झाडलेल्या चार गोळ्या, न आलेल्या हौतात्म्याचे राजकीय भांडवल…!! पण मतभरती आणि मतकापणीतून सत्तेचे पीक कोणाचे…??

उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीच्या रणधुमाळीत एका गाडीवर चार गोळ्या झाडल्या गेल्या… गाडीवर दोन गोळ्या झाडल्याच्या खुणा दिसल्या. पण ज्यांच्यावर या गोळ्या झाडल्या, त्यांना हौतात्म्य काही प्राप्त झाले नाही, पण या न आलेल्या हौतात्म्याचे राजकीय भांडवल करण्याचे प्रयत्न मात्र जोरदार सुरू असल्याचे दिसत आहे. इथे सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी कोणत्याही गोळीबाराचे समर्थन करण्याचा अजिबात प्रश्न नाही. असा गोळीबार असमर्थनीय आणि निषेधार्हच आहे… पण…assaduddin owisi trying to politically capitalizing shootout at meerut

ही बात आहे, एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन औवैसी यांच्या गाडीवरच्या हल्ल्याची. परवा सायंकाळी मेरठ दौऱ्यावरून दिल्लीकडे परतत असताना दोन युवकांनी मोटारसायकलवर येऊन ओवैसी यांच्या मोटारीवर गोळ्या झाडल्या आणि ते पिस्तुल तिथेच टाकून पळून गेले. हे दोन्ही युवक पकडले देखील गेलेत. त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई देखील सुरू केली आहे.मात्र, या मुद्द्यावरून दिल्लीत आणि उत्तर प्रदेशात राजकारण जोरात सुरू आहे. किंबहुना या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा ओवैसी आणि त्यांच्या पक्षाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहे. ओवैसी यांनी आधी या गोळीबाराच्या घटनेच्या चौकशीची मागणी केली. त्यासाठी आपण खासदार असल्याचा हवाला दिला. एका खासदाराच्या गाडीवर गोळीबार होतो, याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. राज्य आणि केंद्र सरकारांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. ती केंद्र सरकारने लगेच मान्य केली. त्या पुढचे देखील पाऊल केंद्र सरकारने टाकले. ते म्हणजे खासदार असदुद्दीन ओवैसी यांना झेड कॅटॅगरीची सुरक्षा प्रदान करण्याची तयारी दाखविली.

आणि इथेच खरी या घटनेची राजकीय मेख दडली आहे. ओवैसी यांनी लगेच केंद्र सरकारची झेड सुरक्षेची ऑफर नाकारून टाकली आहे. आपण सुरक्षा व्यवस्था घेणार नाही. चालविलेल्या गोळीला प्रेमाने उत्तर देऊ. उत्तर प्रदेशातील जनता विधानसभा निवडणूकीच्या मतदानातून गोळीबाराला प्रत्युत्तर देईल, असे वक्तव्य ओवैसी यांनी केले आहे. ओवैसी यांच्या उत्तरातच गोळीबाराच्या घटनेचे राजकीय भांडवल करण्याचा उघड मनसूबा दडला आहे.

पण त्याही पलिकडे जाऊन वेगळे अँगल या गोळीबाराच्या राजकीय भांडवलीकरणाला आहेत, ते म्हणजे लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी या घटनेची दखल घेऊन ओवैसी यांना फोन केला आहे. त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आहे. त्यांना भेटीला बोलावले आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना एका खासदाराच्या गाडीवर गोळीबार झाल्याने सभापतींनी या घटनेची अधिकृत दखल घेणे स्वाभाविक आहे. पण त्यामुळेच ओवैसी यांची खरी पंचाइत झाली आहे.

ओवैसी यांना सभापती ओम बिर्लांच्या भेटीत बरेच खरे बोलावे लागणार आहे. ते लोकसभेच्या सभापतींच्या रेकॉर्डवर राहणार आहे. जाहीर सभेत, सोशल मीडियात आणि मीडियात बोलणे निराळे आणि लोकसभेच्या सभापतींना भेटून बोलणे निराळे. तिथे प्रचारकी थाटाचे काही सांगता येणार नाही. ते ऐकूनही घेतले जाणार नाही. आणि इथेच खरी ओवैसी यांची पंचाइत आहे. सभापतींशी बोलण्यापूर्वी त्यांनी सरकारची झेड सुरक्षा नाकारणे ओवैसी यांना परवडणारे नाही, हा मुद्दा येथे अधोरेखित केला पाहिजे.

या खेरीज ओवैसींच्या गाडीवर गोळीबार करणारा एक युवक मायावतींच्या गावाचा असल्याचा शोध लावण्यात आला आहे. आता यामध्ये तथ्य किती आणि सोडलेली पुडी किती, हे बाहेर येईलच. पण ज्या मुद्द्याची उत्तर प्रदेशाच्या निवडणूकीत फारशी चर्चा होत नव्हती, त्या मायावतींची चर्चा ओवैसींच्या गाडीवरील गोळीबाराबाबत सुरू व्हावी, हा निश्चितच सहज मानावा असा राजकीय योगायोग नाही, हे देखील नमूद केले पाहिजे.

ओवैसी यांनी आपल्या गाडीवरील गोळीबाराचे राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न चालवला असला, तरी तो कितपत यशस्वी ठरेल? आणि त्या भांडवलातून झालीच कोणाची मतभरती होईल, तर एआयएमआयची आणि कोणाची मतकापणी होईल, तर समाजवादी पक्ष किंवा काँग्रेसची. तसे घडलेच तर या मतकापणीतून कोणाच्या सत्तेचे पीक बहरेल, हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही…

assaduddin owisi trying to politically capitalizing shootout at meerut

महत्त्वाच्या बातम्या