JD(U) – NDA : बिहार मधल्या सत्तांतराचे वाचा between the lines!!


लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर बिहारमध्ये सत्तांतर झाले. INDI आघाडी तुटली. काँग्रेसच्या लोह राजकीय लोहचुंबकाची दोन्ही ध्रुवांची शक्ती संपली, पण एवढ्या पुरतेच बिहारच्या सत्तांतराचे “बिटवीन द लाईन्स” नाही, त्या पलीकडे देखील फार मोठा घटनाक्रम या सत्तांतरामागे दडला आहे.Between the lines in Bihar power shift

काँग्रेस आणि बाकीच्या मित्रपक्षांनी नितीश कुमार यांना “पलटू राम”, “आयाराम – गयाराम” “रंग बदलणारा सरडा” वगैरे कितीही शिव्यांची लाखोली वाहिली तरी, काँग्रेस आणि बाकीचे मित्र पक्ष त्यांना INDI आघाडीत टिकवून ठेवण्यात अयशस्वी ठरले ही बाब लपून राहणारी नाही.काँग्रेसने स्वतःच्या पुढाकाराने INDI आघाडीच्या बैठकांपाठोपाठ बैठका घेतल्या. मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये पार्ट्या केल्या, फोटो ऑपॉर्च्युनिटी केल्या, पण त्या पलीकडे जाऊन गंभीर राजकीय हालचाली करून जागावाटप मात्र केले नाही. त्याचाच परिणाम म्हणून आधी ममता बॅनर्जी फुटल्या आणि आता नितीश कुमार फुटले. यातल्या ममता बॅनर्जी NDA च्या गळाला लागणार नव्हत्याच, भाजपने तसा प्रयत्नही केला नाही.

पण नीतीश कुमार यांच्या बाबतीत मात्र तसे म्हणता येणार नाही. कारण नितीश कुमार मूळातच बिहार विधानसभा निवडणुकीत NDA चे घटक म्हणूनच लढले होते आणि निवडून देखील आले होते. त्यामुळे नीतीश कुमार यांची आघाडी आणि “राजकीय सूत” NDA शी जुळलेले होते.

नितीश कुमारांनी अनेकदा भूमिका बदलल्या. या दृष्टीने त्यांना “पलटू राम” हे काँग्रेसने नाव ठेवणे स्वाभाविक आहे. त्यांच्या राजकीय कोलांटउड्या तशाच आहेत. पण ते आपल्या बाजूने होते, तोपर्यंत काँग्रेसला चालत होते, ते आपल्याला सोडून भाजपच्या दिशेने वळल्याबरोबर ते “रंग बदलणारा सरडा” ठरले. यात नितीश कुमार यांना खेचून धरण्यात आपण अयशस्वी झालो हे मानायला काँग्रेस नेते तयार नाहीत, हा काँग्रेस नेत्यांचा फार मोठा अयब म्हणजे दोष आहे.

पण त्या पलीकडे जाऊन भाजपने शांतपणे बिहारमध्ये ज्या राजकीय खेळ्या केल्या होत्या, त्याची चुणूक नितीश कुमार यांच्या लक्षात आली होती. नितीश कुमार यांच्या JD(U) चे फक्त 45 आमदार होते आणि महाराष्ट्रात त्याच आकाराचे म्हणजे 56 आमदारांची शिवसेना आणि 53 आमदारांची राष्ट्रवादी काँग्रेस जर फुटू शकतात, तर आपला 45 आमदारांचा JD(U) पक्ष फुटणे किंवा फोडणे भाजपला बिलकुलच अवघड नाही, हे नितीश कुमार यांच्या लक्षात आले होते.

महाराष्ट्रात शिवसेनेचे आमदार फुटण्या मागचे कारण “महायुतीला कौल” हे फिट बसले होते. कारण खरंच 2019 च्या निवडणुकांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या मतदारसंघात मतदारांनी शिवसेना – भाजप या महायुतीलाच स्पष्ट कौल देऊन तब्बल 161 जागांचे बहुमत दिले होते, पण शरद पवारांनी उद्धव ठाकरेंची महत्त्वाकांक्षा फुलवली. त्यांना मुख्यमंत्रीपदाची लालूच दाखवली आणि त्याचा “अंतिम परिणाम” म्हणून आधी शिवसेना फुटली आणि नंतर खुद्द पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा त्यांच्याच पुतण्याने बोऱ्या वाजवला.

*महाराष्ट्रातला हा राजकीय घटनाक्रम नितीश कुमार यांच्यासारख्या चाणाक्ष नेत्याच्या लक्षात आला नसेल, असे मानणे चूक आहे. कारण महाराष्ट्रात जसा मतदारांनी महायुतीला कौल दिला होता, तसाच बिहार मधल्या मतदारांनी भाजप आणि संयुक्त जनता दल यांच्या NDA आघाडीला कौल दिला होता. पण नितीश कुमारांची त्यावेळी “बुद्धी फिरली” आणि त्यांनी लालूप्रसाद यादव आणि काँग्रेसची घरोबा करून भाजपला सत्तेबाहेर ठेवले होते. पण महाराष्ट्रात जर शिवसेना आणि राष्ट्रवादी फोडून भाजप राजकीय बदला घेऊ शकतो, तर बिहारमध्ये तसा बदला घेणे भाजपला अवघड नाही आणि त्यात आपल्याच JD(U)
पक्षाचा बळी जाईल, याची जाणीव नितीश कुमारांना झाल्याबरोबर ते “सुधारले” आणि त्यांनी लालूप्रसाद यादव – काँग्रेस यांना डच्चू देऊन पुन्हा भाजपची घरोबा केला. अन्यथा बिहारमध्ये त्यांचा “उद्धव ठाकरे” किंवा “शरद पवार” व्हायला वेळ लागली नसती.*

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आजच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये जे “निवडक” शब्द उच्चारले, त्यातले हे “बिटवीन द लाईन्स” आहे.

“नितीश कुमार NDA आघाडीत आले, याचा आम्हाला आनंद आहे. बिहारच्या जनतेने NDA ला कौल दिला होता. नितीश कुमारांच्या JD(U) चे नैसर्गिक गठबंधन NDA च आहे,” असे वक्तव्य जे. पी. नड्डा यांनी केले. INDI आघाडी मूळातच अनैसर्गिक आहे. तिथे वेगवेगळ्या पक्षांचे एकमेकांशी अजिबात पटत नाही, हे उघड दिसत असताना ते एकमेकांना बांधूनही ठेवू शकत नाहीत, अशी पुस्ती त्यांनी जोडली.

याचा अर्थ नितीश कुमार यांना भाजप बरोबर येण्याशिवाय पर्याय नव्हता. ते भाजपबरोबर आले नसते आणि बिहारच्या जनतेने दिलेल्या कौलाचा ते असाच अपमान करत राहिले असते, तर त्यांना आपला JD(U) पक्ष गमवावा लागला असता. महाराष्ट्रातल्या घटनाक्रमांमधून नितीश कुमार यांच्यासारखा मुरब्बी नेता काहीच शिकला नाही, असे म्हणावे लागले असते, पण नितीश कुमार यांनी “वेळ साधून” बाजू बदलली. मुख्यमंत्रीपद टिकवले. पण त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन पाहिले, तर त्यांनी आपल्या JD(U) पक्षाची “शिवसेना” किंवा “राष्ट्रवादी काँग्रेस” होऊ दिली नाही… ही त्यांची खरी “राजकीय मिळकत” ठरली आहे!!

Between the lines in Bihar power shift

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*