ॲपलचे CEO टिम कुक यांना ‘नादसाधना’ ॲपची मोहिनी; समस्त भारतीयांसाठी अभिमानास्पद बाब!

Tim Cook

  मुंबई दौऱ्यात टिम कुक यांनी आवर्जुन घेतली संदीप रानडेंची भेट;  जाणून घ्या नेमकं काय घडलं?

विशेष प्रतिनिधी

मुंबई : भारतातील पहिले ॲपल स्टोअर मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये सुरू झाले आहे. अ‍ॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या हस्ते या स्टोअरचे उद्घाटन झाले. यासाठी टिम कुक हे खास मुंबई दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी ‘नादसाधना’ या ॲपचे निर्माते संदीप रानडेंची भेट आवर्जून घेतली. कारण, टिम कुक हे या ॲपच्या अक्षरशा प्रेमात पडले आहेत. जाणून घेऊयात अभिराम जोशी यांच्या शब्दांत या विशेष भेटीचे वर्णन आणि नेमके कोण आहेत संदीप रानडे? Apple CEO Tim Cook in love with Nadsadhana app

’विठ्ठल तो आला आला…..!!! अशा मथळ्याखाली  अभिराम जोशी यांनी लिहिले आहे की, ‘संदीप रानडे व वसंत ऋतू यांचं काहीतरी अलिखित नातं आहे. संदीप हा माझ्या भाचीचा म्हणजे मेघनाचा नवरा. अमेरिकेत ॲपल, गुगल, मायक्रोसॅाफ्ट सारख्या कंपन्यांमधे पराक्रमांचे किर्तीमान स्थापन करून कायमस्वरूपी भारतात परत आलेलं हे जोडपे.  संदीप हा कंप्युटर इंजिनिअरींग मधला जसा उस्ताद तसाच शास्त्रीय संगीतातला वस्ताद गायक. या दोन क्षेत्रांवरच्या आपल्या हुकूमतींचा फायदा करून घेत संदीपने गायकांकरता ios च्या (Iphone Operating System) बेसवर आधारीत असलेले व आर्टिफिशियल इंटलीजन्सचा वापर करून तयार केलेले “नादसाधना” नावाचे एक ॲप बनवले. हे ॲप असे बनवले आहे की गायकांना त्यांच्या प्रशिक्षणा पासून परफॅार्मन्स पर्यंत कोणत्याही वेळी पंधरा ते वीस वाद्यांची साथसंगत करू शकते.’’

‘’दोन वर्षांपूर्वी एकट्या डेव्हलपरने खूप मेहनत घेऊन तयार केलेले व १०० टक्के भारतीय असलेले हे ‘नादसाधना’ ॲप एवढे हिट झाले की ॲपल कंपनीच्या ॲपच्या जागतिक स्पर्धेत ते एक नंबर वर धडकले व भारतीयांची मान अभिमानाने ताठ झाली. पोस्ट करोना काळातल्या भ्रमण मर्यादांमुळे संदीपला इच्छा असूनही अमेरिकेतल्या त्या बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला उपस्थित रहाता आलं नव्हतं. मात्र त्या वसंत ऋतुत, संदीपच्या चैतन्यमयी प्रतिभेला फुटलेल्या पालवीने भारतीय सॅाफ्ट वेअरच्या कोडिंगचा डंका जगभर चांगलाच पीटला होता व त्यावर जगातल्या अनेकांचे बारीक लक्ष होते.’’

दोन वर्षे अशीच गेली होती …..!!!

‘’तेव्हा पासूनच ॲपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) टीम कुक या भारतीय कोहिनूरावर लक्ष ठेऊन होते. त्यांनी, भारतच्या व्यावसायीक भेटीचा प्लॅन ठरवताना संदीप बरोबरची पंधरा मिनिटे आधीच राखून ठेवली होती.’’

अखेर यंदाच्या वसंतातला कालचा तो दिवस उजाडला……..!!!

‘’जगावर राज्य करणाऱ्या ॲपलचे CEO मुंबईत धडकले होते. टिम कुक यांची एखाद्या राष्ट्राध्यक्षा प्रमाणे मिनिट टू मिनिट च्य टाईम प्लॅन नुसार ठरलेली संदीप बरोबरची मिटिंग दुपारी तीन वाजता चालू होऊन खरंतर पंधरा मिनिटात संपणार होती.’’

मिटिंग सुरू झाली…….!!!

‘’भारतीय शास्त्रीय संगीत व त्याला साथ संगत करू शकणाऱ्या ॲपल बेस्ड ‘नादसाधना’ ॲपची मोहिनी टिम कुकना अशी काही पडली की ते तल्लीन होऊन मान डोलावू लागले. तबल्या पासून पेटी पर्यंत व ड्रम सेट पासून पियानो पर्यंत पंधरा ते वीस वाद्ये संदीपच्या तरबेज गायकी बरहुकूम लिलया वाजताना पाहून टिम कुक मिटिंगच्या पंधरा मिनिटांची कालमर्यादा विसरूनच गेले. संदीपच्या सुरेल आवाजात ‘नादसाधना’ ॲपच्या साथीने राग यमन मधे सुरू झालेली मिटिंग शेवटी भैरवीतील “मिले सुर मेरा तुम्हारा” ह्या गाण्यापर्यंत आल्यावर प्रत्यक्षात “सुर बने हमारा“ केव्हा होऊन गेली ते दोघांनाही कळले नाही. मंतरलेल्या एक तासानंतर टिम कुक जेव्हा भानावर आले तेव्हा त्यांनी संदीपला प्रेमभरे आलिंगनच दिले. मुंबईतून जाताना टिम कुक भारतीय शास्त्रीय संगीताची व त्याच्या अनुषंगे सॅाफ्टवेअरचे कोडिंग करणाऱ्या भारतीय प्रोग्रॅमरची अवीट छाप त्यांच्या मनात घेऊन गेले एवढे नक्की. याच प्रतीभासंपन्नतेमुळेच भारतीय टेक्नोक्रॅटस्ची खातिरदारी सिलिकॅान व्हॅली आलिंगन देऊन करत असते हे आज पुन्हा एकदा अधोरेखित झाले.’’

‘’संदीप करता कालचा तो दिवस सोनियाचा होऊन गेला असणार हे नक्की. अमेरिकेतल्या सिलिकॅान व्हॅलीचा सम्राट आपल्या गावात येऊन आपल्याला आलिंगन देतो व ट्विटरवर संदीप सकटचा फोटो लगेचच ट्विट करतो हे अनुभवताना संदीपची अवस्था “याच साठी केला होता अट्टाहास…!!!” अशी नक्कीच झाली असणार……!!! अशा या भारावलेल्या क्षणी संदीपच्या मनातून “विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला” असेच स्वर नक्की उमटले असणार. अर्थातच त्याच्या मनाच्या या स्वरांना त्याच्या मोबाईल मधील ‘नादसाधना’ या ॲपने नकळत साथसंगतही चालू केली असणार एवढं नक्की………..!!! संदीप, जगभर पसरलेल्या आम्हा सर्व भारतीयांना तुझा प्रचंड अभिमान आहे……..!!! अभिमानीत……’’

Apple CEO Tim Cook in love with Nadsadhana app

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात