विशेष प्रतिनिधी
सावरकर मुद्द्यावर शरद पवारांनी कान टोचल्यानंतर राहुल गांधी “सुधारले”, पण मोदी मुद्द्यावर मात्र काँग्रेसवाले घसरलेलेच आहेत!!, असे म्हणायची पाळी कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या प्रचाराने आणली आहे. काँग्रेस नेत्यांची प्रचाराची भाषा एवढी घसरली आहे, की ती सावरताना काँग्रेस हायकमांडची दमछाक होत आहे. Rahul Gandhi avoided targeting savarkar, but Congress leaders targeting modi proved backfire in karnataka assembly Elections
प्रशांत किशोर जेव्हा काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार होते, तेव्हा त्यांनी राहुल गांधींसह सर्व काँग्रेस नेत्यांना एक मोलाचा सल्ला दिला होता, तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर अजिबात वैयक्तिक टीका करायला जाऊ नका. ती टीका काँग्रेसवर बॅकफायर होईल आणि नुकसान सहन करावे लागेल, हा तो सल्लेवजा इशारा होता. प्रशांत किशोर यांचा हा इशारा सुरुवातीला तरी राहुल गांधी आणि बाकीच्या काँग्रेस नेत्यांनी फारसा गांभीर्याने घेतला नाही. त्याचे परिणाम 2019 नंतर प्रत्येक निवडणुकीत दिसले. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता बाकी ठिकाणी काँग्रेसला पराभवाचे तोंडच पाहावे लागले. मात्र याचा धडा घेऊन सुधारतील, तर ते काँग्रेसवाले कसले??, असे म्हणायची पाळी कर्नाटक मधल्या काँग्रेसच्या प्रचाराने आणली आहे.
महाराष्ट्रात सावरकर मुद्दा घेऊन राहुल गांधींनी जेव्हा माफीवीर म्हणून टीका करायला सुरुवात केली आणि त्या टीकेचा अतिरेक झाला, तेव्हा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी वेळीच “मध्यस्थी” करून राहुल गांधींच्या टीकेला लगाम घातला. उद्धव ठाकरेंनी मालेगावच्या जाहीर सभेत दिलेला इशारा शरद पवारांनी 18 पक्षांच्या बैठकीत राहुल गांधींपर्यंत पोहोचवला. त्यावेळी त्यांनी सावरकरांवरची अनाठायी टीका कशी नुकसानकारक ठरू शकते?, याचे वर्णन केले होते. त्यावेळी ज्यांच्या घरी ही बैठक झाली, त्या काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पवारांच्या म्हणण्यावर मान डोलवली होती. म्हणजे खर्गे यांना देखील पवारांचे म्हणणे पटले होते. एक प्रकारे विरोधकांची राजकीय टीका प्रगल्भ करण्याचा पवारांचा तो प्रयत्न होता.
पण ज्या खर्गेंना सावरकरांवर राहुल गांधींनी अनाठायी टीका करू नये, हे पवारांचे म्हणणे पटले होते, त्यांनाच वयाच्या 80 व्या वर्षी आपण घसरलेल्या भाषेत मोदींवर टीका करू नये. तशी टीका केली, तर काँग्रेसचे नुकसान होईल, हे समजलेले दिसले नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करताना खर्गे घसरले आणि मोदींना “विषारी साप” म्हणून बसले. ज्या मोदींना काँग्रेसवाल्यांनी एक-दोनदा नव्हे तर 91 वेळा शिव्या घातल्या, त्यातून मोदींची राजकीय कारकीर्द कोमेजण्याऐवजी बहरली, हे सुद्धा खर्गेंना वयाच्या 80 व्या वर्षी समजत नसेल, तर बाकीच्या काँग्रेस नेत्यांचे काय असेल??, याचा कल्पनेनेच अंदाज बांधता येईल. पण नंतर खर्गेंनाच स्वतःची राजकीय चूक लक्षात आली, तेव्हा त्यांना आपल्याला “तसे” म्हणायचे नव्हते, अशी मखलाशी करावी लागली.
पण मल्लिकार्जुन खर्गेंनी ती मखलाशी करून एक दिवस उलटतोय ना तोच, त्यांचेच चिरंजीव प्रियांक खर्गे मोदींवर घसरले. वास्तविक ते विधानसभा निवडणुकीतले उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांनी मोदींना “नालायक पुत्र” म्हणण्याची अजिबात गरज नव्हती. पण प्रियांक खर्गे मोदींना “नालायक पुत्र” म्हणून बसले आणि निवडणूक आयोगामध्ये भाजपने त्याच्याविरुद्ध तक्रार केली. एक प्रकारे प्रियांक खर्गे यांनी स्वतःची राजकीय कारकीर्द स्वतःच्याच तोंडाळ कर्तृत्वाने धोक्यात आणली आहे.
याचा सरळ अर्थ असा की ज्या राहुल गांधींना शरद पवारांनी सौम्य शब्दात कानपिचक्या दिल्यानंतर सावरकर मुद्द्यावर राहुल गांधी “सुधारले”, तेवढेच काँग्रेसवाले मोदी मुद्द्यावर कर्नाटकात घसरले. आता त्याचा काँग्रेसला राजकीय तोटा होईल, हे सांगायला फार मोठ्या ज्योतिषाची गरज नाही आणि तो तोटा सहन करण्याखेरीज काँग्रेस पुढे दुसरा पर्यायही नाही, ही न टाळता येण्याजोगी वस्तुस्थिती आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App