विनय झोडगे
निलेश राणेंचे काय चुकले? ते खरंच बोलले ना! म्हणूनच शरद पवारांचे नातू रोहित पवारांना टोचले. कटू सत्य टोचणे हे पवारांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे खऱ्या मुद्द्यांवर खरे बोलायचे नसते. खरे प्रश्न त्यांना विचारायचे नसतात. मागे नगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमानंतर एका पत्रकाराने शरद पवारांना नातेवाईक पक्ष सोडून जाण्याचा खरा प्रश्न विचारला त्यावेळी पवार चिडले. त्याला असभ्य म्हणाले. हे सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. रोहित यांचे आता असेच झाले आहे.
निलेश राणे यांनी साखर कारखान्यांच्या खर्चाचे ऑडिट व्हावे, असे नुसते म्हटले तरी रोहित पवारांचा पारा चढला. त्यांनी राणे यांना “कुकुटपालना” तून कोंबडीचोरीची आठवण करून दिली. म्हणजे राणे यांच्यावर टीका करताना सुद्धा दुसऱ्या कोणीतरी केलेल्या टीकेचा रोहित पवारांना आधार घ्यावा लागला. कारण ही टीका बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. या बाबतीत रोहित पवार हे शरद पवारांचे नातू शोभतात खरे…!! सगळे करायचे ते दुसऱ्याच्या जीवावर. टीकासुद्धा करायची ती दुसऱ्याची चोरून. कारण स्वत:कडे तेवढी प्रतिभा नाही ना…!!
”साखर विषयावर किती पैसे महाराष्ट्रात खर्च झाले ह्यावर audit झालेच पाहिजे. साखर कारखाने करोडोंची उलाढाल करतात, राज्य सरकार, राज्य बँक, जिल्हा बँका सगळे साखर व्यवसायाला वर्षानुवर्षे साथ देत आलेत. तरी वाचवा??’, अशा आशयाचे ट्विट निलेश राणेंनी केले होते. बाण अचूक लागला म्हणूनच रोहित पवारांनी त्याला प्रत्युत्तर दिले.
रोहित म्हणाले, ”मी आपणास सांगू इच्छितो की शरद पवार यांनी साखर उद्योगासह ‘कुक्कुटपालन’ व इतर उद्योगातील दुरवस्थेबाबतही केंद्राला पत्र पाठवून उपाययोजना सुचवल्या आहेत. साहेब प्रत्येक गोष्ट अभ्यासपूर्वक मांडत असल्यानेच पंतप्रधान मोदीजीही त्यावर सकारात्मक विचार करतात. त्यामुळे काळजी नसावी”, असे ट्विट रोहित पवार यांनी केले होते यावरून दोघांमध्ये ट्विटर वॉर सुरू झाले.
रोहित पवारांच्या ट्विटमध्ये अर्धसत्य मांडले आहे. म्हणे, पवार साहेब अभ्यास करून मुद्दे मांडतात. हो करतात की. पण म्हणून काय पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना विचारून सगळे निर्णय घेतात काय? रोहित पवारांचे ट्विट नीट वाचले तर यातले अर्धसत्य बाहेर येते. जणू काही पवारांना विचारूनच मोदी आपले सरकार चालवतात…!!
निलेश राणे यांनी रोहित पवारांना आणखी एका ट्विटमधून दिलेले उत्तर तर आणखी कटू सत्य सांगणारे आहे. ते म्हणतात की, मी साखरेवर बोललो पवार साहेबांवर नाही. कुकुटपालनाची मागणी केली असेल तर तुझ्यासाठी चांगली आहे, तुला गरज आहे. साखरेवर बोलल्यावर मिरची का लागली?, मतदारसंघावर लक्ष दे सगळीकडे नाक खूपसू नकोस, नाहीतर साखर कारखान्यांसारखी हालत होईल तुझी, अशी टीका देखील निलेश राणे यांनी रोहित पवारांवर केली आहे.
दोन्ही तरूण नेत्यांच्या या ट्विटर युद्धातून काय व्हायचे ते होवो पण निलेश राणेंनी पवारांच्या खऱ्या मुद्द्याला हात घातला हे तर लक्षात घ्यावे लागेल. सहकारी साखर कारखाने कोणी मोडीत काढले? ते पडेल भावात कोणी विकत घेतले? कारखाने सहकारी तत्त्वावर असताना नीट चालत नव्हते आणि ते विकत घेऊन खासगी मालकीचे झाल्यावर एकदम कार्यक्षमतेने चालायला लागले? निलेश राणे यांच्या नंतरच्या ट्विटमधून वर उल्लेख केलेले प्रश्न उपस्थित झाले आहेत. ते पवार आजोबा, नातवाला टोचणारे आहेत. आजोबांच्या राजकीय कर्तृत्वाच्या नातवाने कितीही डिंग्या मारल्या तरी पवारांच्या नेतृत्वाच्या खऱ्या मर्यादा स्पष्ट करणारे आहेत, एवढे मात्र खरे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App