दिलगिरी मागत फडणवीसांनी टाकला वादावर पडदा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपत्री राजर्षि शाहू महाराज यांच्या स्मृतिदिनी केलेल्या ट्विटमध्ये अनावधानाने झालेल्या चुकीबद्दल माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. “शाहू महाराजांबद्दल अनादर करण्याचे कधी माझ्या मनातसुद्धा येऊ शकत नाही,” असे सांगत फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकला आहे.

शाहू महाराजांचे वंशज, राज्यसभा खासदार संभाजी छत्रपती यांनी फडणवीस यांनी सर्व शिव-शाहू भक्तांची माफी मागण्याची मागणी केली होती. त्यापाठोपाठ लगेचच फडणवीस यांनी झालेल्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

स्मृतिदिनी शाहू महाराजांचे नमन करताना फडणवीस यांनी “थोर सामाजिक कार्यकर्ते, वंचितांचे शिक्षण, हक्कांचा पुरस्कार करणारे छत्रपती राजर्षि शाहू महाराज यांना स्मृतिदिनी शत शत नमन…” असे ट्विट केले होते. यातील ‘थोर सामाजिक कार्यकर्ते’ या शब्दावर आक्षेप घेऊन सोशल मीडियावर फडणवीसांवर टीकेच्या फैरी झाडण्यात आल्या होत्या. झालेली चूक लक्षात घेऊन फडणवीसांनी तातडीने राजर्षिंचा एका व्हिडीओदेखील शेअर केला होता. पण त्याने वणवा काही थांबला नाही. या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजेंनी फडणवीसांच्या माफी मागणी केली होती.

खासदार संभाजीराजे हे राष्ट्रपतीनियुक्त खासदार असले तरी त्यांना खासदार करण्यात फडणवीसांचा सिंहाचा वाटा होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यांनी त्यासाठी शब्द टाकला होता. त्यानंतर कोल्हापूरच्या राजवाड्यावर फडणवीसांचे विशेष स्वागत करण्यात आले होते, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना झोंबले होते. असे असले तरीही संभाजीराजे प्रथमपासून भाजपशी नेहमीच फटकून राहिले. राष्ट्रपतीनियुक्त असलेल्या अन्य खासदारांसारखे (सुब्रम्हण्यम स्वामी, मेरी कोम, स्वपन दासगुप्ता) त्यांनी भाजपचे राज्यसभेतील संलग्नत्व स्वीकारले नाही. भाजपसोबत अप्रत्यक्षरीत्या जाण्याचा त्यांचा निर्णय अनेक समर्थकांना तेव्हाही पटलेला नव्हता. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी राज्यभर मोर्चे निघालेले असतानाही संभाजीराजे यांनी तेव्हाच्या फडणवीस सरकारची पाठराखण केली नव्हती.


छत्रपतींचे वंशज भाजपसोबत…

दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे हे नुकतेच भाजपचे राज्यसभा खासदार बनले आहेत, तर दुसरे वंशज शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचेच आमदार आहेत. छत्रपती संभाजीराजेंची राज्यसभा मुदत पुढील वर्षी संपत असल्याचे कळते.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात