प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला निवडणूक आयोगाने दिल्यानंतर काही शिवसेनेच्या शाखांवर तसेच विधानसभेतील शिवसेनेच्या दालनावर देखील शिंदे गटाने दावा केला आहे. पण यानंतर शिवसेना भवनावर शिंदे गट दावा करणार का? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने आम्ही शिवसेना भवनवर दावा करणार नाही, असे स्पष्ट केले होते. Shivsena bhavan, branches and its properties be given to shinde faction, petition in Supreme Court
मात्र आता शिवसेना भवन आणि शाखा ताब्यात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. वकील आशिष गिरी यांनी ही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर २४ एप्रिलला सुनावणी घेण्याची मागणीही गिरी यांनी केली आहे.
शिवसेना भवनसह सर्व शाखा, सर्व बँकेतील पक्ष निधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला द्या, अशी याचिकेत वकील आशिष गिरी यांनी मागणी केली आहे. मी कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही. मी वकील असण्याबरोबर एक मतदार सुद्धा आहे. म्हणून मी ही हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या बाजूने ही याचिका दाखल केलेली नाही, असे स्पष्ट वकील गिरी यांनी सांगितले आहे.
तसेच वकील गिरी म्हणाले की, ‘उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली असती, पण उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाबाबत आधीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे मी पण थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या याचिकेवर २४ एप्रिलला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. याच याचिकेसोबत पुन्हा नवीन याचिकेवरही सुनावणी व्हावी, अशी मागणी गिरी यांनी केली आहे. त्यामुळे आता गिरी यांच्या याचिकेवर २४ एप्रिलला सुनावणी होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App