मोदी मंत्रीमंडळातील नवे सदस्य, आयएएस अधिकाऱ्यापासून ते डॉक्टर आणि इंजिनिअरही, नव्याने सहभागी झालेल्या मंत्र्यांचा राजकीय प्रवास…वाचा सविस्तर

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात नव्याने सहभागी झालेल्या मंत्र्यांमध्ये आयएएस अधिकाऱ्यापासून ते डॉक्टर आणि इंजिनिअरचा समावेश आहे. या मंत्र्यांमध्ये बहुतांश तरुण असून मोदी मंत्रीमंडळाचे सरासरी वय ५८ वर्षे आहे. नव्याने सहभागी झालेल्या मंत्र्यांचा राजकीय प्रवास… New members of Modi’s cabinet, from IAS officers to doctors and engineers

माजी आयएएस अधिकाऱ्याच्या खांद्यावर रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी

माजी आयएएस अधिकारी अश्विनी वैष्णव यांच्यावर देशातील सर्वाधिक महत्वाच्या असलेल्या रेल्वे मंत्रीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचा (आयटी) कारभारही तेच पाहणार आहेत.

राजस्थानातील जोधपूर येथे जन्म झालेले ५१ वर्षीय अश्विनी वैष्णव हे ओडिशा केडरचे आयएएस अधिकारी आहेत. बालेश्वर आणि कटक जिल्ह्याची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. १९९९ मध्ये ओडिशामध्ये आलेल्या भीषण चक्रीवादळाच्य वेळी त्यांनी प्रशासकीय कौशल्याचे दर्शन घडवित अनेकांचे प्राण वाचविले होते. दोन वर्षांपूर्वी त्यांनी स्वेच्चानिवृत्ती घेतली होती. भारतीय जनता पक्षाकडे त्यावेळी ओडिशा विधानसभेत पुरेसे बळ नसतानाही अश्विनी वैष्णव यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीला ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनीही पाठिंबा दिल्याने त्यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती.

वेष्णव यांनी २००३ पर्यंत ओडिशामध्ये काम केले. २००३ मध्ये ते तत्कालिन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे सचिव बनले.
वैष्णव हे आयआयटीतून शिकले आहेत. २००८ मध्ये सरकारी नोकरी सोडून त्यांनी अमेरिकेतील व्हार्टन विद्यापीठातून एमबीए केली. त्यानंतर अनेक बड्या कंपन्यांमध्ये मोठ्या पदांवर काम केले. त्यानंतर गुजरातमध्ये त्यांनी ऑटो उपकरणाच्या कंपन्यांची उभारणी केली. त्यांना भारतीय प्रेस परिषदचे सदस्य म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते.

 

सर्बानंद सोनवाल : आसाम गणसंग्राम परिषदेचे स्ट्रॉँगमॅन ते मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री

आसाममधील विद्यार्थी चळवळीचा चेहरा असलेले सर्बानंद सोनवाल हे एकेकाळी श्री दिब्रुगड स्ट्रॉँगमॅन होते. आसाम गणसंग्राम परिषदेतून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाला पहिल्यांदाच आसाममध्ये विजय मिळवून देणाºया सर्बानंद सोनवाल यांना मुख्यमंत्रीपद बहाल करण्यात आले. मात्र, कॉँग्रेसमधून भाजपात आलेल्या हेमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी त्यांनी खुर्ची खाली केली. त्यांना आता केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे.

दिब्रुगड विद्यापीठातून पदवी आणि गोहती विद्यापीठातून एलएलबीची पदवी घेतलेले सोनवाल आक्रमक विद्यार्थी नेते म्हणून ओळखले जात होते. आसाममधील विद्यार्थी आंदोलनात त्यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. मात्र, माजी मुख्यमंत्री प्रफुल्ल पटेल यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी २०११ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला. २०१२ मध्ये ते आमदारपदी निवडून आले. २०१४ मध्ये त्यांची केंद्रीय मंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली. मात्र, आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन पुन्हा आसामची सूत्रे हाती घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकांत आसाममध्ये भाजपाने विजय मिळविला. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेसमधून भाजपात आलेले हेमंत बिस्वा सरमा यांच्यासाठी त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडले. त्यामुळे त्यांचा केंद्रीय मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.

 

कपिल पाटील : सरपंच ते केंद्रीय मंत्री

भिवंडीचे खासदार कपिल पाटील यांचा सरपंच ते केंद्रीय मंत्री असता प्रवास झाला आहे. भिवंडी तालु्क्यातील दिवे अंजूर गावच्या सरपंचपदावरून कपिल पाटील यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य म्हणूनही काम केले. यानंतर राष्ट्रवादीच्या वतीने जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांव्यतिरिक्त त्यांना मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपदही सोपविण्यात आले.

सन २०१४ मध्ये कपिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविली. भिवंडीमधून ते सन २०१४ ते २०१९ या काळात लोकसभेचे खासदारही होते. कपिल पाटील यांच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपला ओबीसी मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. कपिल पाटील हे देखील भाजपचे ओबीसी चेहरा आहेत. ठाणे आणि नवी मुंबईत बहुसंख्येने असलेल्या आगरी समाजाचे ते नेते आहेत. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे हे नाव न देता दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची त्यांनी मागणी केली होती. या मागणीसाठी आगरी समाज आक्रमक झाला आहे. या समाजातील नेत्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजप आता शिवसेनेला कमकुवत करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राजकीय वतुर्ळात बोलले जात आहे. कपिल पाटील यांचे बीएपर्यंत शिक्षण झाले आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असा प्रवास करीत त्यांनी खासदारकीपर्यंत मजल मारली.

भागवत कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला प्रथमच केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान

भागवत कराड यांच्या रुपाने औरंगाबाद जिल्ह्याला प्रथमच मंत्रीमंडळात स्थान मिळाले आहे. औरंगाबादमधून गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना आणि आता एमआयएमचे खासदार आहेत. त्यामुळे राज्यसभेवर निवडून गेलेल्या औरंगाबादच्या खासदारांना मंत्रीमंडळात स्थान देण्यात आले आहे.
भागवत कराड औरंगाबादचे दोनवेळा महापौर होते. ग्रामीण विद्युतीकरण महामंडळाचे स्वतंत्र संचालकही होते. भाजपचे उपाध्यक्ष अशीही त्यांच्याकडे पदे आहेत. भागवत कराड हे डॉक्टर असून औरंगाबादमधील नूतन कॉलनी येथे त्यांचे ‘कराड हॉस्पिटल’ नावाने रुग्णालय आहे. त्यांचे शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ येथे त्यांचे शिक्षण झाले आहे.

डॉ. वीरेंद्र कुमार : केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाची जबाबदारी शिक्षणतज्ज्ञाकडे

मध्य प्रदेशातील सागर येथील डॉ. वीरेंद्र कुमार एक शिक्षणतज्ज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्रात एमए केले असून बाल श्रम विषयात पीएचडी केली आहे. लहानपणापासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जोडले गेले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे जिल्हा संयोजक म्हणून त्यांनी कामाला सुरूवात केली. भारतीय जनता युवा मोचार्चे ते महासचिव होते. १९८७ मध्ये बजरंग दलाचे संयोजक होते. त्यांनी सलग पाच वेळा लोकसभेची निवडणूक जिंकली आहेत. २०१४ मध्ये लोकसभेत निवडून आल्यावर त्यांनी महिला आणि बालकल्याण तसेच अल्पंसख्यांक विभागाचे राज्यमंत्री म्हणून काम करत आहेत.

निशित प्रमाणिक : पश्चिम बंगालमधील भाजपा कार्यकर्त्यांना बळ

पश्चिम बंगालमधील कूचबिहार लोकसभा मतदारसंघातून निशित प्रमाणिक निवडून आले आहेत. त्यांनी २०१९ मध्ये तृणमूल कॉँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांनी बीसीएच ही पदवी प्राप्त केली आहे. नुकत्याच झालेल्या पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकांत दिनहाटा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडूनही आले होते. मात्र, त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. निशीत प्रमाणिक का राजवंशी समुदायाचे नेते आहेत. उत्तर बंगालमध्ये भाजपाचा प्रसार करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

एल. मुरुगन : तामीळनाडूमधून प्रथमच भाजपाचे मंत्री
एल. मुरुगन हे भारतीय जनता पक्षाचे तामीळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आहेत. एक यशस्वी वकील म्हणून त्यांची ओळख आहे. १९९७ पासून ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करत आहेत. त्यांनी कायदा विषयात मास्टर्स आणि पीएचडी केली आहे.

जॉन बारला : वेगळ्या उत्तर बंगालसाठी लढा

पश्चिम बंगालच्या अलिपूरदुआ मतदारसंघातून जॉन बारला भाजपाच्या तिकिटावर २०१९मध्ये निवडून आले आहेत. विकास होत नसल्याने उत्तर बंगालला पश्चिम बंगालपासून वेगळे करण्याची मागणी ते सातत्याने करत आहेत. उत्तर बंगालला वेगळ्या राज्याचा दर्जा द्यावा किंवा केंद्रशासित प्रदेश बनवावे अशी त्यांची मागणी आहे.

राजकीय पाटी कोरी असलेल्या डॉ. महेंद्रभाई मुंजुपारा यांना संधी
डॉ. महेंद्रभाई मुंजुपारा हे गुजरातमधील सुरेंद्रनगर लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते निष्णात डॉक्टर असून इंडियन मेडीकल असोसिएशनच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत. त्यांनी विविध शिबीरांमध्ये आठ लाखांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मुंजुपारा यांची २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतील उमेदवारी आश्चर्यकारक मानली जात होती.

आदिवासी नेते बिश्वेश्वर तुड्डू यांना संधी
बिश्वेश्वर तुड्डू हे ओडिशातील आदिवसींसाठी आरक्षति मयुरभंज मतदारसंघातून निवडून आले आहेत. आदिवासी नेते म्हणून त्यांची ओळख आहे. भारतीय जनता पक्षाचे मध्य प्रदेशचे सहप्रभारी म्हणूनही त्यांनी काम केले होते. राजकारणात कोरी पाटी असलेल्या तुड्डू यांनी ओडिशा हायड्रोपॉवर कॉपोर्रेशनमध्ये इलेक्ट्रिक इंजिनिअर असलेल्या तुड्डू स्वेच्छानिवृत्ती घेऊन २०१९ मध्ये भाजपाच्या वतीने निवडणूक लढविली होती. त्यांनी बिजू जनता दलाचे देबाशिष मरांडी आणि झारखंड मुक्ती मोचार्चे प्रमुख शिबू सोरेन यांच्या कन्या अंजनी या बलाढ्य उमेदवारांचा पराभव केला होता.

राजकुमार राजन सिंह : मणिपूरमधील पर्यावरणवादी कार्यकर्ते
राजकुमार राजन सिंह हे इनर मणिपूर मतदारसंघातून भारतीय जनता पक्षातर्फे निवडून आले आहेत. राजकुमार सिंघ यांनी गुवाहाटी विद्यापीठातून पीएचडीची पदवी मिळविली असून मणिपूर विद्यापीठातून संचालक पदावरून ते निवृत्त झाले आहेत. पर्यावरणवादी कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.

 

जंगलमहाल परिसरातील भाजपाचा चेहरा सुहास सरकार

पश्चिम बंगालमधील बांकुरा लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले सुहास सरकार हे पेशाने डॉक्टर आहेत. बांकुरा हा प्रसिध्द अभिनेत्री मूनमून सेन यांचा मतदारसंघ होता. मात्र, त्या मतदारसंघात फारशा फिरकत नसल्याने तृणमूल कॉँग्रेसने ज्येष्ठ नेते सुब्रता मुखर्जी यांना उमेदवारी दिली. राजकारणात कोरी पाटी असली तरी प्रथितयश डॉक्टर असलेल्या सुहास सरकार यांनी त्यांचा पराभव केला. जंगलमहाल परिसरात त्यांचा प्रभाव आहे.

 

भागवत खुंबा : पहिलीच निवडणूक जिंकून बनले मंत्री

कर्नाटकातील बिदर लोकसभा मतदारसंघातून भागवत खुंबा हे निवडून आले आहेत. त्यांनी इंजिअरींगची पदवी घेतली आहे. २०१४ मध्ये त्यांनी माजी मुख्यमंत्री धर्मसिंह यांचा एक लाख मतांनी पराभव केला होता. खुंबा यांनी लढविलेली ही पहिलीच निवडणूक होती.

 

देवुसिंह चौहान : ब्रॉडकास्ट इंजिनिअर ते केंद्रीय मंत्री

आॅल इंडिया रेडिओवर ब्रॉडकास्ट इंजिनिअर ते केंद्रीय मंत्री असा देवुसिंह चौहान यांचा प्रवास आहे. गुजरातमधील खेडा लोकसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. १९८९ ते २९९२ पर्यंत देवूसिंह चौहान यांनी बारा वर्षे आॅल इंडिया रेडिओमध्ये काम केल्यावर राजीनामा देऊन राजकारणात प्रवेश केला. ते इतर मागासवर्गीय समाजातील ठाकोर-क्षत्रिय समाजातील असून गुजरातमध्ये या पक्षाची मोठी मतपेढी आहे. खेडा जिल्ह्यातील मातार विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा २००७ मध्ये निवडून आले. खेडा हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता. २००९ मध्ये कॉँग्रेसचे दिनशा पटेल यांच्याकडून त्यांचा केवळ ७२१ मतांनी पराभव झाला होता. त्यामुळे २०१२ मध्ये त्यांनी पुन्हा आमदारकीची निवडणूक लढविली आणि ते आमदार बनले. मात्र, २०१४ मध्ये त्यांनी दोन लाखाहून अधिक मतांनी दिनशा पटेल यांचा पराभव केला. त्यांनतर २०१९ मध्ये ते पुन्हा याच मतदारसंघातून निवडून आले.

शांतनू ठाकूर यांच्या रुपाने मतुआ समाजाला प्रतिनिधीत्व

पश्चिम बंगालमधील बनगाव लोकसभा मतदारसंघातून शांतनू ठाकूर हे निवडून आले आहेत. मतुआ समाजावर त्यांचा प्रभाव आहे. शांतनू पश्चिम बंगालमधील ज्येष्ठ समाजसुधारक हरिश्चंद्र ठाकुर यांच्या परिवारातील आहे. बांग्ला देशातील शरणार्थी असलेल्या मतुआ समाजाला नागरिकत्व देण्याची घोषणा भाजपाने केली आहे.

 

अजय मिश्रा उर्फ टेनी : उत्तर प्रदेशातील ब्राम्हण चेहरा

उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी लोकसभा मतदारसंघातून अजय मिश्रा उर्फ टेनी निवडून आले आहेत. स्वच्छ प्रतिमेचे असलेले अजय मिश्रा राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दीर्घकाळापासून काम करत आहेत. उत्तर प्रदेशातील ब्राम्हण मतदारांत त्यांचा प्रभाव आहे. लखीमपुर खीरी, पीलीभीत, सीतापुर, बहराइच या भागातील ब्राम्हण समाजावर त्यांची पकड आहे. २०१२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा विधानसभेची निवडणूक जिंकली होती. क्रिकेट, पॉवर लिफ्टिंग आणि कुस्तीमध्ये त्यांनी अनेक पदके मिळविली आहेत. अनेक स्पर्धांचे ते आयोजन करत असतात.

New members of Modi’s cabinet, from IAS officers to doctors and engineers