नाशिक : Nana patole नकोत नाना, थेट राहुल गांधींचे घर गाठा; ठाकरे गटाची ही ताठर भूमिका, महागात पडेल की स्वस्तात??, असा सवाल महाविकास आघाडीच्या संघर्षात तयार झाला आहे.
विधानसभेच्या 200 जागांवर महाविकास आघाडीचे एकमत झाले आहे. परंतु 88 जागांवर तणातणी सुरू आहे. त्यातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले जागावाटपाच्या बैठकीला असतील, तर ठाकरे पक्षाचा कुठलाही नेता त्या बैठकीला येणार नाही, अशी ताठर भूमिका ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी घेतली. खासदार संजय राऊत यांनी तर काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरच्या सगळ्या नेत्यांना वळसा घालून थेट राहुल गांधींचे घर गाठायची तयारी चालविली. के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्निथलांशी आपण चर्चा केली आहे. आता थेट राहुल गांधींशीच चर्चा करू, असे संजय राऊत म्हणाले.
विदर्भातल्या रामटेक मधल्या जागांवरून तणातणी खूप वाढली आहे. रामटेकची सहा वेळा जिंकलेली लोकसभेची जागा शिवसेनेने काँग्रेसला दिली. त्या बदल्यात विधानसभेसाठी आम्ही मागू त्या जागा सोडाव्यात, अशी मागणी राऊतांनी करून महाविकास आघाडीत काँग्रेस समोर पेच टाकला. त्यावरून नाना पटोले आणि राऊत यांच्यात खटकी पडली. दोघांमध्ये वाद झाल्याची कबुली नंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी देखील दिली, पण हा वाद लवकर मिटेल, असा दावा करायला ते विसरले नाहीत.
ते काही असले, तरी संजय राऊतांनी नाना नकोत. आम्ही थेट राहुल गांधींची बोलू, असे वक्तव्य करणे इथपर्यंत ठीक आहे, पण प्रत्यक्षात प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षालाच कोलदंडा घालून थेट काँग्रेस हायकमांडचा गाठणे हे शिवसेनेला परवडणार आहे का??, हा खरा सवाल आहे. कारण महाराष्ट्रातील काँग्रेस म्हणजे बंगालमधील काँग्रेस नव्हे आणि महाराष्ट्रातील शिवसेना म्हणजे बंगाल मधली तृणमूळ काँग्रेस नव्हे. दोन्ही ठिकाणांमध्ये आणि पक्षांच्या ताकदींमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे.
लोकसभा निवडणुकीत याचा प्रत्यय येऊन गेला आहे. उद्धव ठाकरेंनी हट्ट करून सांगलीची काँग्रेसची हक्काची जागा परस्पर खेचून घेतली होती. त्यासाठी शिवसेनेला जयंत पाटलांची “आतून” रसद मिळाली होती. पण प्रत्यक्षात लोकसभा निकालामध्ये शिवसेना आणि जयंत पाटील यांची ताकद एकत्र येऊनही वसंतदादांचे घराणे सांगलीत ते पराभूत करू शकले नाहीत. वसंतदादांचे नातू विशाल पाटील हे अपक्ष म्हणून उभे राहिले आणि त्यांनी शिवसेनेच्या पैलवान चंद्रहार पाटलांचा पराभव केला. पण यातून काँग्रेसची महाराष्ट्रातील स्थानिक पातळीवरची संघटनात्मक ताकद अधोरेखित झाली.
त्यामुळे बैठकीला नाना नकोत. ते असतील, तर आम्ही येणार नाही, अशी तोंडी दमबाजी शिवसेनेच्या नेत्यांनी करणे ठीक आहे. कदाचित काँग्रेस हायकमांड म्हणजे राहुल गांधी हे संजय राऊत यांना भेट देतील. त्यांचे एखाद दुसरे म्हणणे ऐकून देखील घेतील, पण म्हणून काँग्रेस पक्ष सगळ्याचा सगळा निर्णय शिवसेनेलाच अनुकूल येईल, असे मानणे वस्तुस्थितीला धरून नसेल. शिवाय या असल्या “वळसा राजकारणाचा” परिणाम शिवसेनेच्या उमेदवारांना जमिनी स्तरावर भोगायला लागल्याशिवाय राहणार नाही, कारण तेवढी ताकद लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने महाराष्ट्रात स्थानिक पातळीवर कमावली आहे.
काँग्रेसचे हायकमांड म्हणजेच केंद्रीय नेते वाटाघाटींच्या टेबलावर कधी कुठल्या प्रादेशिक नेत्यांना हार गेल्याचे उदाहरण नाही. काँग्रेसचे हायकमांड शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला वाकविता आले नाही. उलट पवारांनाच हायकमांड पुढे वाकावे लागले. त्यामुळे काँग्रेस हायकमांड ठाकरेंपुढे वाकण्याची शक्यताच दुरापास्त आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App