काही भगिनी सोनाराकडेही भिशी करतात. सोनाराकडे त्या दरमहा असे १२ महिने जे पैसे भरतात, त्यात १३ वा हप्ता सोनार भरतो. हा आपला फायदा आहे, असे या भगिनींना वाटत असते. पण त्यांच्या हे लक्षात येत नाही की, ती एका हप्त्याची रक्कम त्यांनी गुंतवलेल्या एकूण रकमेच्या बाजारातील व्याज दरापेक्षाही कमी असते? म्हणजेच हे पैसे त्यांनी रिकिरग डिपॉझिट करून बँकेत जमा केले असते तरीही त्या जादाच्या मिळालेल्या एका हप्त्याच्या रकमेपेक्षा व्याज जास्त असले असते.
शिवाय, शेवटी जमा झालेल्या रकमेएवढे सोने त्या सोनाराकडून घेतात. त्या काळात त्यांना काही वैयक्तिक अडचण आली तर पैशाच्या स्वरूपात परतावा मिळत नाही. पुढे काही वर्ष त्यांनी सोनाराकडची भिशी अशीच ठेवली तर त्याला एक कायमचं गिऱ्हाईक मिळतं. काही वर्षांनी त्या ते सोने घेऊन त्याच सोनाराकडे एखादा दागिना बनविण्यासाठी गेल्या, तर तो सोनार ते सोने घेऊन दागिना तयार करून देतो.
ते करताना त्यात आणखी करणावळ किंवा मजुरी जोडतो. परिणामी दिलेल्या सोन्यापेक्षा कमी वजनाचा दागिना घ्यावा लागतो. आता यात फायदा कोणाचा आणि नुकसान कोणाचं? दुकानदार त्याचा फायदा बघणारच. परंतु आपले काही नुकसान तर होत नाही ना, याकडे आपणच जरा लक्ष द्यायला हवे.
त्यामुळे गुंतवणूक करताना ती गुंतवणूक कायद्याअंतर्गत आहे किंवा नाही हे जरूर पाहावे. कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुंतवणुकीत केवायसी करणे बंधनकारक असते. आपला ओळख व पत्ता रजिस्टर करून घेण्यासाठी केवायसी ही एक कार्यपद्धती आहे. त्यासाठी तुमचे पॅन कार्ड (ओळखीसाठी) व आधार कार्ड (ओळख व पत्ता दोन्हीसाठी) बरोबर असले पाहिजे. त्यामुळे तुमच्या नावाने झालेली गुंतवणूक तुमच्याशिवाय कोणालाही दिली जात नाही. हे दोन महत्त्वाचे दस्तावेज बरोबर असतील तर गुंतवणुकीचे अनेक पर्याय तुमच्यासाठी खुले आहेत.
व अशा कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुंतवणुकींमध्ये फसवणूक होण्याची शक्यता फार कमी असते. समजा झालीच तरी केवायसी व इतर गुंतवणुकीचे पुरावे तुमच्याजवळ असल्यामुळे तुम्ही कायदेशीर कार्यवाही करून आपले पसे परत मिळवू शकता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App