याचे क्रेडिटही सावरकरांना उघडपणे दिले आहे. नरेंद्र मोदींनी आता त्यापुढे जाऊन सावरकर परिधान करीत असलेली भगवी टोपी स्वतः परिधान करून सावरकरांनी घालून दिलेल्या “राजकीय वाटेवर” देखील उघडपणे वाटचाल करायला सुरुवात केली आहे…!! हे आज मोदींच्या गुजरात नवऱ्या पासून स्पष्ट होताना दिसत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App