BJP – NCP Alliance : जखमा उरातल्या; मीठ राष्ट्रवादीचे; चोळतायत अशिष शेलार!!


देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या लळिताचे कीर्तन अजून महाराष्ट्रात सुरू आहे… त्याच कीर्तनात आज आशिष शेलार यांनी “झांजा वाजवल्या आहेत. पहाटेचा शपथविधी भाजपसाठी “जखमा उरातल्या” आहेत. मीठ राष्ट्रवादीचे आहे आणि चोळतात मात्र भाजपचे नेते आणि पवारांचे मित्र आशिष शेलार…!!BJP – NCP Alliance: Wounds healed; Salt nationalist; Ashish Shelar rubbing

लोकसत्तेला मुलाखत

आशिष शेलार यांनी लोकसत्ताला “दृष्टी आणि कोन” या सदरासाठी दिलेल्या मुलाखतीत भाजपच्या उरातल्या जखमांवर मीठ चोळले आहे. भाजपला राष्ट्रवादीशी युती 2017 मध्ये करायची होती. कारण शिवसेनेचे मंत्री रोज राजीनामा खिशात घेऊन फिरत होते. सामनातून फडणवीस सरकारवर जहरी टीका येत होती. त्यामुळे वैतागून जाऊन भाजपने राष्ट्रवादीशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला होता.



राज्याच्या पातळीवर चर्चा होऊन ती केंद्राच्या पातळीवर देखील पोचली होती. पालकमंत्र्यांची नावे आणि जिल्हे देखील ठरले होते. परंतु, शिवसेनेला बरोबर घेऊन काँग्रेसला अलग पाडण्याचा संदेश केंद्रीय नेतृत्वाने दिला होता. मात्र, आयत्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने शिवसेनेला बरोबर घ्यायला नकार दिला. पण त्यावेळी शिवसेनेला बरोबर घ्यायला नकार देणारी राष्ट्रवादी आज शिवसेनेबरोबर सरकार मध्ये आहे, असे लांबलचक वक्तव्य आशिष शेलार यांनी या मुलाखतीत केले आहे.

आशिष शेलार यांचे हेच वक्तव्य भाजपच्या उरातल्या जखमेवर राष्‍ट्रवादीचे मीठ चोळणारे आहे.

 चाणक्य भिंतीवरच

मुळात भाजपचे केंद्रीय नेतृत्व घरातल्या भिंतीवर चाणक्याचा फोटो लावून शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी वाटाघाटी करायला जाते यातच त्या चाणक्यचा अपमान आहे…!! चाणक्य फक्त घरातल्या भिंतीवरच आहे. आपल्यात तो “उतरलाच” नाही, हेच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दाखवून दिले होते. ज्या शरद पवारांचे राजकारण गेल्या 50 वर्षात फक्त विश्वासघाताचेच राहिले आहे, “याची टोपी त्याला आणि त्याची टोपी याला”, असे घालून जे “पॉलिटिकली रेलेव्हन्ट” राहण्याचा प्रयत्न करत राहिले आहेत, त्या शरद पवारांशी शिवसेनेचा येणारा वैताग सोडवण्यासाठी युती करण्याचा निर्णय घेणे… यातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची मुत्सद्देगिरी बाळबोध आहे हे खरे म्हणजे तेव्हाच दिसून आले होते…!! (पवार फार मोठे मुत्सद्दी आहेत, असे नव्हे. कारण त्यांची मुत्सद्देगिरी काँग्रेसच्या हायकमांडने अनेकदा “उघडी” पाडली आहे. पवारांच्या मुत्सद्देगिरीने हायकमांड पुढे नांगी टाकलेली आहे. अजूनही त्यांची आपण यूपीएचे चेअरपर्सन होणार हे उघडपणे सांगण्याची हिंमत होत नाही, यातच काँग्रेस हायकमांड पुढे त्यांची मुत्सद्देगिरी किती चालू शकते?, हे लक्षात येते…!!)

तोकडी मुत्सद्देगिरी

त्या पवारांकडे भाजपच्या नेतृत्वाने युती करण्याचा प्रस्ताव ठेवणे यात पवारांची मुत्सद्देगिरीची “उंची” ठरत नाही भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची मुत्सद्देगिरी किती “तोकडी” आहे हे सिद्ध होते…!!

पण तरीही आता तर त्या गोष्टीला अडीच वर्षे उलटूनही गेली आहेत. भाजप 2024 च्या निवडणुकीच्या तयारीला खऱ्या अर्थाने लागला आहे. फडणवीस – अजित पवारांचा शपथविधी हा भाजपसाठी कटु इतिहास झाला आहे. आता तो उगाळण्यात नेमका काय मतलब आहे…?? की अशिष शेलार हे भाजपचे नेते असले तरी ते पवारांचे मित्र आहेत म्हणून राष्ट्रवादीचे मीठ त्यांनी भाजपच्या उरातल्या जखमेवर मीठ चोळले आहे…??

राजीनामे खिशातच होते ना??

शिवसेनेचे मंत्री रोज राजीनामा खिशात घेऊन फिरत होते हे खरेच. सामनातून फडणवीस सरकार वर जहरी टीका येत होती, हे देखील खरे… पण सामनातली जहरी टीका ही शरद पवारांच्या विश्वासघाता एवढी हानिकारक होती…?? शिवसेनेचे मंत्री कधी खिशातला राजीनामा काढून राज्यपालांकडे त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांकडे देण्याची हिंमत दाखवत होते…??, या दोन्ही प्रश्नांची उत्तरे नकारात्मक आहेत.

 पवारांकडे गेलेच का??

मुळात भाजपचे केंद्रीय नेतृत्व स्वत:च्या विशिष्ट बाबींसाठी पवारांच्या प्रेमात होते. त्यातून त्यांनी राष्ट्रवादीशी आघाडी करण्याचा मनसुबा आखला. पण ते “पवार” आहेत ज्यांनी काँग्रेस पोखरून स्वतःची राष्ट्रवादी पोसली ते भाजपला युतीत घेऊन स्वतःच्या पक्षाचे कबर कशासाठी खणतील…?? एवढे भिंतीवर चाणक्यांचा फोटो लावणाऱ्या भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला समजू नये…?? मुळात शिवसेनेला वैतागून असो अथवा शिवसेनेला वैतागून नसो… राष्ट्रवादीशी युती करायला जाणे हीच राजकीय दृष्ट्या गंभीर घोडचूक होती. ती एकदा करून तोंड पोळून घेतले ना… मग आता त्या जखमेवरची खपली काढून त्यावर राष्ट्रवादीचे मीठ चोळण्याचे खरे तर कारण काय…??

पक्षनिष्ठा की पवारनिष्ठा??

की आशिष शेलार आपल्या पक्षनिष्ठेपेक्षा आपल्या पवार निष्ठेला जास्त जागत आहेत…?? एरवी अशिष शेलार ठाकरे सरकारवर टीका करताना पवारांवर सोईस्कर टीका करण्याचे टाळतात आणि आता तर उघडपणे ते राष्ट्रवादीचे मीठ घेऊन भाजपच्या खपली धरलेल्या जखमेवर चोळत आहेत…!! भाजपचे शत्रू कुठे बाहेर नाहीत. असलेच अस्तनीतले निखारेच आहेत. हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला समजत नाही का…?? की मोराला दाणे खाऊ घालण्यातच ते मग्न आहेत…??, हा खरा प्रश्न आहे…!!

BJP – NCP Alliance: Wounds healed; Salt nationalist; Ashish Shelar rubbing

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात