मोदींना आव्हान कळलेय, टार्गेट सेट केलेय; पण विरोधकांचे काय??


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर आणि गोव्याच्या दौऱ्यात केलेल्या जाहीर भाषणांमधून एक बाब स्पष्ट होते आहे, ती म्हणजे मोदींना विरोधकांचे आव्हान नेमकेपणाने कळले आहे. त्यानुसार त्यांनी टार्गेट सेट केले आहे, पण विरोधकांचे काय??, हा मात्र प्रश्न अद्याप तरी कायम आहे. PM Narendra Modi targets opposition on shortcut politics, but opposition only harping on emotional political gimmicks

कारण सर्व विरोधी पक्ष मिळून पंतप्रधान मोदी अथवा भाजपला काही विशिष्ट भावनिक मुद्द्यांवरच टार्गेट करत आहेत. त्या पलिकडे जाऊन मोदी जे प्रत्यक्ष काम करत आहेत, त्यातल्या काही उणीवा काढून कोणताही विरोधी पक्ष त्यांच्यावर प्रखर तर सोडाच, साधा हल्लाबोल करायला तयार नाही. विरोधकांचे सर्व मुद्दे फक्त आणि फक्त भावनिक आणि ते सुद्धा बरेचसे उथळ असेच दिसत आहेत.

मोदींनी काल महाराष्ट्रात आणि गोव्यात रेवडी कल्चर हा शब्द न वापरता आम आदमी पार्टी स्टाईलच्या राजकारणाला टार्गेट केले. त्यांनी विरोधी पक्षांना शॉर्टकट राजकारणापासून दूर व्हायला सांगितले. याचाच अर्थ केवळ जनतेवर सवलतींचा वर्षाव करून किंवा काही फुकट देऊन जनता कुठल्याही राजकीय पक्षावर भाळत नाही, तर शाश्वत विकास पायाभूत सुविधांचा विकास यामुळे जनता राजकीय पक्षांच्या पाठीमागे येऊ शकते हे गुजरातने सिद्ध केल्याचे पंतप्रधान मोदींनी आवर्जून सांगितले. मोदींनी आपल्या भाषणातदिल्ली आणि हिमाचल मधल्या भाजपच्या पराभवाचा उल्लेख केला नाही, हे खरे.



पण गुजरात मधला भाजपचा विजय जेवढा इम्प्रेसिव्ह आणि काँग्रेसचा पराभव जेवढा डिप्रेसिव्ह आहे, तेवढा भाजपचा हिमाचल मधला पराभव डिप्रेसिव्ह नाही, हे आकडेवारीनुसारच स्पष्ट होते. भाजप तिथे केवळ 1 % मताच्या फरकाने हरला आहे, तर गुजरात मध्ये भाजपने 54 % मते मिळवली असून काँग्रेसने 21% आणि आम आदमी पार्टीने 13 % टक्के मते मिळवली आहेत. या टक्केवारीत न जाता मोदींनी गुजरात मधला भाजपच्या विजयाचा नेमका अर्थ समजावून सांगितला आहे… आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आम आदमी पार्टीला पडलेल्या 13 टक्के मतांचा नेमका अर्थ मोदींनी नेमकेपणाने लक्षात घेतला आहे.

मोदींच्या भाषणातले “बिटवीन द लाईन्स”

मोदींच्या या भाषणातले “बिटवीन द लाईन्स” वाचले तर त्याचा नेमका अर्थ लक्षात येईल. महाराष्ट्रात आणि गोव्यात येऊन आम आदमी पार्टी सारख्या राजकीय पक्षाला टार्गेट करणे याचा नेमका अर्थ काय समजायचा?? खरं म्हणजे महाराष्ट्रात येऊन मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस या पक्षांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तरे देणे अपेक्षित होते. पण प्रत्यक्षात मोदींनी या तीनही पक्षांच्या मुद्द्यांकडे ढुंकूनही पाहिले नाही. ते सध्या महाराष्ट्रात उपस्थित करत असलेल्या विशिष्ट भावनिक मुद्द्यांकडे मोदींनी थेट दुर्लक्ष केले आणि या सगळ्यांची गोळा बेरीज म्हणून कुठल्याही शॉर्टकट राजकारणाचा फायदा होणार नाही, असे ठणकावून ते निघून गेले.

एक प्रकारे पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे महाराष्ट्रातल्या भाजपला घेरणे वाया गेले आहे. या तिन्ही पक्षांच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करून मोदी निघून गेले. याचा अर्थच या तीनही पक्षांचे हे राजकारण एका अर्थी फसले आहे. त्यांचे आत्तापर्यंतचे सगळे बाण हवेत गेले आहेत. कारण मोदींनी त्यांच्या भाषणात या पक्षांनी केलेल्या कुठल्याही आरोपांची दखलही घेतली नाही. त्यामुळे शेवटी दुपारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रेस कॉन्फरन्स घेऊन मोदींच्या शेजारी राज्यपाल कसे?, असा प्रश्न विचारावासा वाटला. पण त्याचाही काही फायदा झाला नाही कारण मोदींनी त्या कुठल्याच मुद्द्याला काहीही उत्तरच दिले नाही आणि उत्तर दिले असले तर राजकारणात शॉर्टकट उपयोगी पडणार नाही, हेच फिट उत्तर देऊन ते निघून गेले.

म्हणजेच एकीकडे मोदींनी विरोधकांच्या आरोपांमधला मूळ गाभाच एक प्रकारे काढून घेतला आहे. जे मुद्दे खरे नाहीत किंवा गांभीर्याने मोदींच्या अथवा भाजपच्या राजकारणावर परिणाम करत नाहीत त्या मुद्द्याकडे मोदींनी उघडपणे दुर्लक्ष केले आहे.

यूपीए सरकारवर मोदींचा हल्लाबोल

या उलट मोदींनी विरोधकांकडे खऱ्या अर्थाने मोदींना आणि भाजपला आव्हान ठरेल अशी हत्यारेच शिल्लक ठेवलेली नाहीत. मोदी आपल्या भाषणात आजही यूपीए सरकारच्या 10 वर्षांच्या कारकिर्दीचा वारंवार उल्लेख करतात. त्यांच्या उणीवा ठळकपणे जनतेला सांगतात आणि आपण केलेली पायाभूत सुविधांची कामे यूपीए सरकारच्या पेक्षा कशी सरस आहे हे स्पष्ट करतात. ह्या मुद्द्यांवर विरोधक कोणताही विरोधी पक्ष चकार शब्दही उच्चारत नाही. किंवा मोदींना त्या मुद्द्यावरून कोणते आव्हानही देत नाही. यातूनच विरोधकांचे राजकीय कन्फ्युजन दिसून येते. नुसते भावनात्मक मुद्दे हे दीर्घकाळ चालत नाहीत. एकतर ते मुद्दे वारंवार बदलावे लागतात आणि जर मुद्दा क्लिक झाला नाही तर तो पूर्णपणे फेल जातो, हे विरोधकांच्या अजून लक्षातही येत नाही.

मोदींच्या उणीवा काढण्यात विरोधक अपयशी

खरं म्हणजे मोदी करत असलेली विविध कामे ही विरोधकांच्या टार्गेटवर असली पाहिजेत. त्यातल्या उणीवा काढून मोदी अथवा भाजप सरकारला त्यांनी टार्गेट केले पाहिजे. पण प्रत्यक्षात कोणताही विरोधी पक्ष ते करू शकत नाही, असे निदान आत्तापर्यंत तरी दिसले आहे. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत किमान महिना-दीड महिना आहेत. ते दररोज मोदींना आपल्या भाषणातून बेरोजगारी आणि महागाई या मुद्द्यांवर टार्गेट करतात. पण त्या भाषणांना माध्यमांमध्ये फारशी प्रसिद्धीस मिळत नाही. राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात सावरकरांचा मुद्दा उपस्थित केल्यावर त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली. पण तो मुद्दा थंडावल्यावर पुन्हा राहुल गांधींची भारत जोडो यात्रा माध्यमांच्या दृष्टीने कोमात गेली आहे.

या अर्थाने मोदींनी विरोधकांचे खरे आव्हान ओळखले आहे. त्यानुसार स्वतःचे टार्गेट सेट केले आहे. पण विरोधक मात्र जुन्याच हत्यारांनी त्यातही बोथट झालेल्या भावनिक हत्यारांनी मोदी आणि भाजप सरकारला झोडू पाहत आहेत. अर्थात याचा उपयोग किती होईल??, हे 2023 च्या नऊ राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीत आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता आहे.

PM Narendra Modi targets opposition on shortcut politics, but opposition only harping on emotional political gimmicks

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात