अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष??; पण “देवकांत बरूआ” बनणार की “कासू ब्रह्मानंद रेड्डी”??


राजस्थानचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गेहलोत सध्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीत टॉपला आहेत. दस्तूरखुद्द सोनिया गांधी यांनी त्यांना काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळण्याची गळ घासल्याच्या बातम्या प्रसार माध्यमांनी दिल्या आहेत. या बातम्यांमध्ये अशोक गेहलोत यांच्या राजकीय गुण अवगुणांची तसेच सोनिया गांधींनी तसा निर्णय घेतला तर नेमके काय परिणाम होतील??, याची चर्चा केलीच आहे. पण फक्त या मुद्द्याची चर्चा केलेली नाही ती म्हणजे अशोक गहलोत जर खरंच काँग्रेसचे अध्यक्ष झाले म्हणजे बनवले गेले तर ते “देवकांत बरूआ” बनणार की “ब्रह्मानंद रेड्डी”?? कारण या दोन्ही नावांना काँग्रेसच्या राजकीय इतिहासात काही “विशिष्ट” स्थान आहे. अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष बनल्यानंतर ते यापैकी कोणाची गादी चालवतात??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.Ashok Gehelot pitched for new Congress president, but will he have real power to govern the party??

काटेरी मुकुट की डोक्यावर “टोपी”??

बाकी अशोक गहलोत यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवणे म्हणजे राजस्थानचा मुख्यमंत्रीपदाचा मुकुट त्यांच्या डोक्यावरून काढून घेऊन काँग्रेस अध्यक्षपदाचा काटेरी मुकुट त्यांच्या डोक्यावर घालण्यासारखे आहे. थोडक्यात सोनिया गांधी त्यांना “टोपी” घालू इच्छितात, असे विश्लेषण अनेकांनी केले आहे. त्यातले विशिष्ट तथ्य नाकारता येणार नाही. पण गेहलोत यांचे काँग्रेस अध्यक्ष बनणे म्हणजे फक्त राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदावरून हटवणे एवढाच याचा अर्थ मर्यादित असणे शक्य नाही. त्यातून सचिन पायलट यांना राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी निवडणुकीपूर्वी एक वर्ष आधी बसवणे कदाचित साध्य होईल. पण हे सगळे अशोक गेहलोत यांनी काँग्रेसचे अध्यक्ष पद स्वीकारताना “मान्य” केले, तरच शक्य होईल. अन्यथा गहलोत काँग्रेसचे अध्यक्ष बनायचे आणि पहिलाच निर्णय सचिन पायलट यांच्याबाबत प्रतिकूल घ्यायचे असे व्हायला नको म्हणजे मिळवली… आणि इथेच आधी उल्लेख केलेल्या दोन नावांचे म्हणजे देवकांत बरूआ आणि कासू ब्रम्हानंद रेड्डी या दोन नावांचे महत्त्व आहे.



इंदिराजी आणि देवकांत बरूआ

देवकांत बरूआ हे इंदिरा गांधींच्या आणीबाणीच्या काळातले असे काँग्रेसचे अध्यक्ष होते की ज्यांनी थेट “इंदिरा इज इंडिया” अशी घोषणा देऊन आपल्या सर्व काँग्रेस अध्यक्षपदाच्या निष्ठा इंदिराचरणी वाहिल्या होत्या आणि त्यापुढे जाऊन त्या संजय गांधी यांच्या चरणी देखील वाहिल्या होत्या. मग त्यांनी स्वतंत्रपणे कोणताही राजकीय निर्णय घेण्याची सुतराम शक्यताच नव्हती. त्यामुळे इंदिरा गांधींच्या अंकित असेपर्यंत देवकांत बरूआ हे “बसवलेलेच” अध्यक्ष ठरले होते. इंदिरा गांधींच्या वाईट काळात त्यांनी त्यांची साथ सोडली होती ही देखील राजकीय वस्तुस्थिती होती. पण हे सगळे नंतर घडले. देवकांत बरूआ हे इंदिरा गांधींचे अंकित काँग्रेस अध्यक्ष ही नोंद इतिहासात व्हायची ती झालीच!! त्यात बदल झाला नाही. मग अशोक गेहलोत हे काँग्रेस अध्यक्षपद स्वीकारून “देवकांत बरूआ” बनतील का?? सोनिया आणि राहुल गांधी यांच्या चरणी आपल्या निष्ठा कायमच्या वाहून ठेवतील का?? प्रश्न आहे… उत्तर काळाच्या उदरात दडले आहे!!

कासू ब्रह्मानंद रेड्डी

अशोक गेहलोत हे “देवकांत बरूआ” बनले नाहीत तर ते “कासू ब्रह्मानंद रेड्डी” बनतील का?? म्हणजे सुरुवातीला त्यांना सोनिया आणि राहुल गांधी यांचे ऐकावेच लागेल. यात कोणतीही शंका नाही. पण नंतर मात्र एकदा काँग्रेस अध्यक्षपदावरची मांड पक्की झाली की मग “ब्रह्मानंद रेड्डी” बनवण्याची संधी घ्यायला त्यांना प्राप्त होऊ शकते. तसे झाले तर काँग्रेस मधला अतिवरिष्ठ पातळीवरचा संघर्ष उफाळून येऊ शकतो. गांधी परिवाराविरुद्ध असलेल्या g23 गटाला बळ मिळू शकते आणि हा बळकट गट काँग्रेसमध्ये आपले वर्चस्व तरी निर्माण करू शकतो किंवा जशी ब्रह्मानंद रेड्डींनी यशवंतराव चव्हाण यांच्या साथीने रेड्डी – चव्हाण काँग्रेस स्वतंत्र काढली आणि इंदिरा गांधींची हकालपट्टी केली, विशिष्ट राज्यांमध्ये महाराष्ट्रसह अनेक राज्यांमध्ये काही वर्षे सत्ता मिळवून दाखवली तसे तरी अशोक गेहलोत करू शकतील का??, हाही राजकीयदृष्ट्या कळीचा प्रश्न आहे.

म्हणूनच अशोक गेहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष बनवणे हे केवळ राजस्थानातून त्यांना कायमचे हलविणे एवढ्या पुरते मर्यादित नाही किंवा कदाचित ती गांधी परिवाराने परिवारापैकी कोणीही काँग्रेसचे अध्यक्ष होणार नाही या प्रतिज्ञेपुरते देखील मर्यादित नाही. त्याला त्यापेक्षा अधिक राजकीय कंगोरे आहेत आणि ते काँग्रेसच्या इतिहासात दडले आहेत.

अशोक गेहलोत – अहमद पटेल

अशोक गेहलोत यांची महत्त्वाकांक्षा कदाचित काँग्रेस अध्यक्ष बनवण्याची नाहीच. त्यांना काँग्रेसचे नवे “अहमद पटेल” बनायचे आहे. किंबहुना ते आज त्या राजकीय भूमिकेत आहेतही. पण ते “अहमद पटेल” एवढे प्रभावी नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि कदाचित असलीच तर ही खंत त्यांना असू शकते. पण ही देखील झाली “जर तर”ची बाब!!… कारण याचेही उत्तर काळाच्या उदरात दडले आहे.

Ashok Gehelot pitched for new Congress president, but will he have real power to govern the party??

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात