सर्वपक्षीय संबंध राखून असणाऱ्या अविनाश भोसलेंच्या ४० कोटींच्या मालमत्तेवर ईडीची टाच

वृत्तसंस्था

पुणे – सर्व पक्षीय नेत्यांशी संबंध राखून असणाऱ्या पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त केल्याची माहिती अंमलबजावणी संचलनालयाने अर्थात ईडीने दिली आहे. ईडीचे अधिकारी गेल्या काही महिन्यांपासून अविनाश भोसलेंची चौकशी करीत होते. ED seized assets worth Rs 40.34 crores belonging to businessman Avinash Bhosle & his family members for acquiring foreign securities of company Rochdale Associates Ltd, Dubai

मनी लॉड्रींग प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला होता. ईडीने अविनाश भोसलेंच्या पुणे आणि मुंबईतील मालमत्तांवर छापेही टाकले होते. त्यानंतर आता मालमत्ता जप्तीची कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याचाही आरोप ठेवण्यात आला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून अविनाश भोसले हे ईडीच्या रडारवर होते. भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. दुबईतील रोशडेल कंपनीच्या सिक्युरिटीज खरेदीत विदेशी विनिमय व्यवस्थापन कायदा १९९९ (फेमा) कायद्याचे उल्लंघन केल्याचा अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आरोप आहे. त्या अंतर्गत देखील ईडीने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबियांची मालमत्ता जप्त केली आहे. मनी लॉड्रींग प्रकरणात भोसले यांची दोन वेळा चौकशी झाली होती. चौकशीनंतर त्यांना त्यावेळी सोडून देण्यात आले होते. या प्रकरणात त्यांच्या कुटुंबियांचीही चौकशी झाली होती. यानंतर आता ईडीने भोसले यांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

अविनाश भोसले यांचे महाराष्ट्रातल्या प्रत्येक राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे मानले जाते. प्रमुख नेत्यांच्या दिमतीला भोसलेंच्या मालकीची हेलिकॉप्टर नेहमी असतात. सर्वपक्षीय प्रचाराच्या वेळी ती अनेकांना दिली जातात.

संगमनेरमधून पुण्यात येऊन रिक्षा व्यवसायाने सुरूवात करून अविनाश भोसले यांनी थोड्याच काळात मोठी प्रगती केल्याचे मानले जाते. राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ठेकेदारीच्या माध्यमातून काम करणाऱ्यांशी त्यांची ओळख झाली. यानंतर अविनाश भोसले यांनी रस्ते तयार करण्याची लहान-मोठी कंत्राटे घेतली. त्यानंतर त्यांनी बांधकाम क्षेत्रामध्ये मोठे नाव कमावले. कोट्यवधी रुपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. काही दिवसांपूर्वी दक्षिण मुंबईतील उच्चभ्रू भागामध्ये त्यांच्या एबी’ज रिअलकॉन एलएलपी या कंपनीने १०३ कोटी ८० लाख रुपयांना स्थावर मालमत्तेची खरेदी केल्याची माहिती समोर आली होती.

ED seized assets worth Rs 40.34 crores belonging to businessman Avinash Bhosle & his family members for acquiring foreign securities of company Rochdale Associates Ltd, Dubai