विशेष प्रतिनिधी
दिल्ली : गांधी परिवाराच्या सावलीत राहून नव्हे, तर गांधी परिवाराच्या अपरिहार्य राजकीय सहयोगाने अध्यक्षपद सांभाळण्याचे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापुढे मोठे आव्हान असेल, हा आज 19 ऑक्टोबर 2022 चा त्यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीचा खरा राजकीय संदेश आहे!! Mallikarjun Kharge has a big challenge to hold the post of President
मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव अध्यक्ष पदासाठी पुढे आल्यापासून किंबहुना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच काँग्रेसचा अध्यक्ष कोणीही होवो, रिमोट कंट्रोल गांधी परिवाराचाच राहणार, असा दाट राजकीय समज संपूर्ण देशात पसरलेलाच होता. हा दाट समज काढून आपण स्वतंत्र प्रतिभेचे आणि अनुभवाचा वापर करणारे अध्यक्ष आहोत, हे सिद्ध करणे हे मल्लिकार्जुन खर्गे यांच्यापुढे सगळ्यात मोठे आव्हान असणार आहे.
काँग्रेस पक्षाची सध्याची राजकीय अवस्था खूपच बिकट आहे. पक्ष गाव पातळीपासून ते देशपातळीपर्यंत स्वतःच्या नव्या अस्तित्वाच्या शोधात आहे. काँग्रेस पुढची संघटनात्मक पातळीवर आव्हाने कधी नव्हे, एवढी पर्वतासारखी उभी आहेत आणि आव्हानांचे हे पर्वत लांघून पक्षाला पुढे नेण्याचे आव्हान मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अनुभवी नेतृत्वासमोर आहे. काँग्रेस पुढे असणाऱ्या आव्हानांचे पुढे काय होणार आहे??, हे येणारा काळ सांगेल. पण खुद्द मल्लिकार्जुन खर्गे यांच्या समोरचे आव्हान मात्र गांधी परिवाराच्या सावलीत न राहाता काम करणारे, पण गांधी परिवाराचा खऱ्या अर्थाने सहयोग घेऊन पुढे जाणारे अध्यक्ष आपण आहोत हेच सिद्ध करण्याचे आहे!!
काँग्रेसने अध्यक्ष पदाची निवडणूक घेऊन आपण लोकशाहीची बूज राखतो, असे म्हणण्याचा कितीही प्रयत्न केला तरी जोपर्यंत गांधी परिवाराची संपूर्ण राजकीय सावली काँग्रेसवर राहील तोपर्यंत कोणताही अध्यक्ष हा रिमोट कंट्रोल्डच असेल हा समज देशात तसाच पसरलेला राहील. काँग्रेसच्या राजकीय यशावर याच मुद्द्याचा खरं म्हणजे सर्वाधिक परिणाम झाला आहे. काँग्रेसची देशव्यापी संघटना आणि त्या संघटनेची सर्वदूर असणारी पोहोच लक्षात घेतली, तर काँग्रेस पुनरुज्जीवन करणे खरंच कठीण नाही. कारण काँग्रेसकडे संघटनात्मक पातळीवर खरंच तेवढा प्रचंड वारसा आहे. 137 वर्षांच्या इतिहासात काँग्रेसने प्रचंड राजकीय हेलकावे खाल्ले असले, तरी वेगवेगळ्या काळाच्या टप्प्यात तिचे पुनरुजीवनही मजबुतीने झाल्याचे दिसले आहे.
2014 नंतरच्या काळात काँग्रेस पुढे असलेले आव्हान मोठे आहे हे नक्कीच. पण ते पार करणे अगदीच अशक्य आहे, असे मात्र नव्हे!! त्यासाठी खरंच काँग्रेसला गांधी परिवाराच्या सावलीपासून दूर राहून पण गांधी परिवाराचा सहयोग घेऊनच पुढची वाटचाल करावी लागेल. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेसच्या गांधी परिवाराचे “सिमेंटिंग फोर्स” असे वर्णन केले आहे, ते खरेच आहे. गांधी परिवार काँग्रेसजनांना संकट काळापासून सत्ता काळापर्यंत जोडून ठेवणारा घटक आहे ही वस्तुस्थिती आहे. पण गांधी परिवाराची संपूर्ण सावली पक्षावर पसरणे किंवा पक्षापेक्षा गांधी परिवार मोठा असणे ही मूलभूत राजकीय समस्या आहे आणि त्या समस्येवर तोडगा काढणे हे काँग्रेसच्या कोणत्याही गांधी परिवाराचा सदस्य नसलेल्या अध्यक्षापुढे आव्हान आहे… नेमके हेच आव्हान मल्लिकार्जुन खर्गे यांना पेलायचे आहे. त्यांनी ते यशस्वीरित्या पेलले, तर काँग्रेसचे विशिष्ट मर्यादेपर्यंतचे पुनरुज्जीवन अवघड नाही… आणि मग खऱ्या अर्थाने काँग्रेस सध्याच्या प्रचंड बलशाली असणाऱ्या सत्ताधारी भाजप पुढे मोठे आव्हान उभे करू शकेल!!
प्रश्न फक्त हा आहे मल्लिकार्जुन खर्गे हे गांधी परिवाराच्या सावलीतून बाहेर पडून त्यांच्या सहयोगाने काँग्रेस पक्षाच्या राजकीय पुनरुज्जीवनाला चालना देऊ शकतील??,… उत्तर त्यांच्या राजकीय कर्तृत्वात आणि काळाच्या उदरात दडले आहे!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App