नाशिक : MVA महाविकास आघाडीतल्या सगळ्याच घटक पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी भाजपवर तो पक्ष वॉशिंग मशीन असल्याचा आरोप केला. त्यामध्ये काही तथ्यांश देखील होता. परंतु, प्रत्यक्षात महाविकास आघाडी मात्र मित्र पक्षांनाच अनेक जिल्ह्यांमधून “गायब” करणारी मशिनरी ठरली आहे. कारण महाविकास आघाडीतल्या जागावाटपाच्या ऍडजेस्टमेंट साठी राष्ट्रीय आणि पातळीवरचे मित्र पक्ष महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमधून गायब झाल्याचे चित्र दिसून आले आहे.MVA
महाविकास आघाडीतल्या जागावाटपात काँग्रेस उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना फक्त जागांचा फटका बसला असे नाही, तर अनेक जिल्ह्यांमधून त्या पक्षाचे उमेदवारच देता आलेले नाहीत. त्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये ते राजकीय पक्ष अस्तित्वात आहेत की नाहीत, यावर ठळक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
उदाहरणच द्यायचे झाले, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणात मधल्या 3 जिल्ह्यांमध्ये हाताचा पंजा हे चिन्ह गायब झाले आहे. कारण तिथे महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेचे वर्चस्व त्यापाठोपाठ 2 – 3 जागांवर पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी वाजणार आहे. त्यापलीकडे काँग्रेसला काही संधीच मिळाली नसल्याने रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 जिल्ह्यांमध्ये काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षाचा एकही उमेदवार उभा राहणार नाही. ज्या कोकणाने काँग्रेसला पी. के. सावंत यांच्यासारखे दिग्गज नेते दिले, ते काही काळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्याचबरोबर अब्दुल रहमान अंतुले यांच्यासारखे मुख्यमंत्री दिले, त्या कोकणात 3 जिल्ह्यांमध्ये एकाही जागेवर काँग्रेस उमेदवारच उभे करू शकणार नाही. हे महाविकास आघाडीतल्या जागावाटपामुळे घडले आहे.
पूर्व विदर्भातल्या 5 जिल्ह्यांमध्ये शिवसेनेचा एकही उमेदवार नसल्याने तिथे ठाकरेंची मशाल उजळणार नाही. त्यामुळे ज्या पूर्व विदर्भातून शिवसेनेला किमान 10 ते 15 आमदार मिळून त्यांची संख्या 60 च्या वर जायची, त्या पूर्व विदर्भातल्या 5 जिल्ह्यांमधून ठाकरेंची मशाल विझल्याने महाराष्ट्रव्यापी शिवसेनेचे आकुंचन झाले आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादी बाबत मात्र फारसे तसे म्हणता येणार नाही. कारण मूळातच शरद पवारांची राष्ट्रवादी अखंड असताना देखील संपूर्ण महाराष्ट्रव्यापी नव्हती. महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यांपैकी पश्चिम महाराष्ट्रातल्या 11 जिल्ह्यांमध्येच राष्ट्रवादीचे खऱ्या अर्थाने राजकीय अस्तित्व होते. उरलेल्या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एखाद दुसरा उमेदवार एवढेच पवारांच्या राष्ट्रवादीचे खरे अस्तित्व होते. आता राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर त्यांच्या वाट्याला आलेल्या 70 – 80 जागांमध्ये संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल एवढी त्यांची संघटनाच उरलेली नाही. त्यामुळे पवारांचे सगळे “डाव” पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या 5 जिल्ह्यांच्या मर्यादेत आहेत. त्यापलीकडे पवारांच्या पक्षाचे कुठले अस्तित्वच नाही, तर “डाव” तरी कुठून टाकणार??, हा सवाल आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App