विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली असताना कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये जानेवारी २०२२ मध्ये ७ हजार ७१३ बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला. Work for 7,000 unemployed in January | Information of Nawab Malik
ही माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरी इच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो, असे त्यांनी सांगितले.
अशा विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२१ मध्ये राज्यात २,लाख १९ हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आले. तत्पूर्वी २०२० मध्ये १ लाख ९९ हजार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री मलिक यांनी सांगितले.
मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरी इच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.
नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी
विभागाकडे तसेच महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९४ हजार ३४५ इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मलिक यांनी सांगितले.
मलिक म्हणाले की, जानेवारी २०२२ मध्ये विभागाकडे २५ हजार ९८१ नोकरी उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ५ हजार ८८८, नाशिक विभागात ५ हजार १५२, पुणे विभागात ६ हजार ५५६, औरंगाबाद विभागात ४ हजार ७११ , अमरावती विभागात १ हजार ५४० तर नागपूर विभागात २ हजार १३४ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
जानेवारीमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ७ हजार ७१३ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक २ हजार ८४७, नाशिक विभागात २ हजार ७९५, पुणे विभागात ५३५ , औरंगाबाद विभागात १ हजार २८५, अमरावती विभागात २१३ तर नागपूर विभागात ३८ बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.
नोकरी इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन मंत्री मलिक यांनी केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App