नाशिक : महाराष्ट्राप्रमाणेच लोकसभा निवडणुकीत हरियाणात ( Haryana )काँग्रेसचा परफॉर्मन्स अव्वल राहिल्याने विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाहूंमध्ये बळ संचारले खरे, पण ते बळ जाट आणि वरिष्ठ समूदायांमध्ये भरले आणि पेरले गेल्याने काँग्रेसच्या नेत्यांनी तिथे वजाबाकीचे राजकारण केले, त्यामुळे काँग्रेसला आलेल्या संधी ऐवजी पक्षाची दांडी उडायची शक्यता निर्माण झाली आहे.
काँग्रेस पक्षाला गटबाजी, एकमेकांवर कुरघोडी हे राजकारण अजिबात नवीन नाही. काँग्रेसचा परफॉर्मन्स कितीही खाली अथवा वर जावो, त्याने गटबाजी करणाऱ्यांना फरकच पडत नाही. पण सत्तेसाठी काँग्रेस नेते ज्याप्रमाणे आणि ज्या प्रकारे बेरजेचे राजकारण करतात ना, त्याला तोड नाही. या बेरजेच्या राजकारणाच्या बाबतीत काँग्रेसवाले बाकी सगळ्या पक्षांचे बारसे जेवले आहेत.
पण हरियाणात (haryana ) यावेळी काँग्रेसला जी संधी निर्माण झाली आहे ना, ती बेरजेचे राजकारण करण्याऐवजी वजाबाकीचे राजकारण केल्याने गमावण्याचा धोका निर्माण झाला आहे. काँग्रेसने ऐन निवडणुकीच्या मध्यावर दलित प्रभावी नेत्या कुमारी शैलजा यांना बाजूला करून दलित समाजाला दुखावले आहे.
हरियाणाचे राजकारण जरी “जाट प्रभावित” असले, तरी तिथले जातिगत समीकरण चौधरी चरणसिंह यांच्या काळातले उरलेले नाही. जाट प्रभावाखाली केवळ सत्तेच्या विशिष्ट वाटणीने अन्य जाती घटकांना आता गृहीत धरता येत नाही. अन्य ओबीसी + दलित + ब्राह्मण + अन्य समुदाय देखील पोलिटिकल कॅलक्यूलेशन्समध्ये तितकेच माहीर झालेत, जितके जाट पहिल्यापासूनच आहेत!!
हरियाणात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने सगळी सूत्रे माजी मुख्यमंत्री भुपेंद्र सिंग हुड्डा यांच्याकडे सोपवली. काँग्रेसने 10 पैकी 5 जागा मिळवून 10 वर्षांच्या सत्ताधारी भाजपला चांगली टक्कर दिली. त्यामुळे काँग्रेसचा हुरूप वाढला. काँग्रेस हायकमांडने विधानसभा निवडणुकीची सूत्रे पुन्हा भूपेंद्र सिंग हुड्डा यांच्याकडेच सोपविली. पण 78 वर्षांच्या भूपेंद्र सिंग हुड्डा यांनी आपल्या जुन्या शैलीचे राजकारण करून जाट + अन्य उच्चवर्णीय जमावडा जमवला. पण यातून मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धक लांबच ठेवाव्यात म्हणून कुमारी शैलजा यांना संपूर्ण निवडणूक यंत्रणेपासूनच दूर ठेवले आणि इथेच खरी गडबड झाली. यावेळी काँग्रेसला 10 वर्षांनंतर पुन्हा संधी आली, त्यावेळी खरं म्हणजे हुड्डा यांनी काँग्रेसी शैलीचे बेरजेचे राजकारण करून सर्व नेत्यांना सामावून घेऊन मग आपले वर्चस्व पुनर्स्थापित करणे अपेक्षित होते, पण त्या ऐवजी त्यांनी कुमारी शैलजा यांना बाजूला ठेवून तब्बल 21% दलित समाजाला दुखावले. जे हरियाणातल्या 17 मतदारसंघांमध्ये निर्णायक भूमिका बजावतात आणि 35 मतदारसंघांमध्ये विशिष्ट प्रभाव टाकतात, असा दलित समाज दुखावणे हे काँग्रेसकडून घडले आहे. याची किंमत काँग्रेसला चुकवावी लागण्याची दाट शक्यता आहे.
– शैलजांना दूर ठेवणे महागात
यातून कदाचित भूपेंद्रसिंग हुड्डांच्या जुन्या शैलीचे राजकारणात हरियाणात जरूर झाले असेल, पण सत्तेची संधी मिळताच काँग्रेसवाले जे आणि जसे बेरजेचे राजकारण करतात, त्याच्या विपरीत हे राजकारण हरियाणात घडले आहे. मग केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी कुमारी शैलजा यांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देणे वगैरे अनुषंगिक गोष्टी आहेत. शैलजा यांना बाजूला करून काँग्रेसने स्वतःहून वजाबाकी करून भाजपला बेरजेचे राजकारण करायची संधी दिली आहे. मग भाजप नेत्यांनी ती संधी साधली, तर गैर कसे मानता येईल?? म्हणूनच हरियाणात काँग्रेसला 10 वर्षांनंतर संधी आली असताना, केवळ वजाबाकीच्या राजकारणामुळे उडेल का दांडी??, असा सवाल करायची वेळ आली आहे. जर खरंच तसे घडले, तर 2023 च्या छत्तीसगड निवडणुकीतून काँग्रेसवाले काहीच शिकले नाहीत, असे म्हणावे लागेल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App