ISIS jihad : काकोरी, कोलकाता, श्रीनगर, अनंतनाग गजवा ए हिंद कनेक्शन

वृत्तसंस्था

नवी दिल्ली – उत्तर प्रदेशात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर साखळी स्फोट घडविण्याचे मोठे कारस्थान यूपी पोलीसांच्या विशेष पथकाने ATS उघडकीस आणल्याची बातमी सगळीकडे मोठी दिसली, पण आजची ही एकमेव घटना नाही. तर अशी दहशतवाद्यांची मोठी साखळी देशातल्या विविध शहरांमध्ये पसरल्याचे विविध कारवायांमध्ये उघड झाले आहे. ISIS jihad; kakori, kolkata, shrinagar, anantnag Ghazwat-e-Hind connection

आज दिवसभरात उत्तर प्रदेशातील काकोरी, बंगालची राजधानी कोलकाता, काश्मीरमधली श्रीनगर आणि अनंतनाग या शहरांमध्ये दहशतवादी कारवायांची विविध मोड्यूल्स उघडकीस आली आहेत. राज्यांचे पोलीस, केंद्राचे राष्ट्रीय तपास पथक आणि अन्य केंद्रीय संस्थांनी ही कारवाई केली आहे.

काकोरीतील कारवाई

उत्तर प्रदेशातील काकोरीत आयएसआयएसच्या दोन दहशतवाद्यांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह यूपी एटीएसने अटक केली. हे दोन्ही दहशतवादी अल् कायदाच्या गजवा ए हिंद संघटनेशी संबंधित आहेत. प्रेशर कुकर बाँम्बसह अनेक घातक शस्त्रे त्यांच्याकडे सापडली आहेत. उत्तर प्रदेशात मोठे साखळी स्फोट घडविण्याचे कारस्थान उधळले गेले आहे. यूपी एटीएसचे प्रमुख प्रशांत कुमार यांनी ही माहिती दिली.

श्रीनगर – अनंतनागमधील कारवाई

यूपीत ही कारवाई सुरू असताना श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात ७ ठिकाणी राष्ट्रीय तपास संस्था NIA ने छापे घातले आणि दहशतवाद्यांचे सोशल मीडिया मोड्यूल मोडून काढले. भारतात जिहादींसाठी फंडिंग आणि युवकांच्या भरतीसाठी या ७ ठिकाणी काही लोक कार्यरत होते. त्यांच्याकडून विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बाकीचे जिहादी साहित्य जप्त करण्यात आले आहे. जिहादी साहित्याचा सायबर प्रचार – प्रसार करून ISIS संघटनेत भरतीसाठी तरूण तयार करण्याची घातक योजना सुरू आहे. हे साहित्य पकडलेल्या लोकांकडून जप्त करण्यात आले आहे.

कोलकात्यात कारवाई

कोलकाता पोलीसांना देखील जिहादी कारवायांचा सुगावा लागला. त्यांचे फेसबुक अकाऊंट्स काही महत्त्वाचे नंबर तसेच हाताने लिहिलेल्या डायऱ्या सापडल्या आहेत. या सगळ्यांमध्ये जिहादी तत्त्वांचा प्रचार – प्रसाराचे साहित्य आहे. सोशल मीडियाद्वारे भारतात जिहाद पसरविण्याची ही योजना आहे, असे कोलकात्याचे सह पोलीस आयुक्त सॉलोमन नेसकुमार यांनी सांगितले.

एकाच दिवशी वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी केलेल्या या कारवाया आहेत. या सगळ्यात जिहादींचा एकच हेतू दिसतो, तो म्हणजे भारतात गजवा ए हिंद या मॉडेलवर आधारित जिहाद पसरवणे. हे स्पष्ट होते आहे.

ISIS jihad; kakori, kolkata, shrinagar, anantnag Ghazwat-e-Hind connection