विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह ७ राज्यांच्या निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळाचा मेकओवर केल्यानंतर काँग्रेसही याबाबत मागे राहू इच्छित नसल्याचा राजकीय संदेश १० जनपथने दिला आहे.
काँग्रेसमध्ये केंद्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात संघटनात्मक बदल करण्याची योजना आखली जात असून पक्षातंर्गत बेरजेचे राजकारण करीत जी – २३ नेत्यांसह तरूण नेत्यांना केंद्रीय पातळीवर संघटनेच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपविण्याचा गंभीर विचार सुरू आहे. १० जनपथमधील सूत्रांच्या हवाल्याने ही बातमी टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीने दिली आहे.
मल्लिकार्जुन खर्गे, गुलाम नबी आझाद, सचिन पायलट, रणदीप सुरजेवाला, कमलनाथ आणि अन्य नेत्यांना अत्यंत महत्त्वाच्या केंद्रीय पातळीवरील जबाबदाऱ्या देऊन त्यांच्यावर राज्यांच्या गटांच्या पक्ष वाढीच्या असाइन्मेंट देण्याचे घाटत आहे. ज्या जी – २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहून एक प्रकारे राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लावल्याची चर्चा होती, त्या जी – २३ नेत्यांना पक्षाच्या पुनरूज्जीवनाच्या योजनेतून वगळण्यात येणार नाही. उलट त्या नेत्यांना विशिष्ट पदे आणि जबाबदाऱ्या देण्याचे घाटत आहे.
वर उल्लेख केलेल्या नेत्यांसह अन्य काही नेत्यांना काँग्रेस कार्यकारिणीत CWC या सर्वोच्च निर्णय समितीत सामावून घेतले जाऊ शकते. पक्षात अखिल भारतीय उपाध्यक्षपद हे मानाचे पद निर्माण करून ते ज्येष्ठ नेत्याला दिले जाऊ शकते. तसेच अन्य पदांचे आणि जबाबदाऱ्यांचे वाटप त्याचवेळी केले जाऊ शकते, अशी ही योजना असल्याचे सांगितले जात आहे.
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये २०२२ च्या सुरूवातीला तर गुजरातसारख्या राज्यात २०२२ च्या अखेरीस निवडणूका आहेत. काँग्रेसला या राज्यांमध्ये भाजपशी टक्कर देण्यासाठी चांगली तयारी करायची असल्यास पक्षातली मरगळ झटकली पाहिजे. तालुका – गाव स्तरापर्यंतच्या कार्यकर्त्यांना पक्षवाढीचा कार्यक्रम दिला पाहिजे. यासाठी केंद्रीय पातळीपासून बदल करावे लागतील, हे काँग्रेस नेतृत्वाने ओळखले आहे. त्या दृष्टीने पावले टाकण्यात येत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
-राहुल – प्रियांकांचा रोल निश्चित व्हायचाय…
या सगळ्यात राहुल आणि प्रियांका गांधी यांचा रोल अद्याप निश्चित व्हायचा असल्याचे सांगण्यात येते. प्रियांकांकडे उत्तर प्रदेशची पूर्ण जबाबदारी सोपविणार का… राहुल गांधी पक्षात कोणत्या पदावर सक्रीय होणार… या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचे काम सुरू आहे. बाकी पक्षाच्या संघटनात्मक पुनरूज्जीवनाची योजना तयार आहे, असे सांगण्यात येते आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App