The Focus India Navratri 2021 : अहं सर्वेश्वरी अहं शक्ती!पहिली माळ वर्दीतल्या ‘तेजस्वी’ दुर्गैला !सोलापूरची शान-पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते


  • 2012 साली झालेल्या यूपीएससीच्या परीक्षेत तेजस्वी बाळासाहेब सातपुते यांची आयपीएसपदी निवड झाली.
  • स्वतःवर असलेला आत्मविश्वास, ठाम निर्णय घेण्याची क्षमता, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका, आई-वडिलांची मोलाची साथ या सर्व गोष्टींमुळे तेजस्वी सातपुते यांनी घवघवीत यश संपादन
    केले.

सोलापूर:द फोकस इंडिया ९ दिवस घेऊन येत आहे ‘ती’ ची अनेक रूपं ….आज भेटूया सोलापूर पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना .अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव गावातील सातपुते कुटुंब म्हणजे आदर्श. स्त्री शिक्षणाचे महत्त्व समजलेल्या बाळासाहेब सातपुते यांनी लग्नानंतर स्वतःचे शिक्षण अपूर्ण असतानादेखील पत्नीला उच्चशिक्षण देऊन शिक्षिका बनविले. घरात  शैक्षणिक वातावरण त्यामुळे त्यांच्या मुलीला शिक्षणाच बाळकडूच मिळालं.जेएनसीएएसआर या संस्थेने 2006 मध्ये शास्त्रज्ञ घडवण्यासाठी देशातून 10 विद्यार्थ्यांची निवड केली होती. त्यात महाराष्ट्रातून निवड झालेल्या तेजस्वी बाळासाहेब सातपुते ही एकमेव विद्यार्थिनी होती.

आपली मुलगी आता लवकरच शास्त्रज्ञ होणार, अशी अपेक्षा आई-वडिलांना होती. परंतु तेजस्वी यांनी शास्त्रज्ञ तर सोडाच पण सातत्याने शैक्षणिक क्षेत्र बदलत कधी वैमानिक, कधी न्यायाधीश असे सांगू लागल्याने आई-वडिलांची चिंता वाढत चालली होती. परंतु तेजस्वी यांचा स्वतःवर असलेला आत्मविश्वास, ठाम निर्णय घेण्याची क्षमता असल्याने त्यांनी या काळात “आई काळजी नको करू गं, मी एक तर खूप प्रसिद्ध न्यायाधीश नाहीतर शास्त्रज्ञ होईन गं!’ असे सांगितले होते. असेच त्या “हे होणार, ते होणार’ असे सांगत अखेर 2012 मध्ये यूपीएससीतून आयपीएस पदाला गवसणी घातली.

तेजस्वी बाळासाहेब सातपुते यांच्या कुटुंबात सर्वाधिक शिकलेली व्यक्ती म्हणजे यांच्या आई कृष्णाबाई. आई स्वतः शिक्षिका असल्यामुळे आपल्या मुलांनीही खूप शिकावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. त्यासाठी त्या सुरवातीपासून आग्रही होत्या. लहानपणापासून वैमानिक होण्याचे त्यांचे स्वप्न होते. पण त्यांचे हे स्वप्न स्वप्नच राहिले फक्त. त्याला कारणही तसंच आहे. त्यांना कुणीतरी सांगितले होते चष्मा असेल तर वैमानिक होता येत नाही. त्यामुळे त्यांचे हे स्वप्न अधुरेच राहिले. बारावीत त्या चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्या. त्यामुळे त्यांचा नंबर इंजिनिअर, एमबीबीएस अगदी सहजरीत्या लागला असता; परंतु त्यांना डॉक्‍टर, इंजिनिअर व्हायचे नाही यावर त्या ठाम होत्या.

 

 

लॉ करून न्यायाधीश होणार-
घरच्यांना त्यांनी “मी आता न्यायाधीश होणार असल्याचं स्वप्न दाखवलं.’ मुलीने डॉक्‍टर व्हायचे नाकारले तेव्हा आईनं समजून घेतलं, पुन्हा शास्त्रज्ञ व्हायचं मधूनच सोडलं अन्‌ एमएस्सी सोडून लॉ शिक्षण घ्यायचे ! त्यामुळे आई थोड्या चिंताग्रस्त वाटत असल्याने तेजस्वी यांनी “आई काळजी नको करू गं ! मी एक तर खूप प्रसिद्ध शास्त्रज्ञ होईन नाहीतर न्यायाधीश!’ असे सांगितले.

 

काही दिवसांनी त्यांच्या मनात “आपल्यासाठी यूपीएससी हे क्षेत्र अगदी योग्य आहे’ असे वाटू लागले अन्‌ मग ठरले. एलएलबीची चौथी सेमिस्टर चालू असताना तेजस्वी यांनी आयएएस होण्याचे स्वप्न मनी बाळगले व त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला. त्यामुळे न्यायाधीश होण्याच्या प्रक्रियेवर पूर्णविराम बसला.

आता काय? तर कलेक्‍टर व्हायचंय..! कलेक्‍टर होण्याच्या या प्रक्रियेत एलएलबीची चौथी सेमिस्टर आणि यूपीएससीचा पहिला प्रयत्न या दोघांचाही बळी गेला. परंतु त्यांनी आता कलेक्‍टर होण्याचा ठाम निर्णय घेतला होता. तेजस्वी यांच्या शिक्षणाच्या बाबतीत सतत बदलत असलेल्या निर्णयामुळे बरेचजण त्यांच्या आई-वडिलांना विचारायचे… “तेजस्वीचे न्यायाधीश, शास्त्रज्ञ, वैमानिक काय झाले…’?

सतत बदलत असलेले क्षेत्र यामुळे लोक काय म्हणतील, याकडे दुर्लक्ष करत. त्यांनी यूपीएससीचा अभ्यास करण्यासाठी मुंबई गाठले. या काळात त्यांना कुटुंबाची मोलाची साथ लाभली. कारण, किती शिकणार? कधी नोकरी लागणार? आणखी किती दिवस अभ्यास करणार? असे प्रश्न घरच्यांनी मात्र कधीही विचारले नाहीत. उलट “तू अभ्यास कर, बाकीचे नंतर पाहू’ असा धीर दिला. त्यामुळे त्या बिनधास्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करू लागल्या.

सोनियाचा दिवस –

अन्‌ अखेर तो भाग्याचा दिवस उजाडला 2012 साली झालेल्या यूपीएससीच्या परीक्षेत तेजस्वी बाळासाहेब सातपुते यांची आयपीएसपदी निवड झाली.

स्वतःवर असलेला आत्मविश्वास, ठाम निर्णय घेण्याची क्षमता, घेतलेल्या निर्णयावर ठाम राहण्याची भूमिका, आई-वडिलांची मोलाची साथ या सर्व गोष्टींमुळे तेजस्वी सातपुते यांनी घवघवीत यश संपादन केले.

सामान्य कुटुंब असलेल्या सातपुते कुटुंबाची मुलगी आज गावचे व कुटुंबाचे नाव देशभर गाजवत आहे. सध्या त्या सोलापूर ग्रामीणच्या पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी सातारा पोलिस अधीक्षक म्हणून उत्तमरीत्या प्रशासकीय कार्य राबवले आहे.

The Focus India Navratri 2021: Aham Sarveshwari Aham Shakti! Solapur’s Shaan-Superintendent of Police Tejaswi Satpute

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”